Monday, January 18, 2016

बागकामाने बुडविला धर्म?

गुरुजी कामावरून घरी आले. त्यांच्या पत्नीने त्यांच्या पुढ्यात चहाचा पेला ठेवला. गुरुजींनी वाफाळणार्‍या चहाचे दोन घोट घेतले आणि सुखात ऐसपैस बसले.
"अहो, आज काय गंमत झाली म्हणून सांगू" त्यांची पत्नी म्हणाली. "आपल्या पलीकडच्यांच्या सुनेने अगदी कमालच केली."
"पलीकडचे म्हणजे ..."
"तेच ते. त्यांच्या मुलाचे नवे लग्न झाले आहे ना? त्यांची सून झाडांची रोपे विकणार्‍या व्यवसायिकाकडे कामाला आहे. आपल्या घरी तिने हौसेने तुळस आणून लावली. ती छान वाढावी म्हणून तिला खत वगैरे घातले."
"मग तुळशीने जोर धरला असेल" गुरुजी म्हणाले.
"ते तर झालेच. पण घरगुती खत म्हणून तिने साध्या पाण्याऐवजी मासे धुतलेले पाणी तुळशीला घातले."
"बरं मग?" गुरुजींनी विचारले.
"अहो असे काय करता? तुळस, त्यातून ब्राम्हणी तुळस. तिला माशांचे पाणी घातले. तिची सासू कर्मठ. सुनेने धर्म बुडविला म्हणून ओरडते आहे."
"मग काय केले तिने?"
"काय करणार? तुळस धु्वून घेतली. तिची माती बदल अशी सुनेला आज्ञा केली."
"माती बदलताना मुळे धुवून घेणार का?"  गुरुजींनी विचारले. त्यांच्या बोलण्यातला उपरोध त्यांच्या पत्नीच्या लक्षांत आला नाही.
"बहुतेक" ती म्हणाली.
"तसे करतांना तुळस मेली म्हणजे?" गुरुजींनी विचारले.
"तुळस शुद्ध झाली पाहि्जे. मग ती मेली तरी बेहत्तर असे ती म्हणत होती" त्यांची पत्नी म्हणाली.
"देवा, वाचव रे त्या तुळशीला" असे मनातल्या मनात कपाळाला हात लावून गुरुजी म्हणाले.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क