Thursday, January 14, 2016

मराठी पाट्या

आटपाट नगरच्या जनतेने निवडून दिलेल्या पक्षाने ठराव केला की सर्व दुकानांवरच्या पाट्या मराठीत असल्या पाहिजेत. ज्या दुकानदारांनी मराठी पाट्या बनविल्या नाहीत त्यांच्यातल्या काही जणांच्या पाट्यांना डांबर फासण्यात आले. ताबडतोब उरलेल्या सर्वांनी मराठी पाट्या बनवून आपापल्या दुकानांवर लावल्या. पाट्या शुद्ध मराठीत असल्या पाहिजेत असे काही ठरावात नव्हते. त्यामुळे अमराठी दुकानदारांनी आणि जे मराठी असून त्यांना मराठी लिहिता वाचता येत नव्हते अशा जणांनी गंमतीदार पाट्या बनविल्या. त्यांची काही उदाहरणे खाली दाखविली आहेत.
साई समर्थ टूर्स आणि ट्रॅवर्ल्स
साई, समर्थ, टूर्स या तीनही शब्दांच्या शेवटच्या अक्षरावर रफार होता, त्यामूले तो ट्रॅवल्सच्या शेवटच्या अक्षरावरही असला पाहिजे असे बिचार्‍याला वाटले असावे.
मेन,स वेअर
आंग्लभाषेत Men's Wear अशी असलेली पाटी मराठीत बनविताना Men's मधला अपॉस्ट्रोफी मराठीत आणला आणि इंग्रजी व्याकरणही कच्चे असल्यामुळे अपॉस्ट्रोफी आणि स्वल्पविराम यांतला फरक न समजल्यामुळे बिचार्‍याने मेन,स असे लिहिले असावे.
कोस्ट टू कोस्ट
आंग्लभाषेतील Cost to Cost अशी असलेली पाटी मराठीत आणली खरी, पण Cost च उच्चार नीट माहीत नसल्यामुळे त्याने तो कोस्ट असा लिहिला. देशाच्या दोन किनार्‍यांमधल्या भागाबद्दल हे दुकान असावे असे ग्राहकांना वाटेल आणि आपला धंदा बुडेल याची त्याला कल्पना नसावी.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क