Friday, October 30, 2015

दूरस्थ शिक्षण - प्रतिसाद

आटपाट नगरांत काही काही ठिकाणी दूरस्थ शिक्षण कसे चालायचे ते राजवैद्यांनी गुरुजींना सांगितले त्याबद्दल आपण वाचले असेलच. नसेल तर आपण ते येथे वाचू शकता. ते त्यांच्या एका जुन्या विद्यार्थ्याच्या वाचनात आले. त्याने विदेशातील आपल्या रुग्णालयात जवळ असूनही दूर अशा प्रकारचे दूरस्थ वैद्यकीय शिक्षण विद्यार्थी कसे घेत हे लिहून कळविले आणि सोबत एक फोटोसुद्धा पाठविला. तो त्याच्या परवानगीने येथे दाखविला आहे.




फोटो शल्यक्रियाग्रुहाचा आहे, ज्याला विदेशात ऑपरेशन थिएटर असे म्हणतात. जेथे शल्यक्रिया चालू आहे ते स्थळ बाणाच्या चलतचित्राने दाखविले आहे. ती शल्यक्रिया किती कुतूहलाने आणि उत्सुकतेने विद्यार्थी वैद्य पहात आहेत ते पहा, असे राजवैद्यांच्या जुन्या विद्यार्थ्याने लिहिले होते. ते पाहून कोणा शिक्षकाचा ऊर भरून येणार नाही असे राजवैद्यांच्या मनात आले.

Wednesday, October 28, 2015

ताठ आणि लवचिक कणा

आटपाट नगरच्या राजाच्या प्रशासनात, रुग्णालयांत, विद्यालयांत आणि साधारणपणे सर्वच क्षेत्रांत एक अजब गोष्ट दिसून येत असे. कदाचित तो मनुष्यस्वभावाचा स्थायीभाव असावा आणि आटपाट नगराशी किंवा त्याच्या राजाशी त्याचा काही संबंध नसावा. उदाहरणार्थ रुग्णालयाचे प्रमुख वैद्य हे विविध विभागांच्या प्रमुखांना कधी अनुल्लेखाने मारत असत, तर कधी अनुद्गाराने मारत असत. सर्व रुग्णालयांचे प्रमुख संचालक रुग्णालयांच्या  प्रमुख वैद्यांना कस्पटासमान वागवीत असत. प्रशासनाचे प्रमुख अधिकारी सर्व प्रमुख वैद्य आणि संचालक यांना सभेसाठी बोलावून तासन् तास तिष्ठत ठेवत असत, आणि त्यांच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत असत. या गोष्टी अशाच व्हायच्या असे ग्रुहीत धरूनच रोजचे कामकाज चालत असे.
तर एकदा प्रमुख प्रशासकांच्या छातीत एका पहाटे अकस्मात दुखू लागले. त्यांनी प्रमुख वैद्यांना दूरध्वनी करून आपण रुग्णालयांत पहाटे येतो असे कळविले. प्रमुख वैद्यांनी प्रमुख ह्रुदयरोगतज्ज्ञांना पहाटे आपल्या दालनांत हजर रहा असे फर्मावले. राजवैद्य तेथून आपल्या विभागाकडे चालले होते तेव्हढ्यात प्रमुख प्रशासक आणि प्रमुख वैद्य  त्यांच्या दालनांतून एकत्र बाहेर पडले. प्रमुख ह्रुदयरोगतज्ज्ञ आंग्लदेशांत घालतात तसा 'थ्री पीस सूट' घालून आणि टाय लावून बाहेर उभे होते. त्यांच्या समोरून प्रमुख प्रशासक आणि प्रमुख वैद्य प्रमुख प्रशासकांच्या रथांत जाऊन बसले. 'ह्रुदयरोगविभागांत या' असा त्यांना आदेश देऊन रथ त्यांना पाठी ठेवून निघून गेला.  राजवैद्य हा प्रसंग अचंभित होऊन पहात उभे होते. रथांत भरपूर जागा असूनही आणि  ह्रुदयरोगतज्ज्ञांशिवाय उपचार सुरू होणार नाहीत याची पूर्ण कल्पना असूनही त्यांना बरोबर घेतले नाही, यामुळे अपमानित झालेल्या ह्रुदयरोगतज्ज्ञांनी राजवैद्यांकडे पाहिले, त्यांची नजर चुकविली आणि प्रमुख प्रशासकांना तपासण्यासठी आपल्या विभागाकदे चालत चालत निघाले.
का लांतराने राज्यातल्या खूप उपद्रवमूल्य असणा~या एका राजकारणी नेत्याने प्रमुख प्रशासक, प्रमुख संचालक,  सर्व  प्रमुख वैद्य आणि सर्व विभागांच्या प्रमुखांना सभेसाठी बोलावले. सभेच्या वेळी मोठे भाषण केले. नेहमीच्या सवयीप्रमाणे  प्रमुख संचालक प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडू लागले तेव्हा त्याने प्रथम त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले, नंतर त्यांचा जुन्या चुका उद्ध्रुत केल्या, आणि शेवटी प्रमुख संचालक मध्ये मध्ये बोलायचे थांबेनात असे पाहिल्यावर 'मी भाषण करत असताना मध्ये मध्ये बोलू नका' असे स्पष्त सांगितले. सर्वांचा वारंवार आणि ब~याच वेळा अकारण अपमान करणा~या प्रमुख संचालकांचा अपमान त्यांच्या हाताखालच्या सर्वांनी पाहिला, आणि तो त्यांनी सस्मित मुद्रेने गिळला हेही पाहिले.
"वारा येईल तसा पाठीचा कणा ताठ आणि लवचिक कसा होतो पहा" असे कोणा वैद्याने म्हटलेले राजवैद्यांनी ऐकले.

