Sunday, September 20, 2015

इच्छाश्रवण

इच्छाश्रवण
देवाने श्रवणशक्ती असलेला प्राणी बनविला, तेव्हा जो ध्वनी कानांवर पडेल तो ऐकण्याची शक्ती त्याला दिली. या यंत्रणेत जर दोष निर्माण झाला तर बहिरेपणा येणे, चित्रविचित्र आवाज ऐकू येणे (उदाहरणार्थ टिनिटस) असे श्रवणाचे विकार होऊ लागले. सिझोफ्रेनिया या मानसिक विकारात ध्वनी नसताना ऐकू येणे हे लक्षण दिसते (हॅलुसिनेशन). इतपत माहिटि सर्व वैद्यांना आणि ब~याच सामान्य माणसांनाही असते, जशी ती गुरुजींनाही होती. पण एक घटना अशी घडली की गुरुजी चक्रावले. शेवटी त्यांनी ते राजवैद्यांना विचारले.
"राजवैद्य, आज मोठी विचित्र घटना घडली. आमच्या एका शिक्षिकेच्या वर्गांत एक विद्यार्थिनी आहे. त्या मुलीचे शिक्षणांत लक्ष नाही त्याबद्दल तिच्या पालकांना सांगण्यासाठी बोलावले होते. मुलीची आई आली. तिच्याबरोबर बोलताना त्या शिक्षिकेने म्हटले, की जर मुलीने मन लावून अभ्यास केला नाही तर तिचे नुकसान होईल. तर शाळेत आम्ही प्रयत्न करत आहोतच, पण मुलीच्या आईवडिलांनी घरी तिच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे. त्यावर ती आई उसळून म्हणाली, की मुलीला शाळेतून काढून टाकू असे आपण कसे म्हणता? असे काय केले आहे यिने की तुम्ही तिला शाळेतून का्ढून टाकायला निघालात? आम्ही परोपरीने सांगितले की असे कोणीही म्हटले नाही, पण ती काही ऐकूनच घेईना. आपण आपल्या कानांनी तसे ऐकले असे तिचे पालुपद सुरूच. शेवटी कशीबशी समजूत काढून तिला घरी पाठविले. हे असे का झाले हे काही समजत नाही. तिला मानसिक विकार असावा असे काही वाटत नाही."
"गुरुजी, चूक ना तुम्हा शिक्षकांची, ना त्या विद्यार्थिनीच्या आईची. या प्रकाराला मी इच्छाश्रवण असे म्हणतो. माणुस जेव्हा प्रचंड मानसिक तणावाखाली असतो, तेव्हा कधीकधी त्याला इतर लोक काय म्हणतात ते ऐकू येत नाही, आलेच तर समजत नाही, आणि कधीकधी इच्छाश्रवण होत. म्हणजे जे आपल्याला ऐकावे लागेल ते त्याला ऐकू येते. कधीकधी जे ऐकण्याची त्याची आत्यंतिक इच्छा असते ते त्याला ऐकू येते. या स्त्रीला ज्या गोष्टीची भिती वातत होती ते तिला ऐकू गेले. आमच्याकडे सु्द्धा अलिकडेच अशीच एक रुग्ण आली होती. तिला बराच जंतूसंसर्ग झाला होता. मी तिला म्हटले की आपण औषधोपचारांनीच तुम्हाला बरे करू, शल्यक्रियेची आवश्यकता भासेल असे वातत नाही, आठवड्याभरात तुम्ही ब~या व्हाल. तासाभराने तिचा भाऊ मला भेटायला धावत पळत आला. म्हणाला, आपल्या बहिणीने हाय खाल्ली आहे. ति म्हणतेय की आपण तिला म्हणालात की तू आठवडाभरच जगशील. खरेच का हो ती आठवडाभरच जगेल? मी हतबुद्ध झालो. मी काय म्हटले होते ते मी त्याला समजावून सांगितले. मग तो शांत झाला आणि निघून गेला."
"अशा परिस्थितीत काय करावयाचे?" गुरुजींनी विचारले.
"ही गोष्ट घडून गेल्यावर काहीही करता येत नाही. असा प्रसंग येईल असे आधीच वाटले, तर एखादा त्रयस्थ साक्षीदार उपस्थित ठेवणे उपयुक्त ठरेल. जर सोय असेल तर संभाषण ध्वनीमुद्रित करणे सर्वात चांगले."
"माणसांना असे होऊ नये म्हणून काही करता येणार नाही का?" गुरुजींनी विचारले.
"गुरुजी, जे काही करायचे ते असे होणा~या माणसांनीच करायचे असते. मानसिक संतुलन राखणे आणि वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे या द्वारे असे श्रवण टाळता येईल. पण ते समजून घेतले तर ना!"

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क