Friday, July 31, 2015

घरटे रिकामे केले कोणी?

आमच्या घरासमोरील आंब्याच्या झाडाच्या फांद्यांमध्ये कावळे घरटी बांधतात आणि अंडी घालतात. त्यांतून कधीकधी पिल्ले येतात आणि मोठी होऊन त्यांचे कावळे होतात. हे सर्व एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट पहायचे असे आम्ही ठरवले. हालच्या चित्रांत अंडी उबविणारी कावळीण दिसते आहे.

ही कावळीण काही काळ कोठेतरी गेली तेव्हा तिच्या घरट्याचा घेतलेला फोटो खाली दाखविला आहे. त्याच्यांत एक हिरवट रंगाचे अंडे दिसते आहे. त्याच्या बाजूला एक आंब्याचे पान आहे आणि त्याच्या पलिकडे लालसर रंगाचे एक पिल्लू दिसते आहे.


खालील चित्रांत घरट्यातले एक पिल्लू.थोडे मोठे झालेले दिसते आहे. आता त्याचा रंग सफेद दिसतो आहे.


यापुढची त्या पिल्लांची वाढ आपण पाहू शकत नाही, कारण कलेकलेने वाढणारी ती दोन पिल्ले एक एक करून मरण पावली. मगे ती दिसेनाशी झाली. ती पिल्ले त्या कावळ्यांनीच खाऊन टाकली असावीत, करण त्यांच्या घरट्याजवळ इतर कावळे फिरकतही नसत.


Wednesday, July 29, 2015

राक्षसी खेळ

गुरुजींचा एक विद्यार्थी जरा वेगळा होता. त्याचे काय करायचे हे त्यांच्या लक्षांत येत नव्हते. शेवटी त्यांनी राजवैद्यांचा सल्ला मागितला.
"राजवैद्य, हा विद्यार्थी जरा वेगळा आहे. तो काय करतो? त्याला एखादे झुरळ सापडले, तर ते पकडतो. मग तो त्याचा एक एक पाय खेचून तोडतो. प्रत्येक पाय तोडल्यावर खुशीत हसतो. पाय संपले की त्याच्या मिशा एक एक करून तोडतो. अशा वेळी त्याचे तोंड पाहवत नाही."
"हा मुलगा जरा नाही, बराच वेगळा आहे" राजवैद्य गंभीरपणे म्हणाले. 'मोठा झाल्यावर तो मारामा~या, गुंडगिरी वगैरे करेल, मोठा खुनशी गुन्हेगार होईल असे वाटते."
"त्याला काही उपाय?" गुरुजींनी विचारले.
"मुलांच्या मानसोपचारतज्ज्ञाला दाखविले व वेळीच उपचार केले तर फायदा होण्याची शक्यता आहे."
"मोठेपणी असे झालेल्या रुग्णांना आपण पाहिले आहे का?" गुरुजींनी विचारले.
"हो तर. रुग्णच का, इतर अशी माणसेही पाहिली आहेत. आपल्या राजाच्या रुग्णालयांत एक अशा मनोव्रुत्तीचे वैद्य आहेत. हाताखालच्या शिकाऊ वैद्यांना, विद्यार्थ्यांना, कमजोर व्यक्तींना हे वैद्य अशाच प्रकारे छळतात."
"म्ह.. म्हणजे?" गुरुजी चाचरले.
"हात पाय तोडत नाहीत हो" राजवैद्य हसून म्हणाले. "घाबरू नका. बहुतेक वेळा मानसिक छळच करतात. पण पाठमो~या उभ्या असणा~या एका कुबड्या विद्यार्थिनीच्या कुबडाला त्यांनी एकदा पाठून येऊन हात लावला होता. तिचा तेव्हा झालेला चेहरा अजून आठवतोय" राजवैद्य विषण्णपणे म्हणाले.
"हं."
"त्यांच्या लहानपणी मानसोपचारतज्ज्ञ असते तर किती बरे झाले असते" गुरुजी म्हणाले.

Monday, July 27, 2015

शल्यक्रिया करणार कोण?

आटपाटनगरचे राजवैद्य आणि गुरुजी दुपारच्या चहाच्या वेळी एकत्र भेटले.
"गुरुजी, या आठवड्यांत एक रुग्ण उपचारांसाठी आली होती. मी तिला तपासून शल्यक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला. तिने शल्यक्रियेची संपूर्ण माहिती विचारून घेतली. मग म्हणाली 'माझी शल्यक्रिया आपणच करणार ना?'" राजवैद्य म्हणाले.
"मग आपण होय म्हटलेत?" गुरुजींनी विचारले.
"छे हो! होय कसे म्हणायचे? दिवसाला मोठ्या सहा आणि छोट्या दहा शल्यक्रिया होतात. प्रत्येक रुग्णाची शल्यक्रिया मीच केली तर त्या श्रमांमुळे मी मरून जाईन. आमच्याकडे मी सोडून बरेच वैद्य आहेत, जे शल्यक्रिया मोठ्या कौशल्याने करतात. प्रशिक्षणार्थी वैद्यही आहेत, जे आमच्या मदतीने सल्यक्रिया करतात आणि शिकतात. त्या सर्वांनी काय करायचे? बरे, हा काही आमचा खाजगी व्यवसाय नाही, की पैसे घेतले म्हणजे शल्यक्रिया आम्हीच केली पाहिजे. येथे सर्वांना निःशुल्क उपचार करून मिळतात. महाराजांचा नियमच आहे की असे आश्वासन कोणत्याही रुग्णाला द्यायचे नाही."
"मग आपण काय म्हटलेत?" गुरुजींनी विचारले.
'मी म्हटले की जर मी मोकळा असलो तर मी शल्यक्रिया करेन. जर तिच्यापेक्षा अधिक दुर्धर व्या्धी असलेला रुग्ण असला, तर त्याला माझी जास्त गरज असल्यामुळे मी त्याची शल्यक्रिया करेन. पण तिच्या शल्यक्रियेसाठी एक कुशल  वैद्य उपलब्ध असेल हे पहाण्याची जबाबदारी माझी."
"छान. मग तिचे समाधान झाले असेल" गुरुजी म्हणाले.
"छे हो! तिचे आपले एकच पालुपद, माझी शल्यक्रिया आपणच करा. ऐ्केच ना" राजवैद्य म्हणाले.
"मग आपण काय केलेत?" गुरुजींनी विचारले.
"मी म्ह्टले, बाई ग, तुझी व्याधी इतरांपेक्षा जास्त दुर्धर असावी अशी तुझी इच्छा आहे का? तसे निघाले, तरच मी तुझी शल्यक्रिया करू शकेन. मग ती शांतपणे निगून गेली. आज तिची शल्यक्रिया एका प्रशिक्षणार्थी वैद्याने माझ्या मदतीने यशस्वीपणे पार पाडली. ती आता आनंदात आहे."
"छान" गुरुजी म्हणाले.