Monday, October 26, 2015

पटपट वाचायला शिकविण्याची पद्धत







आटपाट नगरांत राजाच्या विद्यालयातले गुरुजी शिक्षणक्षेत्रात नवनवे प्रयोग करत असत.

विद्यार्थ्यांना भरभर वाचण्याची सवय लागावी म्हणून त्यांनी एक नवी युक्ती काढली.

छापील मजकूर मिळाला तर विद्यार्थी वाचताना चालढकल करतात. पण वाक्य छापले जात असताना वाचले नाही तर ते पुसले जाईल असे कळले की ते पटपट वाचतील

हे सूत्र मनाशी धरून त्यांनी काय केले पहा.

लक्ष इथे तिथे गेले की शिक्षण हातातून निसटते पहा.




Saturday, October 24, 2015

दूरस्थ शिक्षण

आटपाट नगरांत काळानुसार बदलाचे वारे वाहू लागले होते. पाश्चात्य शिक्षणाच्या पद्धती हळूहळू शिरकाव करू लागल्या होत्या. गुरुजींना या विषयांत रस होता हे माहीत असल्यामुळे राजवैद्यांनी त्यांना ही गोष्ट सांगितली.
"गुरुजी, दूरस्थ शिक्षणम्हणजे काय ते आपल्याला माहीत आहे.हो ना?"
"ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणसंस्थेत जाऊन शिकता येत नाही त्यांना आपल्या घरी राहून स्वतः अभ्यास करून शिक्षण घेता यावे म्हणून निर्माण केलेली ही पद्धत आहे. विद्यापीठ त्यांना शिक्षण साहित्य पुरविते आणि त्यांची योग्य वेळी परीक्षा घेते."
"बरोबर. आपल्याकडे ही पद्धत काही विद्यापीठांत सुरू झालेली आहे. आता त्यांत एका नव्या पद्धतीची भर पडते आहे. आजच मला एका जुन्या विद्यार्थी वैद्याने त्यांच्या विद्यापीठांत सुरू झालेली नवी प्रथा कशी आहे त्याची माहिती पाठविली आहे. आपल्याकडे ती यायला वेळ लागणार नाही. कदाचित तिने शिरकाव करून घेतलाही असेल."
"काय आहे ती प्रथा?" गुरुजींनी विचारले.
"विद्यार्थी विद्यालयांत प्रवेश घेतात. त्यांच्या उपस्थितीचा हा तक्ता पाहिला की ही प्रथा काय आहे याचा उलगडा होईल. जांभळ्या रंगात अनुपस्थिती दाखविली आहे, किरमिजी रंगात उशीराची उपस्थिती दाखविली आहे, तर फिकट पिवळ्या रंगात वेळेवर उपस्थित राहणे देर्शविले आहे."


