Wednesday, January 27, 2016

झपाटलेले

आटपाट नगरच्या राजवैद्यांना एक वेगळीच रुग्ण बघायला मिळाली. सामान्यपणे असे रुग्ण मानसोपचारतज्ज्ञांकडे जात असत. पण ही रुग्ण नऊ महिन्यांची गर्भवती होती. म्हणून ती त्यांच्याकडे प्रथम पाठविली होती.
"राजवैद्य, या बाईंचा पती म्हणतो की त्यांना कोणत्यातरी पिशाच्चाने झपाटलेले आहे. त्यामुळे त्या मधून मधून बेशुद्ध पडतात" राजवैद्यांच्या पदव्युत्तर विद्यार्थी वैद्याने सांगितले. "आम्ही मग त्यांना मानसोपचारतज्ज्ञांना दाखविले."
"कोणाला? बाईंना की त्यांच्या पतीदेवांना?" राजवैद्यांनी विचारले.
"बाईंना" विद्यार्थी वैद्य हंसून म्हणाले. "परत असे झाले तर बाईंना जीवनसत्वे सलाईनमध्ये घालून द्या असे ते म्हणाले."
"जीवनसत्वांमुळे बाई बर्‍या होतील असे वाटत नाही" राजवैद्य म्हणाले. "त्यांना मानसोपचारांची गरज आहे."
"बाईंच्या गर्भाची वाढ नीट होत नाही म्हणून आम्ही पूर्वी त्यांना रुग्णालयांत दाखल करून घेतले होते. त्यामुळे त्यांच्या पतीदेवांनी पिशाच्च उतरविण्याची सुरू केलेली प्रक्रिया खंडित झाली आणि बाई घरी गेल्यावर सलग पाच दिवस बेशुद्ध झाल्या म्हणे."
"हं...." राजवैद्य म्हणाले. 
"आता काय करावयाचे?" विद्यार्थी वैद्याने विचारले.
"त्यांची प्रसूती करून घ्या, म्हणजे बाळाचा जीव वाचेल. मग बाईंना मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारासाठी पाठवा" राजवैद्य म्हणाले.
"आपण अशा प्रकारचे रुग्ण पूर्वी पाहिले आहेत का?" विद्यार्थी वैद्याने राजवैद्यांना विचारले.
"हो. रुग्णच का? त्या दिवशी एका  विद्यार्थी वैद्याने रजा घेतली, पण रजेचा अर्ज न देता उलट हजेरीपटावर सही केली अशी तक्रार त्याचे वरिष्ठ माझ्याकडे करत होते. त्याला सही करायची नव्हती, पण कोणीतरी त्याला तसे करण्यास भाग पाडले म्हणे. ते भाग पाडणारे कोण होते कोण जाणे."
"असे?"
"ते तर काहीच नाही. तक्रार करणार्‍या त्या वरिष्ठांनी स्वतःच्या रजेच्या दिवशी उशीरा येऊन रजा रद्द केली, हजेरीपटावर सही केली आणि लवकरची वेळ टाकली, आणि त्या गोष्टीचे छायाचित्र आग्यावेताळ वैद्यांनी घेतले म्हणे. हा पण झपाटण्याचाच प्रकार नाही का? म्हणजे छायाचित्र घेणे नव्हे, सही करणे."
विद्यार्थी वैद्यांना या दोनही गोष्टी माहित होत्या असे दिसले. उत्तरादाखल ते मंदसे हंसले.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क