Saturday, July 25, 2015

संदेश





संदेश ...

प्रिय वाचकहो ...



एचटीएमएल मध्ये डायलॉग बनविणे वाटले तेव्हढे सोपे नव्हते. आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा. ...

Tuesday, July 21, 2015

रथाचा सारथी आणि इंटरनेटचा प्रवासी

गुरुजींचा सातासमुद्रापारच्या विदेशांत वास्तव्यास असणारा एक जुना विद्यार्थी आटपाटनगरांतील आप्तेष्टांना भेटण्यासाठी आला होता. गुरुजींबद्दल त्याला अतीव आदर आणि आपुलकी होती. त्यामुळे तो आल्यादिवशीच त्यांच्या घरी पोहोचला. गुरुपत्नीने दिलेले गूळ-पाणी सेवन केल्यावर गुरुशिष्यांच्या गप्पा रंगल्या. त्याच्या विदेशाबद्दलच्या गोष्टी ऐकून गुरुजींना लवकरच आपल्या देशांत काय घडणार याची कल्पना आली.
"हे इंटरनेटचे मायाजाल खूप उपयुक्त आहे, तसेच धोकादायकही आहे" तो म्हणाला. "नवनवी माहिती मिळवणे, त्वरेने इतरांबरोबर संपर्क साधणे वगैरे त्याचे खूप उपयोग आहेत. पण तेथे कोणीही मनाला आवडेल ते लिहू शकतो. त्यामुळे कधीकधी चुकीच्या, कधी असत्य, तर कधीकधी अतिशय गलिच्छ प्रकारच्या गोष्टी तेथे सापडतात. आपल्यावर कोणाचा अंकुश नाही अशी मानसिकता असल्यामुळे, आणि इंटरनेटवर सर्वजण समान आहेत असा समज असल्यामुळे नको तेव्हढ्या धिटाईने तेथे लिखाण होत असते."
"असं?" गुरुजी चक्रावून म्हणाले.
"हो ना. मोठमोठ्या हुशार आणि कर्त्रुत्ववान माणसांच्या पंक्तीत हे विशेष योग्यता नसणारे लोक, कधी उघडपणे तर कधी अनामकितेच्या पाठी लपून जाऊन बसत असतात. आपण काही त्रिकाल सत्य सांगतो आहोत अशा अविर्भावात ते काहीही लिहित असतात."
"म्हणजे आपल्या रथाच्या सारथ्यांसारखेच झाले म्हणायचे" गुरुजी म्हणाले. "मनसबदारांचे स्वतः सारथ्य केलेले रथ आणि भाड्याचे रथ किंवा मालवाहू गाड्या यांचे सारथी त्याच रस्त्यांवर रथ हाकत असतात. हातात रथाच्या घोड्यांचा लगाम असला की सगळे सारथी सारखेच असे त्यांना वाटते - भले ते विद्वान असोत की अशिक्षित, कर्त्रुत्ववान असोत की कर्त्रुत्वहीन. त्यांचे बोलणे आणि वागणे सारखेच अरेरावीचे आणि उर्मटपणाचे असते."
"खरे आहे" तो जुना विद्यार्थी म्हणाला. गुरुजी स्वतः रथ बाळगत नाहीत याचे हेही एक कारण असावे असे त्याच्या मनांत आले. "विदेशांतही ते असेच आहे. रथांच्या चालकांचे एकवेळ सोडा. पण लिहिलेली प्रत्येक गोष्ट खरी मानणा~या जनतेला इंटरनेटवर सहज फसायला होते. ज्याला नीरक्षीरविवेक आहे तोच तेथे तगून जातो."
नीरक्षीरविवेक किती कमी माणसांना असतो याची गुरुजींना कल्पना होती. त्यांनी खेदाने मान हलवली.