गुरुजींनी तक्ता काळजीपूर्वक पाहिला.
"वेळेवर उपस्थिती येव्हढी थोडी? आणि अनुपस्थि्ती येव्हढी जास्त?" त्यांनी आश्चर्याने विचारले. "मग त्यांचे शिक्षण कसे होते? विद्यापीठ त्यांना परीक्षेला बसू कसे देते?"
"त्यांचे शिक्षण दूरस्थ असते, म्हनजे ते आपले आपण जमेल तसे शिकतात. रुग्ण न बघता वैद्य होतात. विद्यापीठाचे काय सांगायचे? ते आंग्ल भाषेत स्टुडंट फ्रेंडली आहे. उपस्थिती कमी पडली तर शेवटच्या दिवसापर्यंत दिवसाचे २४ तास शिकवून त्यांची उपस्थिती पूर्ण करावी असे विद्यापीठाचे आदेश असतात. १०% अनुपस्थिती माफ करण्याचे अधिकार अधिष्ठात्यांना असतात आणि ते त्यांनी वापरावे असा संकेत असतो."
"पण ते अनुपस्थित असतात तेव्हा असतात कोठे?"
"काही जण घरी असतात. काही विद्यालयात असतात, पण वसतीग्रुहात झोपलेले असतात, उपहारग्रुहात बसलेले असतात, किंवा कट्ट्यावर गप्पा मारत असतात."
"असे आहे तर त्यांना विद्यापीठ खरोखरीचे दूरस्थ शिक्षण का घेऊ देत नाही?"
"मेडिकल कौन्सिल परवानगी देईल तर तेही होईल. पण दूरस्थ पद्धतींत रुग्ण तपासता येत नाहीत ना! तेथेच तर घोडे मार खाते आहे."


Thursday, October 22, 2015

दस~याच्या शुभेच्छा


माझ्या वाचकांना आणि हितचिंतकांना दस~याच्या शुभेच्छा

Tuesday, October 20, 2015

गर्वावर उतारा

आटपाटनगरांत गुरुजी विद्यापन करत असत. त्यांचे अनेक विद्यार्थी पुढे मोठे झाले आणि देशीविदेशी स्थायिक झाले. काही जण गुरुजींना विसरले नाहीत. गुरुपौर्णिमेला ते नेमाने गुरुजींना दूरध्वनी करून दुरून का होईना, प्रणाम करत. आणखी काहीजण कदाचित त्यांना विसरले नसतील, पण मनांतील आठवणी मनांतच राहिल्या तर ते गुरुजींना कसे कळावे. कोणी आठवण काढो अथवा न काढो, गुरुजींनी आपले विद्यापनाचे व्रत सोडले नव्हते. जे त्यांना विसरले त्यांनाही गुरुजींचा आशीर्वाद असायचाच. विद्यार्थी आपल्या मुलांसारखेच असतात अशी गुरुजींची धारणा होती. विद्यार्थ्यांनी आपण कमावले त्याच्या सहस्त्रपट पैसे कमावले याचा त्यांना आनंद असायचा. विद्यापनाची आवड म्हणून त्यांनी ते स्विकारले होते. त्यांत अर्थार्जन फारसे होणार नाही याची पूर्ण कल्पना असतांनाही त्यांनी ते अंगिकारले होते, आणि म्हणून त्यांना अजिबात विषाद वाटत नसे.
