Friday, September 18, 2015

मुलगी? आमची नाही.

आटपाट नगरातल एका संध्याकाळी राजवैद्य आणि गुरुजी फिरायला म्हणून निघाले होते.
"राजवैद्य, हे लडकी बचाओ अभियान कसे चालले आहे?" गुरुजींनी विचारले.
"चांगले चालले आहे. पण लोकांची मानसिकता बदलायला हवी तशी बदलत नाहीये."
"ते कसे?"
"थोडीशी उदाहरणे पाहिली तर ते तुमच्या लगेच लक्षात येईल बघा. मध्यंतरी आमच्याकडे एका स्त्रीची प्रसूती झाली. तिला आधीच्या सहा मुली होत्या. तिच्या पतीने कक्षांतील दुस~या एका स्त्रीला झालेला मुलगा आणि त्याची मुलगी यांची गुपचूप अदलाबदल केली. अर्थात तो पकडला गेलाच. परत मुलगी झाली म्हणून चाळीतले सगळे जण आपल्याला हंसतील म्हणून आपण असे केले असे तो म्हणाला."
"अरे बापरे" गुरुजी म्हणाले.
"दुस~या एका स्त्रीला दोन मुलींवर तिसरी मुलगी झाली. आपल्या्ला झालेले मूल पण पाहिले आणि ती मुलगी आहे असे लिहून आई आणि बाप अशा दोघांनी सह्यासुद्धा केल्या. बाळाच्या पायाचे ठसेसुद्धा घेण्यात आले. दुर्दैवाने तिच्या शल्याक्रियेच्या नोंदी करताना शिकाऊ वैद्यांनी मुलगा अशी नोंद केली. त्यावरून त्या पित्याने रामायण घडविले. आपल्याला मुलगाच झाला आणि रुग्णालय आपल्या गळ्यांत मुलगी मारते आहे असा त्याने कांगावा केला. शेवटी डी.एन्.ए. चाचणी करून ती मुलगी त्याच जोडप्याची आहे हे सिद्ध केले तेव्हा कोठे ते आपल्या मुलीला घेऊन घरी गेले."
"काय माणसे असतात!" गुरुजी म्हणाले.
"मागे एक ग्रुहस्थ बाह्यरुग्णविभागांत आला होता. त्याला आधीच्या बारा मु्ली होत्या. आता त्याच्या पत्नीचा नववा महिना चालू होता. तो गर्भ मुलगा आहे की मुलगी ते सांगा असे तो म्हणत होता. अशा गोष्टीला कायद्याने बंदी आता आली आहे, पण तेव्हा नव्हती. आता लवकरच तिची प्रसूती होईल, तेव्हा मुल्गा की मुलगी ते कळेलच असे सांगून आम्ही त्याला परत पाठवले. मुलगा की मुलगी हे समजल्यावर येव्हढ्या मोठ्या गर्भाचे तो काय करण्याच्या विचारात होता देव जाणे."
"लग्न होऊन बरीच वर्षे मूल न होणा~या एका स्त्रीला हल्लीच तिळे झाले. मुले अपु~या दिवसांची अहेत आणि प्रसूती झाली तर ती कदाचित दगावतील असे आम्ही तिला समजा्वून सांगितले तरीही आपल्याला खूप त्रास होतो म्हणून आपल्याला मोकळी करा असा हेका तिने धरला होता. आम्ही तसे करत नव्हतो. शेवटी तिची प्रसूती झाली. तिला दोन मुलगे आणि एक मुलगी झाली. तशी ती व्यवस्थित दिसत होती. पण तिच्या प्रसूतीपूर्व वागण्यावरून ती आपल्या मुलांना प्रथम पाजेल आणि दूध उरले तरच मुलीला पाजेल अशी आम्हा सर्वांना भिती वाटत होती. शेवटी आम्ही तिने तसे करू नये असे तिचे समुपदेशन केले. आपण तसे करणार नाही असे आश्वासन तिने दिले तेव्हाच आम्ही तिला घरी पाठविले. पुढे तिने काय केले आणि आज तिची मुलगी कशी आहे ते परमेश्वरच जाणे.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क