चिमट्याचा चिमटा

आटपाट नगरात वैद्यकीय सेवा प्रगत म्हणाव्या अशा होत्या. आंग्लदेशांत प्रसूती अडलेल्या स्त्रीला मोकळे करण्यासाठी मुलाच्या डोक्याला चिमटा लावतात तसा चिमटा राजाच्या रुग्णालयांतही लावत असत. हा चिमटा लावण्याचे विशिष्ट असे तंत्र असे. चिमट्याची दोन पाती मुलाच्या डोक्याच्या दोन बाजूंना लावावी लागत असत. जर ती तिरकी लावली तर मुलाचे डोके खूप दाबले जाऊन अंतर्गत रक्तस्त्राव होणे, कवटीचे हाड मोडणे वगैरे होण्याचा धोका असे.
त्या दिवशी राजवैद्य अस्वस्थ दिसत होते. गुरुजींनी आपल्या आणि त्यांच्या घरांच्या मधल्या कुंपणावरून ही गोष्ट पाहिली.
"राजवैद्य, आपण अस्वस्थ का आहात?" गुरुजींनी कुंपणावर रेलून विचारले.
"अहो, आमच्याकडे एक सहाय्यक वै्द्य आहेत. प्रसूतीच्या वेळी मुलाच्या डोक्याला चिमटा लावावा लागला, तर ते हटकून चिमटा तिरका लावतात. ते धोक्याचे असते. तो सरळच लावायचा असतो."
"पण त्यांना तसे करतांना थांबवीत का नाही?" गुरुजींनी विचारले.
"ते रात्रपाळीच्या वेळी चिमटा लावतात तेव्हा कोणी वरिष्ठ उपस्थित नसतात. ही गोष्ट दुस~या दिवशी समजते.".
"पण ते तुम्हाला दुस~या दिवशी कसे समजते?"
"त्या चिमट्याचे वळ मुलाच्या नाजूक त्वचेवर दिसतात ना. कपाळावर, डोळ्यांभोवती असे वळ दिसले की समजायचे, चिमटा तिरपा लावला होता."
"त्यांना समजावून सांगून सुधारायला हवे" गुरुजी म्हणाले.
"अहो, आपण तिरपा चिमटा लावला असे ते कबूलच करत नाहीत. आपण चिमटा व्यवस्थितपणे लावला होता असेच ते म्हणतात" राजवैद्य म्हणाले.
"मग ते वळ कसे उठतात? की ते वैद्य चिमटा लावतांना ते प्रसूत न झालेले अर्भक नको नको अशा अर्थी डोके हलवते आणि चिमटा डोक्याच्या बाजूंना न लागता समोर आणि पाठी लागतो?" गुरुजी बोलून गेले.
अर्भकाला 'नको नको' अशा अर्थी डोके हलविता येते का आणि येत असले तरी प्रसूतीमार्गांत डोके गच्च अडकलेले असतांना त्याला तसे करता येईल का हे बहुधा गुरुजींना उमजले नसावे अशा शंकेने राजवैद्यांनी गुरुजींकडे पाहिले. गुरुजींचे मिस्किल स्मिहास्य पाहून त्यांना गुरुजींचा उपरोध समजला आणि ते सुद्धा हसले.

Sunday, July 19, 2015

पॉवरपॉईंटच्या सहाय्याने अँनिमेशन चित्रपट

मी पॉवरपॉईंट वापरून कार्टून कशी बनवायची हे पुर्वी लिहिले होते. तेव्हा मी त्या कार्टून्सचा उपयोग करून अँनिमेशन चित्रपट बनविता येईल असे म्हटले होते. आता तेच तंत्र वापरून मी एक छोटासा अँनिमेशन चित्रपट बनविला आहे. बघा कसा वाटतो ते. स्पीकर्स सुरू ठेवलेत तर पार्श्वसंगीतही ऐकता येईल.


(Keywords: Powerpoint, animation movie)

Friday, July 17, 2015

भावनापत्र

गुरुजी घरी आले. पत्नीने दार उघडले. त्यांच्या हातांत एक लिफाफा होता.
"हे काय आणलेत आज?" तिने विचारले.
"अग, माझ्या दोन जुन्या विद्यार्थांनी मला हे शुभेच्छा पत्र दिले आहे." गुरुजी म्हणाले.
"बघू तरी" असे म्हणून तिने ते हातांत घेतले आणि उघडले. पहिल्या पानवर सुरेखशी फु्ले होती. आंतल्या पानावर खालील मजकूर होता.
_______________________________________________________________
आपण नसता तर
आमचा शिक्षणाचा काळ
येवढा छान आणि फलदायी झाला नसता.
आपल्या आयुष्यांत
खूप माणसे येतात.....
पण त्यांतली अगदी थोडी जणं
आपल्याला असा परिस स्पर्श करतात
की आपल्या आयुष्याचे सोने होऊन जाते,
गुरुजी, आपण जसे आहात,
तसे असल्याबद्दल
मी परमेश्वराचा शतशः ऋणी आहे.
________________________________________________________________

"किती छान लिहिलेय हो" ती कौतुकाने म्हणाली.
"आधी मला पण तसेच वाटले. पण मग लक्षांत आले की ते छापील आहे. त्यांत आहे तसे त्यांच्या मनांत होते असेल असे नाही." गुरुजी म्हणाले.
"अहो, काहीतरीच काय? बाजारांत खूप शुभेच्छापत्रे मिळतात. प्रत्येकांत संदेश वेगवेगळा असतो. आपल्याला हवा तो संदेश असेल ते पत्र आपण खरेदी करायचे असते. त्या विद्यार्थ्यांना छापलेय तसेच म्हणायचे असणार."
"असे म्हणतेस?" गुरुजी म्हणाले. त्यांची कळी खुलली.
किती साधे आहेत हे, असा भाव त्यांच्या पत्नीच्या चेहे~यावर आला. गुरुजींना गूळ-पाणी आणण्यासाठी ती वळली.