सगळेच जण गुरुजींसारखे नसतात, याची त्यांनाही कल्पना होती. पण त्या दिवशी त्यांच्या मते कहरच झाला. गुरुजींच्या एक विद्या्र्थ्याने त्यांना सल्ला विचारण्यासाठी इ-मेल केली. असे अनेक जण करत. गुरुजींनी सर्वांना विनामूल्य सल्ला दिला होता. या विद्यार्थ्यालाही ते तसेच करणार होते. पण ई-मेल च्या शेवटी एक वाक्य होते - 'माझ्या आय् फोन ६ वरून पाठविली आहे.'
"शेवटी असे लिहिण्याची काय गरज होती?" गुरुजींनी राजवैद्यांना विचारले.
"अहो गुरुजी, ते तसे आपोआपच येते" राजवैद्य म्हणाले. "ते जर नको असेल तर ते येऊ नये असे सेटिंग करावे लागते."
"तरी त्याने ते केले नाही. याच विद्यार्थ्याने पूर्वी मला मुलांच्या शिकवणी क्लासमध्ये नोकरी देऊ केली होती" गुरुजी म्हणाले.
राजवैद्यांनी खेदाने मान हलवली, पण काहीच बोलले नाहीत. गुरुजीही गप्पच राहिले.
आठ एक दिवसांनी दोघे परत भेटले.
"गुरुजी, त्या विद्यार्थ्याला काय उत्तर दिलेत?" राजवैद्यांनी विचारले.
"योग्य तो सल्ला दिला" गुरुजी म्हणाले. "कोणी विचित्रपणा केला म्हणून आपले व्रत सोडायचे नसते. पण आयुष्यात कधी नाही तो थोडासा उपरोधिकपणाही केला."
"तुम्ही आणि उपरोध?" राजवैद्यांनी आश्चर्याने विचारले. "उपरोध म्हणजे नक्की काय केलेत?"
"माझ्या ई-मेलच्या शेवटी एक ओळ लिहिली - 'माझ्या डबडा, रडतखडत चालणा~या कंप्यूटरवरून पाठविली" गुरुजी स्मितहास्य करीत म्हणाले. "अपेक्षेप्रमाणे ई-मेलला उत्तर आले नाही."
"पण तुम्ही तुमच्या आय् पॅडवरून पाठवायची होती" राजवैद्य म्हणाले. "त्यावर तुमच्या आय् पॅडवरून पाठविली असे लिहून आले असते."
"उद्देश तो नव्हता. त्या विद्यार्थ्याला विनम्रता आणि निगर्वीपणा शिकविणे हा होता. त्याच्या शिक्षणाच्या काळांत हे शिकविण्याचे कदाचित राहून गेले असावे, ते आता तरी करावे या हेतूने मी असे केले."

