ती एक छानशी मांजर होती. कालपरत्वे ती वयात आली आणि पुढे तिला पिल्लंही झाली. ती पिल्ले कोणी कोणी नेली. एक पिल्लू तिच्यापाशी उरलं. त्याच्यावर तिचं जिवापाड प्रेम होतं. एक दिवस ते पिल्लू दिसेनासं झालं. कोणी म्हणालं त्याला बोक्याने खाल्लं. कोणी म्हणालं त्याला कोणीतरी पकडून पोत्यांत घालून कोठेतरी नेलं आणि त्याचं काहीतरी केलं. नक्की काय झालं ते कोणालाच समजलं नाही. मांजरीलाही समजलं नाही. बिचारी आपल्या पिल्लाला शोधत सर्वत्र फिरली. दिवसांमागून दिवस गेले, पिल्लू काही सापडलं नाही, पण तिचा शोध काही थांबला नाही. तिच्यावर बेतलेला हा छोटासा चलतचित्रपट.
आयुष्यात अनेक प्रकारची माणसे भेटली आणि अनेक प्रकारचे प्रसंग घडले. काही चांगले, काही वाईट. त्यांतल्या लक्षात रहातील अशा व्यक्ती आणि घटना येथे मांडल्या आहेत. समोर येणा~या अडचणींतून मार्ग काढतांना बरंच काही शिकायला मिळालं. तेही लिहिलं आहे. त्यांतून माझा स्वतःचा मोठेपणा दाखविण्याचा हेतू बिलकूल नाही. इंटरनेटवर असलेली माहिती जगाच्या पाठीवर असणा~या कोणालाही घेता येते म्हणून हा सगळा प्रपंच. त्यांतले बरे वाटेल ते घ्या. जर त्यातून कोणाचा फायदा झाला तर हा सगळा खटाटोप सार्थकी लागला असे मला वाटेल.