Showing posts with label भाषाशास्त्र. Show all posts
Showing posts with label भाषाशास्त्र. Show all posts

Thursday, January 14, 2016

मराठी पाट्या

आटपाट नगरच्या जनतेने निवडून दिलेल्या पक्षाने ठराव केला की सर्व दुकानांवरच्या पाट्या मराठीत असल्या पाहिजेत. ज्या दुकानदारांनी मराठी पाट्या बनविल्या नाहीत त्यांच्यातल्या काही जणांच्या पाट्यांना डांबर फासण्यात आले. ताबडतोब उरलेल्या सर्वांनी मराठी पाट्या बनवून आपापल्या दुकानांवर लावल्या. पाट्या शुद्ध मराठीत असल्या पाहिजेत असे काही ठरावात नव्हते. त्यामुळे अमराठी दुकानदारांनी आणि जे मराठी असून त्यांना मराठी लिहिता वाचता येत नव्हते अशा जणांनी गंमतीदार पाट्या बनविल्या. त्यांची काही उदाहरणे खाली दाखविली आहेत.
साई समर्थ टूर्स आणि ट्रॅवर्ल्स
साई, समर्थ, टूर्स या तीनही शब्दांच्या शेवटच्या अक्षरावर रफार होता, त्यामूले तो ट्रॅवल्सच्या शेवटच्या अक्षरावरही असला पाहिजे असे बिचार्‍याला वाटले असावे.
मेन,स वेअर
आंग्लभाषेत Men's Wear अशी असलेली पाटी मराठीत बनविताना Men's मधला अपॉस्ट्रोफी मराठीत आणला आणि इंग्रजी व्याकरणही कच्चे असल्यामुळे अपॉस्ट्रोफी आणि स्वल्पविराम यांतला फरक न समजल्यामुळे बिचार्‍याने मेन,स असे लिहिले असावे.
कोस्ट टू कोस्ट
आंग्लभाषेतील Cost to Cost अशी असलेली पाटी मराठीत आणली खरी, पण Cost च उच्चार नीट माहीत नसल्यामुळे त्याने तो कोस्ट असा लिहिला. देशाच्या दोन किनार्‍यांमधल्या भागाबद्दल हे दुकान असावे असे ग्राहकांना वाटेल आणि आपला धंदा बुडेल याची त्याला कल्पना नसावी.