Wednesday, July 15, 2015

मनोरुग्ण वैद्य

आटपाट नगरचे राजवैद्य आणि गुरुजी सायंकाळी एकत्र फिरायला म्हणून बाहेर पडले होते. समोरून एक वेडा हातवारे करत आणि मोठ्यामोठ्याने ओरडत येत होता. त्याला पाहून गुरुजींना एक जुना अनुत्तरीत प्रश्न आठवला.
"राजवैद्य, वेड्या रुग्णांवर उपचार करणारे वैद्य कालांतराने स्वतः वेडे होतात असे मी ऐकले आहे. ते खरे आहे काय?"
"नाही हो. ती एक भ्रामक समजूत आहे. वेडेपणा हा काही संसर्गजन्य रोग नसतो" राजवैद्य  म्हणाले.
"नशीब. नाहीतर वैद्यच वेडा झाला तर रुग्णांचे व्हायचे काय?" गुरुजी म्हणाले.
"वैद्यसुद्धा मनोरुग्ण असतात हो" राजवैद्य  म्हणाले.
"काय सांगता काय?" गुरुजी आश्चर्याने म्हणाले.
"असे वैद्य रुग्णांवर उपचार करू लागले तर कठीण परिस्थिती येऊ शकते. पण आजार नियंत्रणात असताना जर योग्य विचार करून त्यांनी व्यवस्थापकीय काम घेतले, तर तेव्हढी कठीण परिस्थिती येत नाही. मोठमोठ्या रुग्णालयांतले प्रमुख किंवा उपप्रमुख वैद्य स्किट्झोफ्रेनिया या आजाराने ग्रस्त असल्याचे इतिहास सांगतो."
"आपल्या रुग्णालयांत असे वैद्य होते का?" गुरुजींनी विचारले.
"हो. पण क्रुपा करून त्यांची नावे विचारू नका." राजवैद्य  म्हणाले.
"पण ते असे असल्याचे विद्यार्थीदशेत लक्षांत आले, तर त्यांना वैद्य होण्यापासून थांबविता येत नाही का?"
"कल्पना चांगली आहे, पण तसे आजवर झालेले नाही. मुलांचे पालक त्याला विरोध करतात. मध्ये आमच्याकडे असा एक विद्यार्थी होता. बरोबरच्या विद्यर्थिनींना तो अश्लील संदेश पाठवायचा. घाणेरडी छायाचित्रे पाठवायचा. प्रकरण कोतवालीत गेले होते. त्याचे वडील मध्यपूर्वेच्या देशांत गडगंज कमवीत होते. त्यांनी ते प्रकरण दाबून टाकले. मुलगा हुशार होता, पण हुशारी भलत्याच गोष्टींत चालू लागली. कसाबसा वैद्य झाला. मग काही उद्योग न करता निवडक शिक्षकांच्या बद्दल सोशल मिडियात गलिच्छ भाषेत लिहायला लागला. स्वतः पुरुष असून स्त्रीची छायाचित्रे स्वतःची म्हणून इंटरनेटवर टाकू लागला. उत्तरेच्या खेड्यांत रहात असूनही आपण प्रगत विदेशांत रहातो असे सांगू लागला."
गुरुजींचे डोके गरगरले. "सोशल मिडिया आणि इंटरनेट म्हणजे काय ते समजले नाही" ते म्हणाले.
"ते विदेशी तंत्रज्ञान आहे. तुमच्या मुला-नातवंडांना ते समजेल, तुम्हाला नाही. अजून आपल्याकडे त्याचा प्रसार झालेला नाही. ते असो. त्याला उपचार करण्यासाठी त्याचे पालक आणत नाहीत तोवर काहीच करता येत नाही. आमच्या रुग्णालयांत हा एक, पण जगांत असे किती असतील."
"आपण ज्या वैद्याकडे औषधोपचारांसाठी जातोय तो स्वतःच मनोरुग्ण निघाला तर काय, या विचाराने भिती वाटते हो" गुरुजी म्हणाले.
"आम्ही आहोत ना? चिंता करू नका" राजवैद्य  म्हणाले.
"होय हो. पण तुम्ही आम्ही एक दिवस वर जाणार. आमच्या मुलाबाळांचे काय होईल या विचाराने भिती वाटते" गुरुजी म्हणाले.
"परमेश्वरावर विश्वास ठेवा, गुरुजी. 'परित्राणाय साधूनाम्, विनाशाय च दुष्क्रुताम्' असे भगवान श्रीक्रुष्णांनी सांगितले आहे. ते या दुष्क्रुतांचे निर्मूलन करतील" राजवैद्य  म्हणाले.

