Wednesday, January 20, 2016

बाळंतिणीच्या कानांत कापूस

आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयात प्रसूत झालेल्या स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिन, मुलांसाठी झबली वगैरे विकण्यासाठी राजाने एक गरजू अपंगाला प्रसूतीकक्षाबाहेर बसण्यासाठी जागा दिली होती. तो त्यातून पोटापाण्यापुरते मिळवत असे. स्त्रियांचीही सोय होत असे.
"हा विक्रेता मोठा हुशार आहे. ग्राहकांना काय पाहिजे ते तो बरोबर जोखून आहे" राजवैद्य गुरुजींना म्हणाले.
"अरे वा!" गुरुजी म्हणाले. "नक्की काय करतो तो?"
"त्याच्याकडे मुलांना गुंडाळण्यासाठी निळी दुपटी आणि अंगात घालण्यासाठी निळी झबली मिळतात. मुलींसाठी याच गोष्टी तो गुलाबी रंगाच्या ठेवतो. स्त्रिया खूष असतात."
"अगदी पाश्चात्य लोकांसारखे करतोय तो" गुरुजी म्हणाले.
"आपल्या आणि पाश्चात्य संस्कृतीचा मिलाफ घडवून आणतो तो" राजवैद्य म्हणाले. "बाळंतिणीला कानांत घालण्यासाठी कापसाचे बोळे सुद्धा विकतो तो."
"ते कशाला? गुरुजींनी विचारले.
"बाळंतिणीच्या कानांत वारा जाऊ नये म्हणून कानांत कापूस घालण्याची आपल्याकडे प्रथा आहे" राजवैद्य म्हणाले.
गुरुजींनी त्यांच्याकडे अचंभ्याने पाहिले. राजवैद्यांनी उत्तरादाखल स्मित केले.
"यात पाश्चात्य संस्कृती कोठे आली?" गुरुजींनी विचारले.
"मुलगा झाला तर तो निळे कापसाचे बोळे विकतो, आणि मुलगी झाली तर गुलाबी बोळे विकतो" राजवैद्य म्हणाले.
"आणि जुळे मुलगा-मुलगी झाले तर?" गुरुजींनी विचारले.
"तर एक निळा आणि एक गुलाबी अशा दोन बोळ्यांची पाकिटे मिळतात त्याच्याकडे" राजवैद्य म्हणाले.
"आणि लोक ते विकत घेतात?" गुरुजींनी विचारले.
"हो तर" राजवैद्य म्हणाले.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क