Wednesday, September 16, 2015

भिंतीला चार कान

आटपाट नगरच्या गुरुजींचे शेजारी चौकस स्वभावाचे होते. गुरुजींच्या घरी कोणीही आले की शेजारी हजर होत. पाहुणे कोण, कशाला आले आहेत वगैरे चौकशी सहज केल्यासारखी करत आणि मगच आपल्या घरी अात. सुरुवातीला राग आला तरी नंतर गुरुजींना या गोष्टीची सवय झाली.
एक दिवस गुरुजींकडे रात्री साडेअकरा वाजता एक ग्रुहस्थ आले. ते गुरुजींच्या एका पुस्तकाचे प्रकाशक होते. काही जरूरीच्या कामासाठी ते येव्हढ्या  रात्री गुरुजींची परवानगी घेऊन आले होते. गुरुजींनी त्यांना घरात घेतले आणि आवाजामुळे शेजारपाजारच्यांना त्रास नको म्हणून दार बंद केले. पाच दहा मिनिटांत त्यांचे संभाषण आटोपले. गुरुजींनी त्यांना घरी जाण्यासाठी दार उघडून दिले आणि पहातात तर काय, शेजारचे ग्रुहस्थ आणि त्यांची आई गुरुजींच्या दाराजवळ भिंतीला कान लावून उभे होते. आपल्या घरांत काय संभाषण चालले आहे ते माय-लेक चोरून ऐकत आहेत हे गुरुजींच्या लक्षांत आले. आपल्याला गुरुजींनी रंगेहात पकडले हे दोघांच्या लक्षांत आले. तोंडातून अवाक्षर न काढता दोघे वळले आणि आपल्या घरांत जाऊन त्यांनी दार लावून घेतले.
"त्यांना चोरून ऐकायचे होते तर ते दाराबाहेर कशाला आले?" गुरुजी पत्नीला उद्देशून म्हणाले. "आपल्या दोघांच्या घरांमधल्या भिंतीला स्वतःच्या घरांतून कान लावता आले असते."
"अहो, दाराजवळची भिंत एका विटेची आहे. दोघांच्या घरांमधली भिंत दोन विटांची आहे. या लोकांनी प्रयोग करून कोठच्या भिंतीतून आपल्या घरांतले संभाषण ऐकू येते ते पाहून ठेवले असणार. म्हणून पकडले जाण्याचा धोका पत्करून दोघे दाराबाहेरच्या भिंतीला कान लावून उभे राहिले असणार" गुरुजींची पत्नी म्हणाली.
कालांतराने शेजारच्या माणसाची आई व्रुद्धत्वाने वारली. काही वर्षे गेली. एके दिवशी गुरुजींच्या घरी एक परिचीत आले. काही जटील समस्येवर संभाषण सुरू होते. बोलता बोलता आवाज वाढला.
"अहो, शेजारी बाहेर उभे राहून आपल्या घरांतील संंभाषण ऐकत आहेत असे वाटते" गुरुजींची पत्नी म्हणाली.
गुरुजींनी दार उघडून पाहिले. शेजा~याची पत्नी गुरुजींच्या दाराकडे कान करून उभी होती. गुरुजींनी आपल्याला चोरून ऐकताना पकडले हे लक्षांत येताच ती वरमली, जोराने खोटेच हंसली. गुरुजींनी उद्विग्न वाटले. काहीही न बोलता त्यांनी दार लावून घेतले.
"नवरा आणि सासू यांची गादी शेजारीण पुढे चालवतेय असे दिसते" गुरुजी पत्नीला म्हणाले. "अडीअडचणीला कासावीस झाले की आपल्याला रात्री बेरात्री हक्काने बोलावतात आणि स्वतःचे सर्व सुरळीत आहे असे वाटते तेव्हा आमच्या घरांत छिद्रे शोधायला येतात त्यांना लाज कशी वाटत नाही?"
"काय सांगावे?" गुरुजींची पत्नी म्हणाली. "परमेश्वारानेच त्यांनाही घडविले आहे. त्यांच्या अशा वागण्याचे काहीतरी प्रयोजन असेलही."

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क