Monday, July 13, 2015

जबर आत्मविश्वासाचा पाया

राजवैद्य नुकतेच कनिष्ठ सहवैद्यांच्या नियुक्तीच्या मुलाखती घेऊन आले होते. त्यांच्या पत्नीने गुळाचा खडा आणि पाणी त्यांच्या समोर आणून ठेवले होते. ते कपाळावरचा घाम पुसत असतांना आपल्या घरी जाता जाता गुरुजी त्यांच्या घरांत डोकावले.
"काय राजवैद्य, कशा काय झाल्या मुलाखती?" गुरुजींनी विचारले.
"या गुरुजी. बसा. अहो, गुरुजींना गूळ पाणी द्या जरा."
"नको" गुरुजी म्हणाले. "घरी जायला पाहिजे."
'मुलाखती नेहमीप्रमाणेच झाल्या" राजवैद्य म्हणाले. "तसेच उमेदवार, तेच तेच प्रश्न, तशीच उत्तरे..."
"नवे नवे उमेदवार येतात तर नवे अनु्भव येत असतील ना?" गुरुजींनी विचारले.
"येतात ते अनुभव कथन करण्यासारखे नसतात" राजवैद्य म्हणाले.
"मी समजलो नाही" गुरुजी म्हणाले.
"इतरांपेक्षा वेगळे असे थोडे उमेदवार असतात. त्यांचा आत्मविश्वास प्रचंड असतो. आयुष्यभर ज्ञान वेचले तरी असणार नाही असा तो आत्मविश्वास असतो. प्रत्येक सत्रांत असा एक उमेदवार तरी असतोच."
"प्रचंड ज्ञान आणि कर्त्रुत्व असणारे सहवैद्य मिळत असतील तर वाईट काय आहे?" गुरुजींनी विचारले.
"अहो, त्यांचे ज्ञान आणि कर्त्रुत्व प्रचंड नसते हो." राजवैद्य म्हणाले.
"मग मूर्ख असणार" गुरुजी म्हणाले.
"अं हं! मूर्ख नाही, अती शहाणे असतात. आपली निवड नक्की होणार अशी त्यांची खात्री असते. आणि त्याचे कारण प्रचंड ज्ञान आणि कर्त्रुत्व नसून शिफारस हे असते. मंत्री, मनसबदार, सचिव वगैरे लोकांकडून या उमेदवारांची निवड करा असे आदेश असतात. ते त्यांना माहित असते. मग का बरे प्रचंड आत्मविश्वास असणार नाही?"
गुरुजी स्तब्ध झाले. राजवैद्यांच्या मनाला होणा~या यातना, या विषवल्लीच्या फळांचे होणारे समाजावरचे दूरगामी परिणाम हे सगळे त्यांच्या डोळ्यांपुढून झरकन गेले. काही न बोलता गुरुजी उठले, पायांत वहाणा सरकवल्या आणि घराकडे निघाले. राजवैद्यांनी पत्नीने दिलेला गुळाचा खडा तोंडात टाकला, पण त्यांना तो गोड काही लागला नाही.

Saturday, July 11, 2015

परमेश्वराचा न्याय

आटपाटनगरचे राजवैद्य खुशीत होते. राजाच्या दुस~या दोन रुग्णालयांतील राजवैद्यांवरोबर नव्या सहाय्यक वैद्यांच्या नियुक्तीसाठी मुलाखती घेण्याचा कार्यक्रम पार पाडून ते आपल्या रुग्णालयांत परतले होते.
"राजवैद्य, आज खुशीत दिसताय. काही विशेष?" गुरुजींनी विचारले.
"गुरुजी, परमेश्वरावर माझा नितांत विश्वास आहे. पण त्याचा न्याय बहुतेक वेळा याच जन्मांत पहायला मिळत नाही. आज मात्र माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले."
"असे काय झाले तरी काय?" गुरुजींना रहावेना.
"अहो, मध्यंतरी दक्षिणेच्या रुग्णालयांतील राजवैद्यांनी संचालकांचे कान भरून आमचे एक सहाय्यक वैद्य स्वतःच्या रुग्णालयासाठी पळविले, तर उत्तरेच्या रुग्णालयांतील राजवैद्यांनी संचालकांचे कान भरून आमचे दोन सहाय्यक वैद्य स्वतःच्या रुग्णालयासाठी पळविले. आमच्याकडून वेतन घेऊन इतरांचे काम करविण्याची ही जुनी खोड आहे. आम्ही जंगजंग पछाडले, पण काही उपयोग झाला नाही. उलत आम्हाला त्यांनी खिजवून दाखविले. दक्षिणेच्या रुग्णालयांतील राजवैद्य आणि त्यांचे निकटचे सहकारी यांनी अधिकाराच्या जोरावर एका वरिष्ठ वैद्यांना अगदी सळो की पळो करून टाकले होते. कंटाळून त्यांनी राजाच्या चवथ्या रुग्णालयांत कायम स्वरूपी बदली मागून घेतली."
"बरे, मग?" गुरुजींनी विचारले.
"हल्लीच दक्षिणेच्या रुग्णालयाचे वैद्यकीय महासंघाने परीक्षण केले. त्यांत उत्तीर्ण होण्यासाठी म्हणून तर आमचे सहाय्यक वैद्य त्यांनी पळवले होते. एका वरिष्ठ वैद्याची कमतरता आहे या कारणास्तव त्यांच्या रुग्णालयाची मान्यता रद्द होईल असा खलिता त्यांना आला आहे. त्याचे उत्तर त्यांनी दिले, तर परत तशाच मसुद्याचा खलिता परत आला आहे. ते राजवैद्य स्वतःच्या डोक्याचे केस उपटत बसले होते. मुलाखतींच्या कामकाजांतही त्यांचे लक्ष नव्हते. त्यांनी आम्हाला त्रास दिला आणि स्वतःच्या वरिष्ठ वैद्यांचा छळ केला, त्याची चांगली शिक्षा परमेश्वराने त्यांना दिली. बदली करून घेतांना पुढे त्याचा असा परिणाम होईल याची कल्पना त्या वरिष्ठ वैद्यांना होती असणार. उत्तरेच्या राजवैद्यांनाही धक्का बसला आहे. या दोन्ही राजवैद्यांनी प्रत्येकी दोनदोन सहाय्यक वैद्यांची नवी पदे स्वतःसाठी निर्माण करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता.दक्षिणेच्यांना दोन पदे कागदोपत्री तरी मिळाली, पण उत्तरेच्यांना तीही मिळाली नाहीत. असे का म्हणून तेही निषेध व्यक्त करीत होते."
"त्यांचे नेहमीचे कुरघोडीचे राजकारण या वेळी चालले नाही वाटते" गुरुजी म्हणाले.
"अहो, आमच्यासारख्या सभ्य आणि सरळमार्गी वैद्यांवर कुरघोडी करणे आणि परमेश्वरावर कुरघोडी करणे सारखेच असते काय?" राजवैद्य सानंद म्हणाले.

