श्री गणपतीबाप्पा, देवाधिदेवा,
मी आपला एक भक्त, वर्षभर माझी सुखदुःखे आपल्याला सांगत असतो. हे पत्र लिहिण्यास कारण की सध्या सर्वत्र गणेशोत्सव सुरू आहे. त्या सर्व आवाजात माझा छोटासा आवाज कदचित आपल्यापर्यंत पोहोचायचा नाही. जे सांगायचे आहे ते पुढे ढकलण्यासारखे नाही. बाप्पा, लहानपणी आपला उत्सव म्हटला की आनंदाचे आणि उत्साहाचे भरते येत असे. आता अशी परिस्थिती आली आहे की पोटात भीतीचा गोळा येतो. आपल्या आगमनापासून सुरुवात होते. दिवसाउजेडी आपल्याला प्रतिष्ठापनेसाठी न आणता अर्ध्या रात्री वाद्यांच्या प्रचंड कोलाहलात आणले जाते. छातीत धडधडून मोडलेली झोप पुन्हा लागत नाही. आता अनंतचतुर्दशीपर्यंत कायकाय सहन करावे लागणार आहे त्याची ती नांदी असते. दिवसभर आणि कोर्टाच्या आदेशांचे उल्लंघन करून मध्यरात्रीपर्यंत ध्वनीवर्धकावर लहान मुले आणि स्त्रिया यांच्यासमोर ऐकायलाही लाज वाटावी अशी गाणी ब~याचदा लावलेली असतात. आपल्या दर्शनाच्या वेळी कानांत त्या गाण्यांचे शब्द येव्हढ्या मोठ्याने आदळत असतात की प्रार्थनेचे शब्द उच्चारता येत नाहीत. इतर वेळी आपल्याच आरत्या लागतील असा काही नेम नसतो. अनेक देवांच्या आणि साधूंच्या आरत्या आणि भक्तीगीते तेव्हढ्याच मोठ्या आवाजात ऐकावी लागतात. आपल्याला आपापल्या घरी आणून पूजण्यासाठी इतकी मंडळी गावाला गेलेली असतात की दैनंदीन कामे होत नाहीत. बस मिळत नाहीत. टॅक्सी आणि रिक्षावाले भाडे नाकारतात. आपल्याला आणण्यासाठी आणि नेण्यासाठी काढलेल्या मिरवणुका सारे रस्ते व्यापून असतात. त्यामुळे वाहतूक बंद असते. अशा वेळी डॉक्टर रुग्णालयात पोहोचू शकत नाहीत आणि अत्यवस्थ रुग्ण वाहतुकीत अडकलेल्या रुग्णवाहिकेतच राम म्हणण्याची शक्यता असते. आपले गल्लोगल्लीचे वेगवेगळे राजे म्हणून आगमन होते. एकच देव इतक्या राजांच्या रूपात कसा येऊ शकतो हे वर्तमानकाळाचे कोडे आहे. काही काही ठिकाणी तर आपल्या नावाचे फलक राजाधिराज म्हणून लागलेले मी पाहिले आहेत. त्यांतले काही राजेच नवसाला पावतात, जेथे भक्तांची तुंबळ गर्दी होते. काही दिवसांनी वेगवेगळ्या राजांच्या प्रजांमध्ये युद्ध होईल अशी मला खूप भिती वाटते आहे. आपल्या नावावर सक्तीने वर्गणी वसूल करण्यात येते असे हायकोर्टाचे निरीक्षण त्या दिवशी वर्तमानपत्रात वाचले. जमवलेला पैसा नक्की कसा खर्च होतो त्याचा पत्ता नसतो असेही हायकोर्ट म्हणाले. मदिरा पिऊन लोकांनी आपल्या विसर्जनास जाऊ नये असे पोलिसांचे आवाहन वाचण्यात आले. त्या अर्थी काहीजण तसेही करत असणार असे वाटते. मिरवणुकांच्या वेळी ध्वनीप्रदूषणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून ढोल, ताशे, इलेक्ट्रिक बॅंजो, डीजे वगैरेंचा इतका प्रचंड कानठळ्या बसविणारा आवाज असतो, की त्या स्पंदनांच्या ठेक्यात त्यांच्याच बरोबरीने छातीचे हाड आणि आंतले ह्रुदय थरथरते. ते बंद पडत नाही ही केवळ आपली क्रुपा. मिरवुणीकीच्या पुढे तरुण मुले आणि मुली अंगाला आळोखेपिळोखे देऊन आणि अंगविक्षेप करून न्रुत्य करत असतात, ते खूपदा पाहवत नाही. हे विघ्नहर्त्या, या सर्व त्रासांना आपण आवरावे, त्या त्रास देणा~यांना सुबुद्धी द्यावी अशी आपल्या चरणी नम्र प्रार्थना आहे.
आपला नम्र भक्त.