Monday, January 4, 2016

वैद्यकनीतीची ऐशीतैशी

आटपाट नगरचे राजवैद्य भृकुटी वक्र करून अनंतात पहात होते.
" राजवैद्य, आपण कोणत्या विचारांत व्यग्र आहात" गुरुजींनी विचारले.
"अं..." राजवैद्य भानावर आले. "काही नाही. मनाला त्रास देणारी जुनी आठवण आली. अशा आठवणी विस्मरणात जात नाहीत हा एक शापच आहे."
"राजवैद्य, तो शाप नसतो. तो आपल्याला आपली मुल्ये जपायला शिकवितो. त्याला परमेश्वराची कृपा समजायला हवे. कोणती आठवण आपल्याला आज व्यथित करते आहे?"
"वैद्यकी हा धंदा नाही, तो एक उदात्त व्यवसाय आहे असे हल्ली सर्वजण म्हणतात. मी तो वसा आयुष्यभर जपला. पण इतर सर्वांबद्दल मला तसे म्हणता येत नाही आमच्या रुग्णालयात एक वैद्य आहेत. त्या इतरांना ही गोष्ट कशी समजत नाही याबद्दल वेळोवेळी, जागोजागी बोलत असतात. त्यांच्याबद्दलची ही आठवण आहे. त्या आमच्या रुग्णालयात बदली होऊन आल्या, तेव्हा आमच्या बरोबरच्या, आम्हाला कनिष्ठ असणार्‍या त्यांच्या एका वरिष्ट वैद्यांनी काही महत्वाच्या कामासाठी दोन दिवसांची रजा मंजूर करून घेतली होती. ते दोन दिवस आमचे शल्यक्रिया करण्याचे होते. आम्ही आणि या नव्या वैद्य मिळून दोन शल्यक्रियागृहांत एकाच वेळी काम करून सगळ्या शल्यक्रिया पार पाडू असा मला विश्वास होता. ऐन वेळी या वैद्य मला म्हणाल्या, की त्यांना तेच दोन दिवस रजा घ्यायची होती. त्यासाठी आपल्या वरिष्टांची रजा रद्द करा असे त्या म्हणाल्या. आपल्याला रजा का हवी याचे त्यांनी काही स्पष्टीकरण दिले नाही. त्यांच्या वरिष्ठांची रजा ऐन वेळी रद्द करणे शक्य नव्हते असे मी त्यांना सांगितले. रुग्ण शल्यक्रियांसाठी कक्षांत सर्व तयारीनिशी दाखल झाले होते, त्यामुळे त्या शल्यक्रिया पुढे ढकलणे शक्य नव्हते हेही मी त्यांना सांगितले. त्यांनी त्या दोन दिवसांनंतर रजा घ्यावी असेही सुचविले. काही न बोलता त्या निघून गेल्या. त्या दोन दिवशी काहीही संपर्क न साधता त्यांनी दांडी मारली. शल्यक्रियेच्या दोन टेबलांकडे आलटून पालटून धावपळ करत मी सर्व शल्यक्रिया पार पाडल्या. कोठे काही अडथळा आला नाही ही परमेश्वरा्ची कृपा. तिसर्‍या दिवशी त्या कामावर आल्या तेव्हा त्यांनी एक शब्दानेही दिलगिरी व्यक्त केली नाही. ही तेव्हाचीच गोष्ट आहे असे नाही. घरी, परिचितांकडे काही छोटे मोठे काम निघाले की या वैद्य मधली इतकी सर्व वर्षे बिनदिक्कत गैरहजर रहात आल्या आहेत. ज्या रुग्णांच्या सेवेचा वसा घेतला आहे त्यांना आयुष्यात कायम दुय्यम स्थान देणार्‍या या वैद्य कायम इतरांना वैद्यक व्यवसाय एक धंदा बनविला आहे अशी दूषणे कशी देतात ते मला समजत नाही."
"राजवैद्य, माणसे अशीही असतात. आपण व्यथित होऊ नका. त्यामुळे अशी माणसे कधीही सुधारणार नाहीत. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले आहे त्याप्रमाणे आपण आपले कर्तव्य करत रहा, आणि बाकी सर्व परमेश्वरावर सोडा" गुरुजी म्हणाले.
"होय गुरुजी" राजवैद्य म्हणाले. भगवान श्रीकृष्णांवर विश्वास टाकल्यावर त्यांना शांत वाटले.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क