Thursday, September 10, 2015

चालेल

राजवैद्यांनी एका रुग्णाला तपासून तिच्या विकाराचे निदान केले. मग तिला ते समजावून सांगितले. तिला ते समजले आहे असे जाणवल्यावर त्यांनी तिला तिच्या औषधोपचारांची माहिती दिली.
"बाई, या गोळ्या तुम्ही तोंडाने पाण्याबरोबर सकाळ-संध्याकाळ घ्यावयाच्या आहेत. या दुस~या गोळ्या तोंडाने पाण्याबरोबर दिवसातून तीनदा रिकाम्या पोटी घ्यावयाच्या आहेत. हे पिण्याचे औषध एकेक चमचा सकाळ-संध्याकाळ घ्यावयाचे आहे."
"चालेल" बाई म्हणाल्या.
राजवैद्य चक्रावले. चालेल म्हणजे काय? औषध जसे घ्यावयाचे असते तसेच ते घ्यावे लागते. त्या बाबतीत चालण्याचा - न चालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा ब~याच स्त्रियांनी राजवैद्यांना 'चालेल' असे आतापर्यंत म्हणून झाले होते. आतापर्यंत त्यांनी काहीच म्हटले नव्हते. आज त्यांचा संयम संपला.
"चालले नाही तरीही ही औषधे मी सांगितली त्याच प्रकारे घ्यावयाची आहेत" राजवैद्य म्हणाले.
बाईंनी राजवैद्यांकडे चमकून पाहिले. क्षणभर विचार केला. मग त्या हसल्या आणि म्हणाल्या "बरे".

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क