Wednesday, July 8, 2015

तबकधारिणी

आटपाट नगरातल्या राजाच्या राजवैद्यांच्या कपाळावर आठी बघून मास्तर विचारात पडले. एखादा निदान करण्यास अवघड असा रुग्ण आला की एखाद्या रुग्णाची तब्येत अनपेक्षितपणे खालावली?
"वैद्यराज, सर्व काही क्षेम आहे ना?" गुरुजींनी विचारपूस केली.
"अं... ह..हो. तसे पाहिले तर सर्व काही क्षेम आहे" राजवैद्य उत्तरले.
"मग ही कपाळावरची आठी?"
आपल्या कपाळावर आठी दिसते आहे हे राजवैद्यांना तेव्हा कुठे समजले.
"अहो गुरुजी काय सांगू? आमचा तो राक्षस आहे ना..."
"राक्षस म्हणजे सर्वांना छळणारे ते सहवैद्य का?" गुरुजींनी विचारले.
"तेच ते. त्यांचे वर्तन आठवून कपाळावर आठी पडली. आज मी रुग्णांना तपासण्याच्या फेरीवर चाललो होतो, तेव्हा पाहिले, तर एक पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी वैद्य मुलगी शल्यक्रियाग्रुहाबाहेर अवघडून उभी होती. अंगावर शल्यक्रियाग्रुहात घालायचे हिरवे कपडे होते. दोन्ही हातांवर तिने हिरव्या कपड्यांची एक जोडी तबकांत धरावी तशी तोलून धरली होती. शल्यक्रियाग्रुहाचा सेवकसुद्धा असा कपडे धरून उभा रहात नाही. मी तिला विचारले की ती अशी का उभी आहे, तेव्हा पत्ता लागला की राक्षस समोर विश्रामकक्षांत बसला होता आणि तो बाहेर आला की त्याला ते कपडे देण्यासाठी ती तेथे उभी होती."
"राक्षसाचे वर्तन राजेशाही दिसते" गुरुजी म्हणाले.
"अहो, महाराजांना एक वेळ जे शोभेल तसे वर्तन राक्षसाला कसे शोभेल? मी स्वतः राजवैद्य असून मी सर्व आयुष्यांत असा कधी वागलो नाही."
"मग तुम्ही काय केलेत?" गुरुजींनी विचारले.
"ते कपडे त्यांना दे आणि शल्यक्रियाग्रुहांत जा असे मी तिला सुचवले" राजवैद्य म्हणाले. "पण ती हसली आणि नको असे म्हणाली."
"शेजारच्या भोजनकक्षांतले एक जेवणाचे ताट तिला द्यायचे होतेत" गुरुजी म्हणाले "त्यांत कपडे ठेवून उभी राहिली असती तर तबकांत ठेवल्यासारखे वाटले असते."
राजवैद्य हंसले.

Tuesday, July 7, 2015

जास्वंदाच्या खोडावर मुळे

आठवडाभर मुसळधार पाऊस पडला आणि लहानपणापासून ऐकत आणि पहात आलो त्या झाडांबाबतच्या सगळ्या गोष्टी घडल्या. पानांवरची धूळ निघून गेल्यामुळे आमची झाडे हिरवीगार दिसू लागली. तजेलदार झाली. वा~यावर डोलू लागली. एरवी फुलांमध्ये जाऊन रहाणा~या आणि फुले काढली की चावणा~या मुंग्या दिसेनाशा झाल्या. पण या सगळ्या गोष्टींहून अगदी वेगळी अशी एक गोष्ट घडली, जी गूगलवर शोधूनही इतर कोठे घडल्याची नोंद सापडली नाही.


आमच्याकडे लाल रंगाच्या फुलांची दोन जास्वंदाची झाडे आहेत. एकाची फुले पांच पाअळ्यांची असतात, तर दुस~याची ब~याच पाकळ्यांच्या गुच्छासारखी असतात. पावसाच्या तिस~या दिवशी रात्री आमच्या पांच पाजळ्यावाल्या जास्वंदाच्या फांद्यावर जागोजागी मुळे फुटली. प्रत्येक मूळ सुमारे १ सेंटिमीटर लांबीचे होते. दुस~या जास्वंदाच्या खोडावरही अह्सीच मुळे उगवली, पण ती कमी प्रमाणात होती. तीन दिवसांनी ही मुळे सुकून गेली. जर एखादी फांदी कापून जमिनींत रोवली असती तर ती नक्की जगली असती. एरवी फांदी कापून पाण्यांत बुदवून ठेवली किंव मातीत खोवली तर कापलेल्या जागी तिला मुळे फुटतात हे बहुतेक झाडे लावणा~यांना माहित असते. पण न कापलेल्या झाडाच्या खोडावर आणि फांद्यांवर मुळे फुटणे हा प्रकार आजपर्यंत घडल्याचे ऐकिवात नाही. आश्चर्याची गोष्ट अशी की आमच्या दोन वेगवेगळ्या जातींच्या पांढ~या जास्वंदांच्या खोडांवर अशा प्रकारची मुळे आली नाहीत, आणि इतर कॉणत्याही झाडाच्या खोडांवरही अशा प्रकारची मुळे आली नाहीत.
(Roots on stem of Hibiscus)

