Monday, June 29, 2015

गोगलगाय

आमच्या झाडांच्या मातीत, सुमारे ३ मिलिमीटर लांबीच्या, हिरवट अंगाच्या गोगलगाई कित्येक वर्षे आहेत. त्यांचे शंख सरळ आणि सफेद रंगाचे असतात. त्या मातीतच रहातात, आम्ही टाकलेल्या भाजीपाल्याच्या तुकड्यांवर जगतात, आणि माती सुपीक बनवतात. त्यांचा त्रास काहीच नाही आणि फायदा खूप आहे, म्हणून मला त्या लहानपणापासून आवडत आल्या आहेत. आज मला एक नवीन, बरीच मोठी गोगलगाय सापडली.



सुमारे आठवडाभर आमच्या येथे मुसळधार पाऊस पडला. पाणी गळू नये म्हणून बसविलेला ग्रिलवरचा पत्रा आणि भिंत यांच्यामधून पाणी झिरपते का याचा अंदाज घेण्यासाठी मी बाहेर वाकून पहात होतो, तेव्हा मला खिडकीच्या मोठ्ठ्या काचेच्या वरच्या टोकाला एक इंच लांबीची गोगलगाय आढळली. बहुधा पुढे जायचा रस्ता खुंटल्यामुळे ती तेथेच स्थिर होती. आता खाणे पिणे न मिळाल्यामुळे बिचारी मरून जाईल म्हणून मी तिला पाण्याने ओलसर केलेल्या पातळ पु्ठ्ठ्यावर घेऊन घरांत आणले. तिचे स्वतःच्या संग्रहासाठी फोटो काढले. मग आमच्या शोभेच्या झाडांमध्ये तिला सोडले तर ती सगळी झाडे फस्त करून टाकेल म्हणून तिला बागेत नेऊन एका छोट्या झाडावर सोडले. त्या ओलसर पुठ्ठ्यावर ती मरगळल्यासारखी झाली होती. त्या झाडावर सोडताच ती इतक्या पटपट बुंध्यावरून वरवर जाऊ लागली, की ही खरच गोगलगाय आहे की एखादा चपळ प्राणी आहे असा संशय यावा.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क