Sunday, October 18, 2015

एस्.व्ही.जी. चित्राचे अँनिमेशन

एस्.व्ही.जी. (SVG) हा डिजिटल चित्रांचा एक  नवा प्रकार आहे. यांत स्केलेबल व्हेक्टर ग्राफिक असते. ते रेखाचित्र असू शकते, किंवा रंग भरलेले चित्रही असू शकते. या प्रकारचे चित्र मोठे केले तरीही ते धूसर किंवा अंधुक होत नाही. येथे मी आपोआप रेखाटले जाणारे एक एस्.व्ही.जी ग्राफिक अँनिमेशन दाखविले आहे. 'draw' असे लिहिलेल्या बटणावर क्लिक करा आणि पहा.

Friday, October 16, 2015

प्रयत्नांती तारुण्य

आटपाट नगरांत राजाच्या रुग्णालयातले राजवैद्य आणि विद्यालयातले गुरुजी शेजारी होते, पण बरेच दिवस फुरसतीने गप्पा मारायला एकत्र येऊ शकले नव्हते. कारण राजवैद्य मुख्यालयांत व्यवस्थापनाबरोबर सभांना (ज्यांना आजकाल मिटिंग्ज असे म्हणतात) हजर रहाण्यात व्यस्त होते , तर गुरुजींना जनगणना आणि निवडणुकीची कामे लावली गेली होती. शेवटी आज तो योग आला.
"तारुण्य कायम राखण्यासाठी काही जण खूप प्रयत्न करत असतात. काही जण रोज व्यायाम आणि योगासने करणे, सात्विक आणि मोजका आहार करणे अशा मार्गांचा वापर करून तब्येत व्यवस्थित राखतात. त्यामुळे शरीर तरुण राहते" राजवैद्य म्हणाले. पण हल्ली एक नवाच पायंडा पडताना दिसतो."
"तो कोणता बरे?" गुरुजींनी विचारले.
"हल्ली पाश्चात्य देशांतून आपल्याकडे ब्यूटी पार्लर नावाचा एक प्रकार आला आहे. त्यांत केस पांढ~याचे काळे करून मिळतात. काळ्याचे सोनेरी किंवा लाल करून मिळतात. काळ्या केसांत मधून सोनेरी किंवा लाल बटा करून मिळतात. कुरळ्याचे सरळ करून मिळतात. वेड्यावाकड्याचे पायरी-पायरीचे किंवा स्टेप कट करून मिळतात.  त्वचा काळ्याची गोरी करून मिळते. चेहरा सौंदर्य प्रसाधने लावून आकर्षक करून मिळतो."
"अरे वा!" गुरुजी म्हणाले.
"हल्ली आमच्याकडे काही श्रीमंत स्त्रिया काही आजारांसाठी येतात. काळे आणि सरळ केलेले कापलेले केस, चेह~यावर लावलेली सौंदर्यप्रसाधने आणि महागडे कपडे म्हणजे तारुण्य असा त्यांचा समज असावा. कारण या गोष्टी त्यांच्यांत दिसतात, पण वजन अवाच्या सव्वा असते, आकार बेढब असतो, आणि चेक~यावर उग्र भाव असतात."
"असे का बरे झाले असावे?" गुरुजींनी विचारले.
"व्यायाम आणि आहारावर नियंत्रण या गोष्टींसाठी स्वतः प्रयत्न करावे लागतात आणि शरीराला क्लेश द्यावे लागतात. ब्यूटी पार्लरमध्ये जाण्यासाठी त्रास असतो तो फक्त तेथे काम करणा~यांसाठी. व्यायाम घडतो तो फक्ता त्या कर्मचा~यांना. आरशांत बघतांना स्वतः ज्या गोष्टींकडे बघतॉ त्याच गोष्टींकडे जग बघेल अशी भ्रामक समजूत करून चालले की झाले. या स्त्रियांना तसे वाटत असावे."
"श्त्रियांविषयी असे काही बोलू नका हो" गुरुजी म्हणाले. "अशा बोलण्याला पाश्चात्य देशांत सेक्सिस्ट म्हणतात. मला वातते जेंड बायस असेही म्हणतात.
"होय हो. बरे बोललात. मी आत्ताच्या आत्ता जाहीर करतो की मी असे काही म्हटलेच नव्हते. त्या व्रुत्तपत्रवाल्यांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला" राजवैद्य म्हणाले.
राजदरबारच्या राजकीय नेत्यांकडून राजवैद्य शिकले असे दिसते, असे गुरुजींच्या मनात आले.

