Sunday, August 30, 2015

शेजारधर्म

आटपाट नगरातली गोष्ट आहे. गुरुजींच्या शेजारपाजारी भली माणसे रहात असत. गोडीगुलाबीने आणि सलोख्याच्या वातावरणात सर्वांचे आयुष्य व्यतीत होत होते. पण उडदामाजी काळे गोरे म्हणतात ना, तसा प्रकार व्हायला लागला.
एके दिवशी प्रक्रुती अस्वास्थ्यामुळे गुरुजी सकाळी कामावर गेल्यानंतर तासाभरातच घरी परतले. दाराबाहेर जरा गडबड दिसली. ते थबकले आणि काय चाललेय त्याचा त्यांनी अंदाज घेतला.
"ही शिडी घ्या आणि आमच्या दूरध्वनीची तार बदला" गुरुजींच्या शेजारच्या बाई दूरध्वनी तंत्रज्ञाला सांगत होत्या. त्याने गुरुजींच्या दाराबाहेर ठेवलेली त्यांची शिडी घेतली आणि काम सुरू केले. गुरुजी सर्द झाले. शेजा~यांकडे त्यांची स्वतःची चांगली शिडी होती. असे असतांना त्यांनी स्वतःच्या कामासाठी गुरुजींची शिडी वापरावी हे काही योग्य दिसत नव्हते. काही न बोलता ते आपल्या घरांत शिरले. शेजारच्या बाईंचा चेहरा जरा पडला. सायंकाळी त्यांनी पत्नीला ही गोष्ट सांगितली, तेव्हा ती म्हणाली,
"गेल्या आठवड्यांत त्यांचा दिवा बदलायचा होता, तेव्हापण त्यांनी आपल्याला न सांगता आपली शिडी वापरली होती."
नंतर पावसाळा आला. रविवार असल्यामुळे गुरुजी घरी होते. दारांत उभे राहून काही काम करत होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. तेव्ह्ढ्यात त्यांच्या शेजारच्या बाई आल्या. त्यांची छत्री गळत होती. गुरुजींनी काय असे काय, भिजायला झाले ना, वगैरे म्हटले पण त्या आपल्या घरी काही जाईनात. शेवटी त्यांनी गुरुजींच्या पायाजवळचे 'सुस्वागतम' असे लिहिलेले गुरुजींचे पायपुसणे खस्सकन ओढून घेतले, त्याला पाय पुसले, आणि मग आपल्या घरांत शिरल्या. इतकी वर्षे या बाई आपलेच पायपुसणे वापरत आल्या आहेत हे गुरुजींना तेव्हा समजले.
पोस्टमनने आणलेल्या पत्राची गोष्ट तर कमालीची होती. गुरुजींच्या घरी पोस्टमन दिवसांतून एक फेरी करत असे. त्या दिवशी पोस्टमनने गुरुजींच्या समोरच त्यांच्या पत्रपेटीत त्यांची पत्रे टाकली. गुरुजींनी ती घेतली आणि ते घरांत आले. थोड्या वेळाने त्यांची पत्नी घरी आली आणि तिने पत्रपेटी उघडून पाहिली. आंत एक पत्र मिळाले, ते घेऊन ती घरांत आली.
"अहो, त्या शेजारच्या पलिकडच्या इमारतीत रहाणा~यांचे पत्र आपल्याकडे आले आहे. असे बरेचदा होते. आता ते नेऊन दिले पाहिजे." गुरुजींची पत्नी म्हणाली.
"अग, ते कसे शक्य आहे? मी तासाभरापू्र्वीच सगळी पत्रे घरांत आणली. पोस्टमन परत येणे शक्य नाही."
"अगोबाई, मग आपल्या शेजारणीने ते पत्र तिच्या पेटीत सापडले ते आपल्या पेटीत टाकले की काय?" गुरुजींची पत्नी म्हणाली. गुरुजीना ते खरे असण्याची शक्यता वाटली. खात्री करण्यासाठी म्हणून त्यांनी ते शेजा~यांच्या पेटीत टाकले. दुस~या दिवशी पत्र गुरुजींच्या पेटीत परत हजर झाले.
"बघा कशी आहे ती!" गुरुजींची पत्नी म्हणाली.
"जाऊ दे. परमेश्वर बघत असतो" गुरुजी म्हणाले. त्यांनी ते पत्र पोस्टांत नेऊन दिले. यापुढे संभाळून रहायचे असे त्यांनी ठरवले, पण अतर्क्य अशा गोष्टींची कल्पना नसते त्यांच्यापासून संभाळायचे कसे हे काही त्यांच्या लक्षांत येईना.

