Sunday, January 10, 2016

प्रतीकृती

आटपाट नगरच्या राजवैद्यांच्या दोन जुन्या विद्यार्थिनी त्यांना भेटायला वर्षांतून एकदा तरी येत असत. आपापल्या वैद्यक व्यवसायांत काय चालले आहे त्याची माहिती देत असत. थोड्या जुन्या आठवणी काढत असत. घटकाभर बोलून निघून जात असत. अशाच एकदा त्या आल्या होत्या. थोडे बोलणे झाल्यावर त्यांतली एक म्हणाली, "राजवैद्य, दूरदर्शनवर आंग्लभाषेत वैद्यांच्या रुग्णालयातील घडामोडींवर एक मालिका सुरू आहे. तिचे नाव आहे 'हाऊस एम्. डी.' आपण तो अवश्य बघावी."
"डोळ्यांना त्रास होतो म्हणून मी दूरदर्शन बघत नाही" राजवैद्य म्हणाले. "तरी पण आपण म्हणता तर बघेन."
सहा महिने गेले. दोघी राजवैद्यांना भेटायला परत एकदा आल्या. थोडा वेळ बोलणे झाले.
""राजवैद्य, दूरदर्शनवर ''हाऊस एम्. डी.' ही मालिका सुरू आहे ती बघा. छान आहे" ती मागच्या वेळी शिफारस करणारी वैद्य म्हणाली.
"मी त्या मालिकेचे तीन भाग पाहिले. तो डॉक्टर हाउस आहे ना, तो अगदी माझ्यासारखाच आहे."
त्यावर ती वैद्य खूश होऊन हंसली. आपल्याला समजले ते राजवैद्यांनाही समजले याचा तिला आनंद झाला.
"म्हणजे त्याची रुग्णांबरोबर आणि प्रशासनाबरोबर वागण्याची पद्धत माझ्यासारखीच आहे. मला त्याच्यासारखा पायाचा त्रास नाही आणि मी दुखीच्या गोळ्या सेवनही करत नाही. आता स्वतःसारखीच व्यक्ती दूरदर्शनवर काय पाहायची, म्हणून मी ती मालिका बघायचे बंद केले."
राजवैद्यांना त्यांच्या स्वभावाची व्यक्ती त्या विद्यार्थिनीने का दाखविली कोण जाणे. पण जाईपर्यंत ती स्वतःशीच स्मितहास्य करत होती.


प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क