Wednesday, October 14, 2015

शल्यक्रियेचे हातमोजे घालण्याची पद्धत

ब्लॉगपोस्टाच्या पार्श्वभूमीवर जर शित्रमालिका दाखविली तर एखादी क्रिया समजावून सांगणे सोपे जाईल असे वाटले, म्हणून हे पोस्ट लिहिले आहे. शल्यक्रिया करण्यासाठी निर्जंतुक केलेले हातमोजे घालण्याची विशिष्ट पद्धत असते. ती पद्धत येथे दाखविली आहे.







Monday, October 12, 2015

सोनोग्राफी मशिन्स आता औषध?

दिल्लीच्या तख्ताने पी. एन्. डी. टी. कायदा सुधारण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमली असे आटपाटनगरच्या राजवैद्यांनी ऐकले. समितीत तज्ज्ञ आहेत म्हणजे तिचे काम जबरदस्त असणार याबद्दल त्यांच्या मनांत अजिबात शंका नव्हती. काही कालानंतर 'पत्र नव्हे मित्र' असा बोलबाला असणा~या एका व्रुत्तपत्रांत १०-१०-२०१५ रोजी एक बातमी झळकली. सोनोग्राफी मशीन हे औषध म्हणून समजले जावे व त्याची नोंद औषधांच्या यादीत केली जावी अशी शिफारस तज्ज्ञ समिती करत आहे अशी बातमी आली होती. औषध आणि सौंदर्यप्रसाधन कायद्याच्या अंतर्गत या मशिन्सची नोंद केल्यामुळे अशा मशिनच्या निर्मितीपासून किंमतीपर्यंत सर्व गोष्टींवर आणि आयातशुल्कावर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल असा हा विचारप्रवाह आहे असे समजले.
"अहो पण या नियंत्रणाचा आणि गर्भलिंगचिकित्सा रोखण्याचा संबंधच काय?" एक वैद्य तारस्वरांत म्हणाले. दिल्लीतल्या समितीच्या तज्ज्ञ सदस्यांना थेट ऐकू जावे म्हणून ते अशा तारस्वरांत बोलले असावे असे राजवैद्यांना वाटले.
"पी. एन्. डी. टी. कायद्यांत अशा नियंत्रणाची सोय नाही तर तो कायदा सुधारा, मशिन्सना औषध म्हणू नका हो" दुस~या एका वैद्यांनी सल्ला दिला. तो तारस्वरांत नसल्यामुळे बहुधा दिल्लीपर्यंत पोहोचला नसावा.
"मशिन्स आता औषधे झाली. उद्या खूप महाग झाली म्हणून कांदे आणि डाळी-कढधान्यांना यंत्रे म्हणतील" तिसरा वैद्य म्हणाला. दिल्ली तख्ताची त्या विषयावरची तज्ज्ञ समिती तसे करेलही असे खुद्द राजवैद्यांनाही क्षणभर वाटले.
"हे वैचारीक दारिद्र्य नाही का?" एक वैद्यबाई चाचरत चाचरत म्हणाल्या.
"अहो असे म्हणू नका. दिल्ली तख्त आपली जीभ कलम करेल. राज्यकर्त्यांवर टीका करणे याला सेडिशन का कायसेसे म्हणतात आणि तो गुन्हा आहे असे परिपत्रक कोतवालाने काढले ते आपल्याला माहित नाही काय?" राजवैद्य म्हणाले. "हे वैचारीक दारिद्र्य नाही, तर वैचारीक प्रगल्भता आहे असे दहा माणसांच्या समोर म्हणा." वैद्यबाई तसे करयासाठी कक्षाबाहेर गेल्या.
"मशिन्स औषधे झाली की त्यांना एक्सपायरीची तारीखही येईल नाही का? मग काय ती टाकून द्यायची आणि नवी खरेदी करायची? दिवाळे वाजेल" एक तरुण वैद्य म्हणाले.
"अहो, समितीची मंडळी काम करून कंटाळल्यावर गंमत म्हणून काहीबाही बोलली असतील आणि वर्तमानपत्रवाल्यांनी ते छापले असेल. ते खरे धरून चालू नका. उद्या नवा मसुदा समितीने प्रसिद्ध करेपर्यंत जरा धीर धरा" राजवैद्य म्हणाले. पत्र नव्हे मित्र असणारे वर्तमानपत्र तसे करणार नाही असे त्यांच्या मनांत आले, पण कल्ली कोणाची खात्री देता येत नाही असे खुद्द महाराज म्हणाले होते ते त्यांना आठवले. मंडळी पांगली.

Saturday, October 10, 2015

पी. एन.डी.टी. आणि परमेश्वर

देशात जन्माच्या वेळी असणारे मुलगे आणि मुली यांचे प्रमाण बिघडत चालले होते. मुलगे मुलींपेक्षा बरेच जास्त व्हायला लागले होते. त्यांतले काही स्त्रीभ्रुणहत्येमुळे होते तर काही जन्मापूर्वीच मुलीऐवजी मुलगे निवडल्यामुळे होते. जनतेला असणा~या मुलग्यांच्या जबर हौसेमुळे हे घडत होते. ते थांबवावे म्हणून दिल्लीच्या तख्ताने पी.एन.डी.टी. नावाचा कायदा बनविला होता. तो आटपाट नगरांतही लागू झाला होता. कायद्याची अंमलाजावणी करण्यासाठी सरकारी बाबू आणि नगरपालिकेचे बाबू यांच्यावर बिगरसरकारी संस्था आणि सजग नागरिक यांचा प्रचंड दबाव होता. त्यामुळे त्यांच्याकडून अतिशय चोख कार्यवाही होत होती.

अशाच एका बाबूने तर कमालच केली. कायद्याप्रमाणे गर्भधारणा होण्यापूर्वी मुलगा होण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्यास मनाई होती. त्याप्रमाणे या बाबूने परिपत्रक काढले. त्यांत खालील बाबी समाविष्ट होत्या.