Friday, August 28, 2015

हुशार उंदीर

आटपाटनगरात उंदीर होते. त्यांत काय मोठेसे असे कोणीही म्हणेल, कारण गाव तेथे उंदीर हे सर्वज्ञात आहे. पण आटपाटनगरांतले उंदीर हुशार होत चालले होते. उदाहरणार्थ गुरुजींच्या घरी एक उंदीर यायला लागला होता. तो शाकाहारी असावा. कारण गुरुजींच्या पत्नीच्या सज्जातल्या बागेतल्या झाडांची पाने आणि फुले तो खात असे. झाडांच्या मुळांत घातलेल्या भाजीपाल्याचे देठ आणि पाने तो खात असे. देवाचे निर्माल्यही तो खात असे. झाडांच्या मुळांतली माती तो कारण नसताना खणून टाकत असे.गुरुजींच्या पत्नी अगदी कंटाळून गेली होती.
"अहो, त्या उंदराला पिंज~यांत पकडा आणि कोठेतरी दूर सोडून या हो" असे तिने गुरुजींना म्हटले. त्याप्रमाणे गुरुजींनी पिंजरा लावला. ब्राम्हण असल्यामुळे त्यांच्या घरी मासे नसत. पण उंदराला आवडतील म्हणून त्यांनी कोळ्णीकडून माशाचे तुकडे आणून पिज~यांत लावले. दुस~या दिवशी पहातात तर काय, उंदराने पिंज~याचे दार बंद केलेले होते, आणि तो कोठेच नव्हता.
"अहो, तो शाकाहारी दिसतो. त्याला हे भजे लावा" असे पत्नीने म्हटल्यावर गुरुजींनी पिज~यांत भजे लावले. या वेळी उंदराने पिंज~याला स्पर्शही केला नाही. भाजे होते तसे राहिले. पिंज~याचे दार सताड उघडेच राहिले. असे लागोपाठ तीन दिवस झाले.
"उंदीर चिकटणारा पुठ्ठा आणा आणि त्या झाडांमध्ये ठेवा हो" असे पत्नीने म्हटल्यावर गुरुजींनी पुठ्ठा आणला आणि उंदराच्या आवडीच्या झाडाजवळ ठेवला. उंदराने तो उलटा करून ठेवला आणि नेहमीचे सगळे पराक्रम केलेच.
"त्याला औषध घालून मारायला पाहिजे आता" असे ठरवून गुरुजींनी ते औषध आणून ते झाडांच्या मुळांजवळ ठेवले. लागोपाठ तीन दिवस उंदराने सगळे औषध फस्त केले, पण मरून पडणे सोडाच, त्याची ताकद कमी होण्याचेही काही लक्षण दिसेना. मग गुरुजीनी पिठाच्या गोळ्यांत साखर आणि झोपेचे औषध घालून उंदरासाठी ठेवले. ते खाऊन उंदीर बहुतेक नशेत गेला असाव, कारण त्याच्या नेहमीच्या पद्धतशीर विध्वंसापेक्षा वेगळाच विध्वंस त्याने केला. मग गुरुजींनी झोपेच्या औषधाची मात्रा दुप्पट केली. उंदराने तेही फस्त केले, पण सकाळी झाडांच्या मुळांत झोपलेला काही तो सापडला नाही. तिस~या दिवशी मात्र उंदराने त्या औषधाला स्पर्शही केला नाही.
"बघा हो, त्या उंदराला माणसापेक्षा जास्त अक्कल आहे. जी गोष्ट खाऊन त्रास होते ती माणूस मोहापोटी पुनःपुन्हा खातो, पण उंदराने मात्र ते निग्रहाने टाळले" गुरुजींची पत्नी कौतुकाने म्हणाली.
मग गुरुजींनी तारेची जाळी आणून प्रत्येक कुंडीच्या वरच्या भा्गावर लावली, जेणेकरून उंदीर माती खणायला पोचला नसता. या  वेळी तर उंदराने कमालच केली. त्याने कडिलिंबाच्या डहाळ्या तोडल्या आणि एका जाळीच्या खालून जाऊन झाडाच्या मुळाशी नेऊन टाकल्या. ते बघून गुरुजींची पत्नी स्तिमित झाली.
"अग, तू त्याला खायला येवढे काही देतेस, म्हणून त्याला तुझा लळा लागला असे दिसते" गुरुजी म्हणाले. "जाळी लावल्यावर तुला झाडाच्या मुळाशी पाने टाकता येणार नाहीत म्हणून त्याने स्वतः पाने तोडून जाळीखाली नेऊन टाकली बघ."
मला वाटते या उंदराला आहे तसे राहू द्यावे" गुरुजींची पत्नी  म्हणाली.

