Saturday, September 5, 2015

शिक्षकदिन

"आज शिक्षकदिन. म्हणजे आपली गुरुपौर्णिमा असते ती नव्हे. हा पाश्चात्यांनी जगाला दिलेला शिक्षकदिन" आटपाटनगरीचे गुरुजी पत्नीला सांगत होते.
"आज तुमचा दिवस आहे तर तुम्ही असे खिन्न का?" पत्नीने विचारले.
"त्या एरवी दीन असणा~या शिक्षकांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी आज शिक्षक काळ्या फिती लावून काम करत होते" गुरुजी म्हणाले. "त्यांच्यावर ही पाळी आली म्हणून मन उदास झाले आहे. राजदरबारी त्यांची कोणीही दखलही घेत नाही आहे."
"तेव्हढेच, की आणखी काही?" पत्नीने विचारले.
"आमच्याकडील एका कडक स्वभावाच्या शिक्षकांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना केक आणला, स्वतः बनविलेले शुभेच्छा पत्र दिले. एरवी कडक असणारे ते शिक्षक तेव्हा तोंड भरून हसत होते. विद्यार्थ्यांना आपण त्रास देऊ नये म्हणून त्यांनी असे केले आहे, आपल्यावरील प्रेमामुळे नाही हेही त्यांना समजले नाही. असे इतरही शिक्षक आणि विद्यार्थी आहेत. त्यामुळेही मन उदास आहे."
पत्नी गप्पच राहिली.
"ज्यांना प्रेमाने आणि कळ्कळीने शिकविले असे काही विद्यार्थी फेसबूक, ट्विटर आणि व्हॉट्सॅपवर आपल्या शिक्षकांविषयी काहीबाही लिहित आहेत असे ऐकले. त्यामुळेही मन उदास आहे."
पत्नीला गुरुजंची व्यथा समजली, पण तिच्याकडे त्यासाठी काही उतारा नव्हता.
"एक दिवस शिक्षकांचा म्हणून गाजवायचा आणि वर्षाचे उरलेले दिवस त्यांची अवहेलना करायची, या गोष्टीला आयुष्यभर पहात आलो. आता या दिवसाचा फोलपणा जाणवतोय म्हणून उदास वाटतेय" गुरुजी  म्हणाले.
"थोडा गरम गरम चहा घ्या. बरे वाटेल. मनाचा उदासपणा जाईल" पत्नी म्हणाली. "एक लक्षांत घ्या. ही सर्व माया आहे. तुम्ही भगवत्गीतेत सांगितल्याप्रमाणे सर्व परमेश्वराच्या चरणी अर्पण करा. सुख त्याचे, दुःखही त्याचे. मग मनाला असा त्रास होणार नाही."
एरवी पत्नीला चार गोष्टी शिकविणारे गुरुजी आज तिच्या मुखातून हे ऐकून क्षणभर संभ्रमित झाले, मग आनंदाने हसले आणि म्हणाले, तू म्हणतेस ते खरे आहे. हे मी विसरलो होतो. आठवण करून दिलीस त्याबद्दल आभारी आहे."

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क