Friday, January 8, 2016

दुट्टीची गोष्ट

आटपाट नगरच्या राजाच्या सर्व कर्मचार्‍यांना मराठी भाषेची १०वीची परीक्षा उत्तीर्ण होणे प्रशासनाने सक्तीचे केले होते. राज्यातल्या जनतेच्या भाषेत सर्व व्यवहार झाले तर जनतेचा फायदा होईल असा त्यामागचा विचार होता. विचार व नियम स्तुत्य होते याबद्दल काहीच शंका असण्याचे कारण नव्हते. नियम राजाच्या रुग्णालयांत नेमणूक होण्याची इच्छा बाळगणार्‍या वैद्यांनाही लागू होता. जर १०वीच्या परीक्षेत मराठी विषय घेतलेला नसला, तर स्वतंत्रपणे तेव्हढ्या विषयाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय नोकरी मिळत नसे. अर्थात परीक्षा उत्तीर्ण झाली म्हणून मराठी समजत असे अशातली गोष्ट नव्हती.
उत्तर भारतवर्षातील अशाच एका अमराठी भाषिक वैद्याने राजाच्या रुग्णालयात नोकरी मिळवली. पण या वैद्यांना मरठीचा ओ की ठो समजत नसे. रुग्णांबरोबर संवाद साधण्यासाठी त्यांना नेहमी दुभाषा लागत असे. राजवैद्यांनी या वैद्यांना एकदा स्पष्ट विचारले की त्यांनी मराठीची परीक्षा खरोखरच उत्तीर्ण केली होती का, तर त्यांनी उत्तरादाखल आपली त्या परीक्षेची गुणपत्रिकाच दाखविली.
"मग आपल्याला आम्ही बोलतो ते समजत का नाही?" राजवैद्यांनी विचारले.
"मी गेल्या पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहून या वर्षी कोणते प्रस्न विचारले जाणार ते ठरवले, आणि त्यांची उत्तरे पाठ केली. त्यामुळे मी पास झाले" वैद्यबाई आंग्लभाषेत म्हणाल्या.
राजवैद्यांनी मनांतल्या मनांत कपाळाला हात लावला.
वैद्यबाईंची कालक्रमणा दुभाषाच्या मदतीने सुरूच राहिली. कालांतराने त्यांनी नियमाप्रमाणे मराठी भाषेत रजेसाठी अर्ज केला. तो अर्ज वाचून राजवैद्यांना हसावे की रडावे तेच कळेना.
"मला दिनांक ९६-९२-२०९५ ला रजा द्यावी. त्या काळात माझी दुट्टी वैद्य अमुक-तमुक करतील."
बाईंना १ आणि ९ मधला फरक समजत नसावा, त्यामुळे त्यांनी १६-१२-२०१५ ऐवजी ९६-९२-२०९५ असे लिहिले असावे हे राजवैद्यांच्या लक्षांत आले. पण दुट्टी म्हणजे काय ते मात्र त्यांना समजले नाही. त्यांनी वैद्यबाईंना बोलावून घेतले आणि दुट्टी या शब्दावर बोट ठेवून ते काय आहे असे विचारले.
"ड्यूटी (Duty)" असे वैद्यबाईंनी सांगितले. येव्हढे साधे मराठी राजवैद्यांना स्वतः मराठी भाषिक असून समजू नये याचे आश्चर्य त्यांच्या चेहेर्‍यावर स्पष्ट दिसते होते.
"आपण लिहिलेल्या शब्दाचा उच्चार ड्युटी असा न होता दुट्टी असा होतो" राजवैद्य संयमाने म्हणाले. "दुट्टी असा शब्द मराठी भाषेत नाही. आपण रजेचा अर्ज नीट शु्द्ध मराठी भाषेत लिहून देता की आहे त्याच स्थितीत महाराजांकडे पाठवू?"
अर्ज दुरुस्त करून आणते असे सांगून वैद्यबाई गेल्या. दुसर्‍या दिवशी अर्ज परत आला.
"अरे वा, इतक्या सुवाच्य अक्षरांत आणि अतिशय शुद्ध भाषेत अर्ज आलाय. त्यांनी नक्कीच कोणाकडून तरी तो भरून घेतला असणार" राजवैद्य म्हणाले.
"मीच भरून दिला" अर्ज घेऊन आलेल्या रुग्णालयाच्या लिपिक-टंकलेखिका म्हणाल्या. "त्यांनी खूपदा सांगूनही इतक्या चुका केल्या की शेवटी स्वतःच अर्ज भरून देणे जास्त बरे हे माझ्या लक्षांत आले."
राजवैद्य हंसले.

Saturday, August 8, 2015

फुल्ली

"अहो गुरुजी, आमच्या शिकणा~या वैद्यांनी नवेनवे शब्द वापरायला सुरुवात केली आहे. कधी कधी काय  म्हणतात तेच कळत नाही" राजवैद्य गुरुजींना म्हणाले.
"एखादे उदाहरण दिलेत तर बरे होईल" गुरुजी म्हणाले.
"आता प्रसूती होतांना गर्भवतीला तपासतात, तेव्हा गर्भाशयाचे मुख किती उघडले आहे ते पहावे लागते. ते पूर्ण उघडते तेव्हा ते १० सेंटीमीटर असते. मग त्यांतून बाळ बाहेर येऊ शकते. ते पूर्ण उघडले आहे हे सांगायसाठी आमचे विद्यार्थी म्हणतात, 'राजवैद्य, ती गर्भवती फुल्ली आहे."
"फु्ल्ली? तिला ते फुल्ली का म्हणतात? तिला त्यामुळे राग येणार नाही का?"
"ते तर झालेच. पण फुल्ली म्हणजे काय आणि त्याचा तिच्या उपचारांशी संबंध कसा जोडायचा ते समजेना. शेवटी त्यांना विचरले तेव्हा शोध लागला. मध्यंतरी आमच्याकडे पाश्चात्य देशांतले विद्यार्थी आले होते. आंग्लभाषेत ते गर्भाशयाचे मुख पूर्ण उघडले असण्याच्या स्थितीला 'फुल्ली डायलेटेड ' असे म्हणायचे. ते आमच्या विद्यार्थीमित्रांना फार आवडले. बोलले मराठीतून, तरी त्यांत 'फुल्ली डायलेटेड' मात्र आंग्लभाषेतले म्हणायचे. मग त्याचा सोईसाठी अपभ्रंश करून फक्त 'फुल्ली' म्हणायला लागले. आता बोला."
"मनोरंजक आहे" गुरुजी म्हणाले. "आंग्लभाषा, मराठी भाषा, आणि आपली सोय यांचा किती मजेशीर मिलाफ करता येतो ते बघून मजा वाटली."


प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क