Wednesday, August 26, 2015

ट्रकच्या पाठी


...
                                    तेरा मुँह काला

Tuesday, August 25, 2015

उंदराला लाजणारी लेडी बग

साधारणपणे सगळे किटक माणसाला घाबरतात आणि त्यांना स्पर्श करायचा प्रयत्न केला तर लांब पळतात. पण कंप्यूटरच्या माऊसला लाजून पळणारा किटक बघायचाय? खाली असणा~या लेडी बगला माऊस लावून पहा.
Grey Square













Monday, August 24, 2015

तसे काही नाही ना?

"राजवैद्य, मला एक कठीण प्रश्न पडला आहे" त्यांचा एक पदव्युत्तर विद्यार्थी म्हणाला. "काही काही रुग्ण मला एक प्रश्न विचारतात, ज्याचा अर्थ मला समजत नाही".
"कोणता प्रश्न?"  राजवैद्यांनी विचारले.
"तसे काही नाही ना?, असे ते विचारतात" विद्यार्थी म्हणाला.
"तसे म्हणजे कसे ते त्यांच्या आघीच्या संभाषणावरून समजायला हवे" राजवैद्य म्हणाले.
"तेच तर! रुग्णाची संपूर्ण तपासणी करून त्याचे निदान आणि उपचार यांची संपूर्ण माहिती दिली की ते हा प्रश्न विचारतात."
"ते निदान कोणते असते?" राजवैद्यांनी विचारले.
"एकच निदान असते असे नाही. कधी ते गर्भाशयाचे फायब्रॉइड असते, तर कधी स्त्री बीज न बनल्यामुळे असणारे वंध्यत्व असते, तर कधी मूत्राशयाचा जंतूसंसर्ग असे असते ."
"दर वेळी त्या प्रश्नाचा अर्थ वेगवेगळा असतो" राजवैद्य हंसून म्हणाले. "जेव्हा निदान गर्भाशयाचे फायब्रॉइड असे असते, तेव्हा त्यांना विचारायचे असते की गर्भाशयाचा कर्करोग तर नाही? जेव्हा ते स्त्री बीज न बनल्यामुळे असणारे वंध्यत्व असे असते, तेव्हा त्यांना विचारायचे असते की यापुढे त्या स्त्रीला गर्भधारणा कधीही होणार नाही असे तर नाही? जेव्हा ते मूत्राशयाचा जंतूसंसर्ग असे असते, तेव्हा त्यांना विचारायचे असते की हल्ली सर्वत्र भिती पसरली आहे तो एड्स हा विकार तर नाही?"
"पण त्यांना तसे स्पष्ट विचारायला काय होते?" विद्यार्थ्याने विचारले.
"त्याचा उच्चार केला तर तोच आजार निघेल अशी अगम्य भिती त्यांच्या मनांत असते. तसे असू नये हे खरे, पण माणसाचे मन ते, त्याला नियम लागू असलेच पाहिजेत असे नाही" राजवैद्य म्हणाले.
"पण त्यांना काय विचारायचे आहे ते मी समजावे कसे?" विद्यार्थ्याने विचारले.
"ते अनुभवाने जमेल" राजवैद्य म्हणाले. "पण नाही समजले तर त्यांना त्यांच्या प्रश्नाचा अर्थ स्पष्टच विचारावा हे बरे."
विद्यार्थी आनंदी झाला आणि आपल्या अर्धवट सोडलेल्या कामाला गेला.

Saturday, August 22, 2015

चेहरा की डोके?

'बालादपि सुभाषितम् ग्राह्यम्' हे गुरुजींना माहित होते. आपल्या विद्यार्थ्यांकडून काही शिकायला मिळाले तर ते आवडीने शिकत असत. आज त्यांच्या ए्का विद्यार्थ्याने त्यांची रथ चालकांची गोष्ट ऐकली आणि त्यांना एक नवी गोष्ट सांगायला तो आला.
"गुरुजी, आपण हे करून पहाच" गोष्ट सांगून झाल्यावर तो म्हणाला. गुरुजींचे कुतूहल चाळवले होते. त्यांनी त्याच दिवशी ती गोष्ट खरी की खोटी हे पाहिले. मग ते घरी आले आणि त्यांनी काय घडले ते आपल्या पत्नीला सांगितले.
"अग, माझ्या एका विद्यार्थ्याने सांगितले ते खरे आहे का ते मी आज प्रयोग करून पाहिले. मोठी गंमत आली. मी सार्वजनिक रथांत चढलो आणि पाठच्या बाजूला बसलो. रथाचा वाहक आला. मी माझे तिकिट काढले. थोड्या वेळाले मी उठलो आणि रिकाम्या असलेल्या दुस~या आसनावर जाऊन बसलो. वाहक परत माझ्याकडे आला आणि माझ्याकडे त्याने तिकिटाचे पैसे मागितले. मी त्याला माझे तिकिट दाखविले. ते बघून तो निघून गेला. जवळचे एक आसन रिकामे झाल्यावर मी उठलो आणि त्या आसनावर जाऊन बसलो. वाहक परत एकदा माझ्याकडे आला आणि माझ्याकडे त्याने परत एकदा तिकिटाचे पैसे मागितले. मी त्याला माझे तिकिट दाखविले. ते बघून तो निघून गेला. दोन थांब्यांचे अंतर गेल्यावर रथाच्या पुढच्या भागांत एक आसन रिकामे झाले. मी उठून तेथे जाऊन बसलो. अग काय सांगू, वाहक परत एकदा माझ्याकडे आला आणि माझ्याकडे त्याने परत एकदा तिकिटाचे पैसे मागितले. मी त्याला माझे तिकिट दाखविले आणि विचारले, की त्याने माझ्याकडे चार वेळा तिकिटाचे पैसे मागितले. दर वेळी मी आसन बदलले की तो माझ्याकडे तिकिट काढावे म्हणून येणार काय? तेव्हा तो तोंड पाडून निघून गेला."
"कमाल आहे. तो माणसांचे चेहरे बघतो की फक्त डोकी मोजतो?" गुरुजींच्या पत्नीने विचारले. "आणि तुम्हीसुद्धा या वयाला हा काय पोरकटपणा केलांत?"
"अग, पोरकटपणांतही एक मजा असते" गुरुजी खुशीत म्हणाले. शालेय शिक्षण संपल्यावर त्यांनी कधी पोरकटपणा केलाच नव्हता. त्यांना त्यांचे बालपण आठवले आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनाचा क्षणभर विसर पडला.