Sunday, July 5, 2015

ठसा

आटपाटनगरीतल्या अनेक माणसांना एक गमतीदार सवय होती. दिसलेल्या, ऐकू आलेल्या, किंवा वाचलेल्या प्रत्येक गोष्टीवर आपला स्वतःचा ठसा असलाच पाहिजे असा त्यांचा समज होता, आणि त्याप्रमाणे ते वर्तन करत असत.
माझे बाबा सहा फूट उंच आहेत, असे लहानपणी वर्गमित्राने अभिमानाने सांगितले, की ऐकणा~याचे बाबा सहा फूट एक इंच उंच हमखास निघायचे.
चेंडू्फळीच्या खेळात देशाच्या कप्तानाचा त्रिफळा उडालेला दूरदर्शनवर पाहिला, की गल्लीतही चेंडू्फळी खेळता न येणारा माणूस लगेच म्हणायचा, "फळी सरळ ठेवून खेळला असता तर असे झाले नसते".
देशाच्या पंतप्रधानांनी शेजारच्या देशाच्या पंतप्रधानांबरोबर हस्तांदोलन करतानाचे छायाचित्र वर्तमानपत्रात पाहिले, की माणूस लगेच उद्गारायचा, "अरे, आगीबरोबर खेळू नये, येव्हढेपण कळत नाही?"
"आज काय गंमत झाली माहिती आहे?" असे म्हणून कोणी एखादी गमतीदार घटना सांगायला सुरुवात केली की त्याचे वाक्य मध्येच तोडून "आमच्या कार्यालयात पण काय घडले सांगू?" असे म्हणून ऐकणारा आपली गंमत सांगायचा.
शहरातल्या रस्त्यांवर आपापले ठसे म्हणून नागरीक आवडीप्रमाणे थुंकत, पानाच्या पिचका~या मारत, लघुशंका करत, प्रातर्विधी करत, आणि कचरा टाकत.
सार्वजनिक बसने जाताना विद्यार्थी पु्ढच्या आसनाच्या पाठच्या बाजूवर स्वतःचे नाव चाकूच्या पात्याच्या टोकाने कोरत किंवा न पुसल्या जाणा~या रंगाने लिहित. हेच विद्यार्थी शाळेच्या बाकड्यावरही हाच प्रयोग करत. पुढे प्रेमात पडले की त्या मुलीचे नाव आपल्या नावाबरोबर अशाच पद्धतीने लिहित. पुढेमागे पैसे असले तर प्रसिद्ध स्थळांना भेट देऊन त्या राष्ट्रीय ठेव्यांच्या भिंतींवरही हाच प्रयोग करत. तेव्हढे पैसे गाठीला नसले, तर गावाबाहेर वनभोजनाला जाऊन तिथल्या झाडांच्या बुंध्यांवर आपापली नावे कोरत.
जेव्हा इंटरनेटचा शोध लागला तेव्हा या सवयीचा नवा अविष्कार बघायला मिळू लागला. फेसबूकच्या दुस~याच्या भिंतीवर जाऊन त्यांच्या लिखाणावर ते आपापले शेरे लिहू लागले. त्यांचे ट्वीट आपल्या नावावर पुनः ट्वीट करू लागले. एखाद्या विचारवंताच्या लेखाचे विडंबन करून आपल्या नावावर प्रसिद्ध करू लागले. प्रसिद्ध व्यक्तींच्या नावावर खोटी खाती उघडून नाहीनाही तो मजकूर त्यांच्या नावावर प्रसिद्ध करू लागले. थोड्याशा लोकांना हॅकिंग करता यायचे ते मोठमोठ्या संकेतस्थळांना विद्रूप करू लागले.
स्वतःच्या कर्तुत्वावर आपले स्वतःचे असे काही निर्माण करण्यापेक्षा इतरांच्या निर्मितीवर आपला अनैतिक ठसा मारणे अनेक पटीने सोपे असते, हे सत्य त्या काळी लोकांना कसे उमजले कोण जाणे.