  1. मुलगा व्हावा म्हणून कोणीही परमेश्वराची प्रार्थना करू नये.
  2. देवळांत प्रार्थना करतांना मनातल्या मनात काहीही मागू नये. देवाकडे लोक काय मागतात ते पुजा~यांनी काळजीपूर्वक ऐकावे. जर मुलगा मागितला तर पोलीसांकडे तक्रार करावी. जर बरेच जण एकाच वेळी प्रार्थना करत असतील तर प्रत्येकाला एक सायलेंट ऑब्झर्वर वापरण्यास द्यावा व त्यावर मुद्रित झालेली प्रार्थना नंतर संबंधित अधिका~याकडे तपासण्यासाठी पाठवावी.
  3. ज्यांच्या घरी देव असतील त्यांनी प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी एफ नावाचा फॉर्म अचूकपणे भरावा. त्याच्यात आ्रधीच्या अपत्यांचे वय ब लिंग बिनचूकपणे भरावे. त्याच्यात त्रुटी राहिल्या तर संबंधित अधिका~याने कायदेशीर कारवाई करावी. आपण पुत्रप्राप्तीची मागणी केली नाही असे प्रतिज्ञापत्र  देणे प्रत्येक प्रार्थना करणा~या व्यक्तीला बंधनकारक राहील..
  4. श्री गणेशस्तोत्र म्हणण्यास बंदी आहे, कारण त्यांत स्पष्ट म्हटलेले आहे की 'द्वादशानि नामानि त्रिसंध्यं यत् पठेत् नरः ....पुत्रार्थि लभते पुत्राम्'
  5. पुत्रकामेष्टी यज्ञावर बंदी राहील.

सुदैवाने काही सजग नागरिकांनी राजाला या परिपत्रकाची वेळीच माहिती दिली आणि राजाने ते परिपत्रक वेळीच मागे घेतले. सरकारी परिपत्रके ती काढणारे बाबू आणि त्यांचे टंकलेखक सोडून इतर कोणी पटकन वाचत नसत त्यामुळे ते मागे घेण्यापूर्वी फारसे कोणी वाचले नव्हते. नाहीतर कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती धोक्यात आली असती.

Thursday, October 8, 2015

कपडे धुण्याची नवी पद्धत

आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयातील गोष्ट आहे. सलग दुस~या वर्षी पाउस कमी पडला होता. राज्यात पिण्याच्या पाण्याची ददात झाली होती. शेते कोरडी पडली होती. शेतकरी आत्महत्या करीत होते. टॅंकर करून आठवड्यांतून एकेकदा गावा गावाला पिण्यासाठी पुरवले जात होते, ज्यासाठी लोक अवाच्या सव्वा पैसे मोजत होते. सर्वत्र अशी परिस्थिती होती तरी रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये म्हणून राजाच्या रुग्णालयात मात्र चोवीस तास पाण्याचा व्यवस्थित पुरवठा होत होता. एकदा राजवैद्य एक शल्यक्रिया करून निघाले होते. हात धुण्यासाठी ते गेले तर त्यांच्या नजरेला काय अकल्पित द्रुष्य पडले.


नळ उघडा होता. त्याच्यातून धो धो पाणी वाहत होते. पाण्याच्या धारेखाली शल्यक्रियेत वापरलेला, रक्ताने भरलेला कपडा पडलेला होता.
"अरे, हे काय आहे? हा नळ असा उघडा का ठेवला आहे?" राजवैद्यांनी सेवकाला विचारले.
"सरकार, त्याचे रक्त धुवून निघावे म्हणून तो कपडा वाहत्या पाण्याखाली ठेवला आहे" सेवकाने अदबीने उत्तर दिले.
"अरे. राज्यात दुष्काळ पडला आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही आहे. आणि तुम्ही पाणी असे फुकट घालविता?" नळ बंद करता करता राजवैद्यांनी विचारले.
"सरकार, सर्वच शल्यक्रियाग्रुहांत रक्ताने माखलेले कपडे याच पद्धतीने धुतात" सेवक म्हणाला.
"आजपासून हे बंद करा. कपडे चोळून धुवा."
राजवैद्यांच्या म्हणण्यावर सेवकाने होकारार्थी मान हलविली खरी, पण ते नसताना रक्ताने माखलेले कपडे त्या जुन्याच पद्धतीने धुतले जात राहिले. हे राजवैद्यांनाही समजले. ही पद्धत त्यांनी राजाकडून फर्मान काढवून बंद करण्याचा प्रयत्न केला. पण सेवक राजालाही जुमा्नायचे थांबले.
"जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही ते खरे" राजवैद्य हताश होऊन म्हणाले. "या गुन्ह्यासाठी महाराज देहांताची शिक्षा सेवकांना देणार नाही, आणि पाण्याचा अपव्यय असाच सुरू रहाणार."

Tuesday, October 6, 2015

अक्षरांचे चित्र

कॉम्प्यूटरवर चित्रे काढण्यासाठी अनेक सॉफ्टवेअर प्रोग्राम्स उपलब्ध आहेत. फोटोशॉप आणि जिम्प हे पैसे भरून विकत घेण्याचे आणि फुकट असे दोन प्रोग्राम्स या सर्वांत आघाडीवर आहेत. येथे चित्रे काढण्यासाठी एका नव्याच तंत्राचा वापर केला आहे.