Thursday, August 20, 2015

रथ चालकांचे मानसशास्त्र

गुरुजी घरी आले आणि हात पाय धुवून जरा स्वस्थ बसले.
"काय हो, दमलात का?" त्यांच्या पत्नीने विचारले.
"दमण्यासारखे फारसे काम केलेले नाही." गुरुजी म्हणाले. "पण माणसांचे वर्तन पाहून मनाला मात्र त्रास होतो हे खरे."
"आज कोणी काय केले?" त्यांच्या पत्नीने विचारले. ज्या गोष्टींत इतर माणसांना काही अयोग्य वाटत नाही त्यांच्यामुळे आपल्या पतीला मनाला त्रास होतो हे तिला माहीत होते.
"आजचीच गोष्ट आहे असे नाही. रोजचीच आहे. सामान्य जनतेसाठी महाराजांनी भाड्याचे रथ ठेवले आहेत. या रथांचे काही चालक विचित्र वागतात. एका रथाचा चालक रथ रथांच्या थांब्यावर थांबवत नाही. तो नेहमी रथ थांब्याच्या बराच पुढे नेऊन थांबवतो. मग थांब्यावरची सगळी माणसे रथ पकडण्यासाठी जिवाच्या आकांताने धावतात. व्रुद्ध, गर्भवती स्त्रिया, कडेवर लहान मूल असण~या स्त्रिया यांना याचा खूप त्रास होतो."
"अहो, त्याला रथ चालवण्याचा पुरेसा अनुभव नसेल. थांबवताना त्याची चूक होत असेल" गुरुजींची पत्नी म्हणाली.
"योग्य ठिकाणी रथ थांबवता येतो याची खात्री केल्याशिवाय कोणालाही रथ चालवण्याचा परवाना मिळत नाही" गुरुजी म्हणाले. "आपल्यापेक्षा सुखवस्तू असणा~या लोकांना त्रास दिला की त्याचे मनांतले दुःख हलके होत असणार. म्हणून तो असा वागत असणार. निळ्या कपड्यांतला निरिक्षक थांब्यावर असला की त्या चालकाचा रथ थांब्यावर अचूक थांबतो हे माझ्या लक्षांत आले आहे."
'अशा गोष्टींकडे लक्षच दिले नाही तर काय बिघडेल?' असे म्हणायची त्यांच्या पत्नीला इच्छा झाली, पण त्यांचे मन दुखावू नये म्हणून ती मूक राहिली.
"दुसरा एक चालक आहे, तो सर्व माणसे रथांत चढण्यापूर्वीच रथ चालू करतो. मग माणसे धडपडतात. काही जण पडतात. एक दिवस कोणीतरी रथाच्या चाकाखाली सापडून मरेल अशी मला भीती वाटते आहे."
"त्याच्या रथांत तुम्ही कधी चढू नका हो" गुरुजींची पत्नी म्हणाली. "एक रथ गेला तर पुढच्या रथाने जाता येईल. आपला जीव मोलाचा, त्याच्यापुढे जरासा उशीर झाला तर काही बिघडत नाही."
"हो तर" गुरुजी म्हणाले. "हा चालक माणसे रथांतून उतरण्यास विलंब करत असतील तर त्यांच्यावर मोठ्या आवाजांत ओरडतो. आजारी माणसे, व्रुद्ध, अपंग, अशा कोणालाही सोडत नाही. अशी माणसे काय जाणून बुजून हळूहळू उतरतात काय?"
"असतात काही माणसे विचित्र" गुरुजींची पत्नी म्हणाली.
"तिसरा चालक जिथे एखादी तरुण स्त्री उभी असेल तिथे रथ थांबवतो. ती थांब्याच्या अलिकडे असेल तर अलिकडे, पलिकडे असेल तर पलिकडे. रांगेत उभ्या असणा~या माणसांनी रथांत प्रथम चढावे यापेक्षा त्याला आवडलेल्या स्त्रीने प्रथम चढावे असे त्याला वाटते असे दिसते."
"शी!" गुरुजींची पत्नी म्हणाली.
"अशी माणसे रोज दिसतात म्हणून मनाला थकवा आलाय" गुरुजी म्हणाले.
गुरुजींना त्रास होतो याचे त्यांच्या पत्नीला वाईट वाट्ले खरे, पण आपला पती अशा विचित्र माणसांसारखा नाही ही गोष्ट जाणवून तिला आनंदही झाला.