Friday, July 3, 2015

ब्रुहन्नडा

रविवार असल्यामुळे आटपाट नगर सुस्त होते. दुपारची जेवणे उशीरा झाली. गुरुजींना राजवैद्यांकडे चहासाठी बोलावले होते. गुरुजी आणि त्यांची भार्या सायंकाळी पाच वाजता राजवैद्यांकडे पोहोचले. चहापान झाल्यावर दोघांच्या भार्या बागेतली नव्याने लावलेली फुलझाडे बघण्यासाठी रवाना झाल्या. राजवैद्य आणि गुरुजी गप्पा मारायला बसले.
"काय वैद्यराज, काय खबरबात?" गुरुजींनी विचारणा केली. राजवैद्यांकडे नेहमी काहीतरी नवीन ऐकायला मिळायचे.
"अहो, तुमचा विश्वास बसणार नाही. महाभारतात होती तशी ब्रुहन्नडा आमच्याकडे पण घडली."
"हं?" गुरुजी म्हणाले.
"हे बघा, आमच्या रुग्णालयांत महासेन नावाचा तरुण, हुशार, उमदा वैद्य महाराजांनी सहवैद्य या पदावर नियुक्त केला. काही महिने त्याने व्यवस्थित काम केले. मग त्याने रजेची मागणी केली."
"हं."
"पण त्याचे रजेचे कारण काही वेगळेच होते. त्याला वंगदेशात जाऊन स्वतःवर शल्यक्रिया करून घेऊन पुरुषाची स्त्री व्हायचे होते."
"असे करता येते?"
"कठीण असते, पण ते शक्य आहे."
"पण का?"
"त्याच्या मते तो एका पुरुषाच्या शरीरात अडकलेली एक स्त्री होता. परमेश्वराची ती चूक त्याला दुरुस्त करून हवी होती."
"परमेश्वराची चूक?" गुरुजींच्या काही लक्षांत येईना. "बरे पण त्याच्या आईवडिलांची या गोष्टीला सम्मती होती?"
"छे हो! पण आजकालची मुले आईवडिलांचे आणि मोठ्या माणसांचे ऐकतात कोठे?"
"पण वंगदेशांत का? आपल्याकडे देशोविदेशीचे रुग्ण येत असतात, आणि या मुलाला बाहेर जावे लागावे?"
"आपल्या मानसोपचारतज्ञांनी त्याला मानसिकद्रुष्ट्या स्त्री आहे असे प्रमाणित करण्यास नकार दिला. मग त्याने ते प्रमाणपत्र आणि शल्यक्रिया वंगदेशात करायचे ठरवले."
"...." गुरुजींना बोलण्यासारखे काही सुचले नाही.
"त्याने शल्यक्रियेपूर्वी स्त्री संप्रेरके घेतली होती. अहो काय सांगू, जेव्हा मला या सर्व गोष्टींची कल्पना नव्हती तेव्हा एका रुग्णाच्या उपचारांच्या वेळी त्याचा माझ्या हाताला स्पर्श झाला, आणि परस्त्रीचा स्पर्श झाल्यासारखा मी शहारलो."
राजवैद्यांचा चेहरा बघून त्यांच्या बोलण्यांत जराही अतिशयोक्ती नव्हती हे गुरुजींच्या लक्षांत आले.
"कालच तो शल्याक्रियेतून बरा होऊन कामावर रुजू झाला. आजपासून मला महासेन न म्हणता महानंदा म्हणायचे असे त्याने सांगितले आहे. त्याच्या पगारपत्रकावरही तेच नाव यावे असे तो म्हणतो, पण ते येवढ्यात होणे कठीण दिसते."
"पण तो आता स्त्रीसारखा दिसतो का?" गुरुजींनी विचारले.
"सलवार कमीज घालून आला होता. हातात एक बांगडी होती. गळ्यात एक माळ होती. कानांत डूल होते."
"आणि स्त्रीसुलभ वर्तन?" गुरुजींनी विचारले.
"मुली कानावरचे केस हाताने कानामागे करतात तसे तो मधूनमधून करत होता. आणि एका शिकाऊ वैद्याने कामांत काही चूक केली, तेव्हा तो चिडून म्हणाला, 'नीट काम कर, नाहीतर मी तुला कसे नाचवून ठेवते बघ."
"आता पुढे काय होणार?"
"तो नोकरी सोडून कोठेतरी जाणार आहे. पण इतर समस्या आहेतच. कलिंगातून एका ग्रुहस्थाची तक्रार आली आहे. या वैद्याने त्या ग्रुहस्थाच्या मुलाला आपल्याबरोबर रहाण्यासाठी सळो की पळो करून टाकले आहे. पत्रे पाठवणे, संदेश पाठवणे, दूरध्वनी करत राहाणे... तो आमच्या रुग्णालयांत असेच वर्तन करतो का ते त्या ग्रुहस्थाने माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत विचारले आहे."
गुरुजींनी कपाळाला हात लावला.

Wednesday, July 1, 2015

विश्राम, विरंगुळा आणि व्यवसाय एका खिडकीत

महानगरपालिकेच्या नियमांप्रमाणे आजकाल इमारतीपुढील काही जागा मोकळी सोडावी लागते. आमच्या समोरच्या नव्याने बांधलेल्या इमारतीच्या तळमजल्याचे रस्त्यालगतचे गाळे दुकानांसाठी आहेत. प्रत्येक दुकानाच्या समोरच्या मोकळ्या जागेत त्या त्या दुकानाच्या साठी चौथरे बांधलेले आहेत. दुकानदारांनी त्यांच्यावर आपापल्या आवडीप्रमाणे फरशा बसवून घेतलेल्या आहेत. रात्री दुकाने बंद झाली की बहुधा दुकानदारांच्या परवानगीने माणसे तेथे झोपतात. त्यांना निवारा मिळतो, आणि दुकानांचे संरक्षण होते. त्यांतल्याच एका दुकानाची ही गोष्ट.


दुकान रददी आणि भंगार मालाचे आहे. त्यांतलीच काही वर्तमानपत्रे अंगाखाली अंथरून एक माणूस हल्ली तेथे रात्री झोपतो. चादर पावसाने भिजते. वर्तमानपत्रही भिजते, पण ते टाकून देता येते. चादर धुवावी लागते. त्यामुळे या काळात तो वर्तमानपत्रेच वापरतो. सकाळी उठला की अंगाखालची वर्तमानपत्रे काढून वाचतो. तासाभराने त्याची गि~हाइके आली की धोपटी उघडून सामान बाहेर काढतो आणि त्यांच्या दाढ्या करून देतो. तोपर्यंत भंगारवाला दुकान उघडायला येतो. मग हा न्हावी सामान धोपटीत भरतो आणि मार्गाला लागतो. रात्रीची विश्रांती, सकाळचा (बरोबर चहाचा कप नसला तरी) विरंगुळा, आणि नंतर व्यवसाय एकाच ठिकाणी करण्यात त्याने वापरलेली चतुराई ही सरकारच्या 'एक खिडकी योजनांच्या तोडीची वाटते. प्रिन्स चार्ल्सच्या नजरेला तो पडला, तर डबेवाल्यांचे त्यांनी केले तसे कौतुक ते याचेही करतील, आणि उद्या आय आय एम किंवा दुस~या एखाद्या मॅनेजमेंट स्कूलमध्ये त्याला व्याख्यान द्यायलाही बोलावतील.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क