पहिले चित्र काळे-पांढरे आहे तर दुसरे रंगीत आहे. काळजीपूर्वक पाहिले तर असे लक्षांत येईल की कुंचल्याचा प्रत्येक फटकारा हा अक्षरांचा आहे. जावास्क्रिप्ट आणि एचटीएमएल ५ वापरून वेबपेजवर मी ही चित्रे काढली आहेत. टिम होल्मन यांनी हा प्रयोग यशस्वी रित्या करून इंटरनेटवर सर्वांसाठी ठेवला आहे. आपल्याला अशी चित्रे काढण्याची इच्छा असेल तर त्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.

Sunday, October 4, 2015

चुकीचे औषध


बुरी नजरवाले तेरा मुँह काला


आटपाट नगर रोजच्या कामाच्या धावपळीत होते. राजवैद्यांची धावपळ तर सामान्य जनांच्या धावपळीपेक्षा नेहमी जास्त असायची. पण आज धावपळ बाजूला ठेवून ते भ्रुकुटी वक्र करून उभे होते.
"काही कमी पडले काय सरकार?" सेवकाने त्यांना अदबीने विचारले.
"अं.."राजवैद्यांची विचारांची श्रुंखला भंगली.
"आपण नाराज दिसता आहात. काही कमी पडले काय?" सेवक म्हणाला.
"नाही. मी आताच आलेल्या स्वच्छता अभियानाच्या परिपत्रकाबद्दल विचार करतो आहे. सर्व वैद्य, अधिकारी यांनी स्व्च्छता अभियानाला एक वर्ष झाले म्हणून पंधरा दिवस अधिक जोराने स्वच्छता करावयाची आहे."
"सरकार, आम्ही सेवक स्वच्छता करावयास असतांना आपणाला हे काम करावयास का सांगितले आहे?"
"वरिष्ठांनी आज्ञा दिली की उलट प्रश्न विचारला तर पूर्वी जीभ कलम करत असत. आता तसे करत नसले तरी विभागीय चौकशी, शिस्तभंगाची कारवाई वगरे गोष्टींचा बडगा तर आहेच" राजवैद्य म्हणाले.
"सरकार, लहान तोंडी मोठा घास घेतो आहे. पण लोकांनी घाण करावयाची आणि आपण ती स्वच्छ करावयाची हे साफ चुकीचे आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून लोकांना घाण करण्यापासून पराव्रुत्त करणे हे जास्त योग्य वाटते."
"अगदी योग्य बोललास रे बाबा" राजवैद्य म्हणाले. "पण दिल्लीच्या तख्ताकडून आदेश येतात, आणि आपल्याकडे त्यांचे आंधळेपणे पालन होते. विचार करतो कोण? आजच्या राज्यकर्त्यांची हीच मोठी शोकांतिका आहे आणि त्यामुळे देश रसातळाला जातो आहे हे जाणवतेय म्हणून मी व्यथित आहे."
"जी सरकार" असे म्हणून सेवक व्यथित चेह~याने स्वच्छतेच्या कामाला गेला.

Friday, October 2, 2015

चित्रांत चलतचित्र



जीआयएफ अँनिमेशन इंटरनेटवर वापरतात. यांत हालचाली दिसतात. मोठ्या आकाराची जीआयएफ अँनिमेशन लोड व्हावयास वेळ लागतो. जर चित्राच्या एका भागातच अँनिमेशन दाखवायचे असेल तर एक स्थिर मोठे चित्र आणि त्यावर एक छोटे चलतचित्र वापरणे सोईचे होते हे माझ्या ल्क्षांत आले. त्या द्रुष्टीने मी हे पोस्ट लिहिले आहे. या पद्धतीने दोन चित्रांचा मिलाफ होऊन गोल गोल फिरणारे फासे माणसाच्या कवटीच्या दोळ्यांत फिरताना दिसत आहेत.

आणि सिनेमाग्राफ ही दुसरी एक पद्धत मला दाखवायची आहे. व्हिडियोच्या फ्रेम्स जिम्प सोफ्टवेअरमध्ये वापरून हे बनवले आहे.


प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क