Tuesday, August 18, 2015

ते करायला हवेच का?

राजवैद्य खेदाने डोके हलवत असताना गुरुजी तेथे पोहोचले.
"राजवैद्य, काय झाले म्हणून डोके हलवत आहात?" गुरुजींनी विचारले.
"अहो, काही काही रुग्ण असे काय प्रश्न विचारतात की काय उत्तर द्यावे ते समजत नाही. आत्ताच एक स्त्री आली होती. स्वतःला काय लक्षणे आहेत हे तिने सांगितल्यावर मी म्हटले, ठीक आहे, आपण तपासणी करूया. तर तिने मला विचारले की तपासून घ्यायला पाहिजेच काय?"
"अहो, तिला संकोच वाटला असेल" गुरुजी म्हणाले.
"ते बरोबर आहे हो. पण तपासल्याशिवाय तिला काय विकार आहे हे कसे कळणार? ते मी तिला समजावून सांगितले, तर तिने परत विचारले की तपासून घ्यायला पाहिजेच काय?"
"कमाल आहे" गुरुजी म्हणाले. "मग आपण काय सांगितलेत?"
"मी म्हटले, तपासून घेतले पाहिजे अशी काही जबरदस्ती नाही. पण आपल्या आजारासाठी उपचार करून घेण्यासाठी आपण येथे स्वेच्छेने आला आहात. तपासून घेणे हे त्या क्रियेचा पुढचा भाग आहे. तो पार पडला नाही तर मला आपले उपचार करता येणार नाहीत. मग तिने तपासून घेतले. ते बरेच झाले. तिला गंभीर विकार होता. आता त्याचे उपचार सुरू झालेत. ती तशीच निघून गेली असती तर तिचे पुढे काय झाले असते त्याची कल्पना करवत नाही."
"तरी नशीब उपचार केलेच पाहिजेत का असे म्हणाली नाही" गुरुजी म्हणाले.
"अहो, तसे म्हणणा~या स्त्रियाही भेटतात. वाळूक झाले तर शस्त्रक्रियेशिवाय बरे होत नाही. तसे सांगितले की त्या विचारतात, शस्त्रक्रिया केलीच पाहिजे का?"
"मग आपण काय उत्तर देता?"
"मी म्हणतो, शस्त्रक्रिया केलीच पाहिजे असे काही नाही. आपण शस्त्रक्रियेशिवाय राहू शकता. पण ते वाळूक तुमच्या शरीरांत राहील आणि कालांतराने मोठे मोठे होत जाईल. मग त्या शस्त्रक्रिया करून घेतात."
"घाबरत असतील हो त्या" गुरुजी म्हणाले.
"ते खरे आहे. म्हणून तर आम्हाला समजुतीने घ्यावे लागते. रुग्णाचे मन सांभाळून औषधे आणि शस्त्रक्रिया यांचा वापर करावा लागतो" राजवैद्य म्हणाले.

Sunday, August 16, 2015

सावळागोंधळ

आटपाटनगरच्या राजाच्या रुग्णालयांत कनिष्ठ वैद्यांच्या नियुक्त्या करावयाच्या होत्या. वर्तमानपत्रांतून जाहिराती झळकल्या आणि इच्छुकांनी उमेदवारी अर्ज प्रचंड संख्येने भरले. सुमारे पंधरा दिवस उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे काम चालू होते. राजवैद्य मुलाखती घेऊन अगदी थकून गेले होते. पण काम महत्वाचे होते. रुग्णालय चालविण्यासाठी वैद्यांची खूपच कमतरता जाणवत होती. त्यामुळे कुरकुर न करता राजवैद्यांनी सगळ्या मुलाखती पार पाडल्या होत्या. शेवटी निवडलेल्या वैद्यांच्या हातांत नियुक्तीपत्रे पडली आणि ते कामावर रुजू झाले. राजवैद्य आणि नवनियुक्त वैद्य असे सगळेच आनंदी झाले.
पण आटपाटनगरच्या सगळ्या गोष्टी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण होत नसत.
"राजवैद्य महाराज, अनर्थ घडला" एक नवनियुक्त वैद्य धापा टाकत आले आणि घाबरलेल्या स्वरांत म्हणाले.
"घाबरू नका. येथे बसा आणि काय झाले ते मला सांगा" राजवैद्य म्हणाले.
"राजवैद्य, आम्ही आमच्या आघीच्या नोक~या सोडून या वैद्यांच्या पदांवर रुजू झालो. आज दोन दिवस झाले. आज कार्यालयातून आम्हाला बोलावणे आले आणि त्यांनी आमची नियुक्तीपत्रे परत मागून घेतली."
"असे आजपर्यंत कधी झाले नाही" राजवैद्य म्हणाले. "त्यांनी काही कारण दिले का?"
"आजपर्यंत नियुक्तीनंतर फुरसतीने नवनियुक्त वैद्यांना कोतवालाकडून निष्कलंक असण्याचे प्रमाण्पत्र आणावे लागत असे. आता ते म्हणतात की आधी प्रमाणपत्र आणा आणि मगच तुम्हाला नियुक्त करण्यात येईल."
"पण याचा विचार त्यांनी आधीच केला नव्हता का?" राजवैद्यांनी विचारले.
"नसावा. त्यांना प्रमुख सचिवांनी नियमाप्रमाणे नियुक्त्या करायला सांगितले होते. तिकडे त्यांनी दुर्लक्ष केले. आता प्रमुख सचिव रागावलेत."
"पण आता तुमची स्थिती 'ना घर का ना घाट का' अशी झाली आहे त्याचे काय? नवी नोकरी मिळाली म्हणून जुनी सोडली आणि नवी नोकरी मिळून झाल्यावर दोन दिवसांत गेली" राजवैद्य म्हणाले.
"आता आम्ही काय करावे ते काही सुचत नाही" नवनियुक्त वैद्य म्हणाले.
"महाराजांना भेटून बघा" राजवैद्यांनी सुचवले.
"तसे केले तर पुढे सचिव किंवा संचालक त्रास देतील अशी भिती वाटते" नवनियुक्त वैद्य म्हणाले.
"तुम्ही पूर्वी राजाच्या सेवेतच कनिष्ठ पदावर होता ना? तुमचे नियुक्तीपत्र काढून घेतले त्याची कार्यालयातील लिपिकाकडून सकारण पोचपावती घ्या आणि मग ती दाखवून त्या जुन्या पदावर परत रुजू व्हा. कोतवालाचे प्रमाणपत्र महिन्याभराने मिळाले की मग या पदावर तुमची नेमणूक होईल."
नवनियुक्त वैद्य राजवैद्यांचे आभार मानून गेले. राजवैद्य सुन्नपणे बसून राहिले. त्यांचे सहकारी वैद्य बाजूला बसून सारे संभाषण ऐकत होते.
"राजवैद्य, आपण असे गप्प का?" त्यांनी विचारले.
"कारभार ढिसाळपणे होतो आहे याची चिंता तर आहेच. पण सर्वच नवनियुक्त वैद्य पूर्वी महाराजांच्या सेवेत नव्हते. काहीजण परप्रांतांतून नोक~या सोडून आले होते. त्यांना आता जुन्या नोक~या परत मिळायच्या नाहीत. त्यांचे काय हा विचार मनाला छळतो आहे."

Friday, August 14, 2015

३डी गोष्टी

मी त्रिमिती मॉडेल (3D Models)) बनविण्यास शिकत होतो, तेहा मी रोजच्या जीवनातील गोष्टींची मॉडेल गंमत म्हणून बनविली होती.. ती फार कौशल्यपूर्ण आहेत अशातली गोष्ट नाही. पण माझ्यासारख्याच शिकण~या कोणाला शिकत असतांना मॉडेल कशी बनतात हे बघून स्वतःची मॉडेल फार छान दिसत नाहीत याचे दुःख होणार नाही, या हेतूने मी ती येथे मांडली आहेत.. ही ३डी मॉडेल बघण्यासाठी जे मॉडेल बघायचे असेल त्याच्या नावावर क्लिक करा. मॉडेल लोड होन्यास थोडा वेळ लागू शकतो. तोपर्यंत जरा सबुरीने घ्या. ते मॉडेल उघडले की खालील गोष्टी करा.
  1. प्ले बटणावर क्लिक करा. 
  2. मॉडेल लहनमोठे करण्यासाठी माऊसचे व्हील पुढे मागे फिरवा.
  3. मॉडेल सर्व दिशांतून फिरविण्यासाठी माऊसचे उजवे बटन दाबून धरून पाहिजे त्या दिशेला हलवा. या प्रकारे आपण ते पाहिजे त्या बाजूने पाहू शकाल.
  4. मॉडेल हलविण्यासाठी माऊसचे उजवे बटन दाबून धरून पाहिजे त्या दिशेला हलवा.




Bike   Car horn   Car   Vintage car  Crow   Knife   Parrot  Plane   Plant   Plants   Stork   Tank 
Watering can   Watering bottle 

Wednesday, August 12, 2015

स्त्री आणि प्रसूतीरोगशास्त्रांतील त्रिमिती उपकरणे

स्त्री आणि प्रसूतीरोगशास्त्रांत विविध शल्यक्रियेची उपकरणे वापरतात. मी त्यांची त्रिमिती मॉडेल बनविली आहेत. ही ३डी मॉडेल बघण्यासाठी जे मॉडेल बघायचे असेल त्याच्या नावावर क्लिक करा. मॉडेल लोड होन्यास थोडा वेळ लागू शकतो. तोपर्यंत जरा सबुरीने घ्या. ते मॉडेल उघडले की खालील गोष्टी करा.
  1. प्ले बटणावर क्लिक करा. 
  2. मॉडेल लहनमोठे करण्यासाठी माऊसचे व्हील पुढे मागे फिरवा.
  3. मॉडेल सर्व दिशांतून फिरविण्यासाठी माऊसचे उजवे बटन दाबून धरून पाहिजे त्या दिशेला हलवा. या प्रकारे आपण ते पाहिजे त्या बाजूने पाहू शकाल.
  4. मॉडेल हलविण्यासाठी माऊसचे उजवे बटन दाबून धरून पाहिजे त्या दिशेला हलवा.


Bonney Myomectomy Clamp
by shashankparulekar
on Sketchfab


Allis forceps                                 Auvard's speculum                             Babcock forceps
Bonney's myomectomy xlamp      C shaped retractor                             Cusco's speculum
Deaver's retractor                        Doyen's Retractor                              Epiosotomy scissors
Fergusson speculum                     Landon's retractor                             Ovum forceps
Scissors                                       Soonawala's speculum                       Sponge holding Forceps
Suction cannula                            Tenaculum                                         Tuffier's retractor
Umbilical Cord Scissors

    Monday, August 10, 2015

    कालचक्रातून काढा वेळ


    कालचक्र तर फिरतच रहाणार
    कामाचा रगाडा तर कायमचाच आहे,
    तरी पण


    मोग~याचा सुगंध हुंगण्यासाठी मधून मधून थोडासा वेळ अवश्य काढा. नाहीतर आयुष्य नीरस होऊन जाईल.
    (टीपः आमच्या घरी फुललेली फुले आहेत, म्हणून मोगरा दाखविला आहे. हुंगण्यासाठी मोगराच हवा असे नाही. आपल्या आवडीचे कोणतेही फूल चालेल.)

    Saturday, August 8, 2015

    फुल्ली

    "अहो गुरुजी, आमच्या शिकणा~या वैद्यांनी नवेनवे शब्द वापरायला सुरुवात केली आहे. कधी कधी काय  म्हणतात तेच कळत नाही" राजवैद्य गुरुजींना म्हणाले.
    "एखादे उदाहरण दिलेत तर बरे होईल" गुरुजी म्हणाले.
    "आता प्रसूती होतांना गर्भवतीला तपासतात, तेव्हा गर्भाशयाचे मुख किती उघडले आहे ते पहावे लागते. ते पूर्ण उघडते तेव्हा ते १० सेंटीमीटर असते. मग त्यांतून बाळ बाहेर येऊ शकते. ते पूर्ण उघडले आहे हे सांगायसाठी आमचे विद्यार्थी म्हणतात, 'राजवैद्य, ती गर्भवती फुल्ली आहे."
    "फु्ल्ली? तिला ते फुल्ली का म्हणतात? तिला त्यामुळे राग येणार नाही का?"
    "ते तर झालेच. पण फुल्ली म्हणजे काय आणि त्याचा तिच्या उपचारांशी संबंध कसा जोडायचा ते समजेना. शेवटी त्यांना विचरले तेव्हा शोध लागला. मध्यंतरी आमच्याकडे पाश्चात्य देशांतले विद्यार्थी आले होते. आंग्लभाषेत ते गर्भाशयाचे मुख पूर्ण उघडले असण्याच्या स्थितीला 'फुल्ली डायलेटेड ' असे म्हणायचे. ते आमच्या विद्यार्थीमित्रांना फार आवडले. बोलले मराठीतून, तरी त्यांत 'फुल्ली डायलेटेड' मात्र आंग्लभाषेतले म्हणायचे. मग त्याचा सोईसाठी अपभ्रंश करून फक्त 'फुल्ली' म्हणायला लागले. आता बोला."
    "मनोरंजक आहे" गुरुजी म्हणाले. "आंग्लभाषा, मराठी भाषा, आणि आपली सोय यांचा किती मजेशीर मिलाफ करता येतो ते बघून मजा वाटली."


    Tuesday, August 4, 2015

    हातातून निसटणारा काळ




    प्रत्येकाच्या कंप्टयूरच्या सिस्टीम ट्रे मध्ये घड्याळ असते, पण ते सतत बदलणारा वेळ सेकंदांत दाखवत नाही. सहसा तिकडे कोणी पुनःपुन्हा बघतही नाही. इंटरनेटवर वेळ कसा जातो ते समजत नाही. डोळ्यांवर आणि शरीरावर प्रमाणाबाहेर ताण पडू नये म्हणून आपण एखाद्या संकेतस्थळावर किती वेळ आहोत हे वाचकाला समजावे म्हणून प्रत्येक वेब पेजवर मी वर दाखविले आहे तसे घड्याळ असावे असे मला वाटते.

    गूगलला माहित नसलेली गोष्ट

    गूगलच्या सर्च इंजिनावर माझा येव्हढा विश्वास होता की एखाद्या गोष्टीची माहिती इतर कोठेही मिळत नसेल तर ती गूगलवर शोधल्यावर नक्की मिळेल असे मला वाटत असे. पण आज अशी एक गोष्ट घडली की माझ्या विश्वासाला तडा गेला. मी मला आलेल्या ईमेल वाचण्यास बसलो होतो. नाव आणि पासवर्ड टाईप केल्यावर मी एंटर की दाबली. पण नेहमीप्रमाणे माझा इन्बॉक्स उघडला नाही. थोडा वेळ प्रयत्न केल्यावर गूगलने खालील संदेश दिला.

    ही ५०२ क्रमांकाची चूक आहे. सर्वरला एक तात्पुरती चूक आढळली आणि तुमची विनंती पूर्ण करता आली नाही. पुन्हा ३० सेकंदांनी प्रयत्न करा. आम्हाला येव्हढेच माहीत आहे.

    आपल्याला येव्हढेच माहीत आहे असे स्वतः गूगलने म्हटले त्यामुळे गूगल सर्वज्ञ आहे या माझ्या विश्वासाला तडा गेला. चुकीबद्दच्या संदेशांत आपल्या एका तंत्रज्ञाने असे लिहिले आहे हे गूगलच्या सर्वेसर्वांना माहित आहे की नाही हे गूगलच जाणे.

    Sunday, August 2, 2015

    कबूतराचे विक्राळ रूप

    आमच्या घराजवळ सर्वात जास्त संख्येने असणारे पक्षी म्हणजे कावळे. त्यांच्यानंतर क्रम लागतो कबूतरांचा. आमच्या झाडांमुळे या पक्ष्यांना आमच्या घरी यायला फारच आवडते. झाडांच्या कुंड्यांमध्ये अंडी घालणे हे कबूतरे पसंद करतात, आणि त्यांचा पहारा चुकवून ती अंडी फस्त करणे हे कावळे पसंद करतात. एकदा एका कबूतराने आमच्या झाडाच्या कुंडीत दोन अंडी घातली. एरवी त्यांच्या जरा जरी जवळ फिरकले तर ती घाबरून पटकन उडून जातात. पण जर ती अंडी उबवायला बसली असतील तर नजरेला नजर देऊन अविचल बसून रहातात. कितीही जवळ गेले तरी उडून जात नाहीत. अतिशयच जवळ गेले तर ती आक्रमक होऊन अंगावर येतात. खालच्या चित्रांत त्या कबूतराने पंख थोडेसे विस्तारून आणि पिसे फुलवून आपण आकाराने किती मोठे आणि धोकादायक आहोत हे दाखवून मला घाबरविण्याचा प्रयत्न कसा केला आहे पहा.



    त्याच्या आकाराला मी घाबरलो नाही आणि कॅमेरा त्याच्या दिशेने रोखला हे पाहून त्याने रुद्र रूप धारण करून माझ्यावर चोच कशी उगारली आहे हे खालील चित्रांत पहा. मातेचे आपल्या अपत्यांवरील प्रेम त्यांच्या संरक्षणासाठी त्यांना किती कणखर आणि धीट बनविते याचे हे उत्क्रुष्ट उदाहरण आहे.


    फोटो काढून झाल्यावर मी त्या कबुतराला आणि त्याच्या अंड्यांना एकटे सोडून दूर गेलो आणि दूरच राहिलो हे मी प्राणी आणि पक्षीमित्रांच्या माहितीसाठी येथे नमूद करतो.

    प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

    संपर्क