Friday, June 19, 2015

सोपा उपाय

गुरुजींच्या सार्वजनिक वाहनांतून प्रवास करण्यामुळे त्यांना अनेक गमतीदार अनुभव यायचे. हा स्वतःचा रथ न बाळगण्याचा एक फायदा होता. तसे वाईट अनुभवही यायचे. पण त्याला इलाज नव्हता. उडदामाजी काळे गोरे असे म्हणतात ना? पण चांगले तेव्हढे घेऊन पुढे जायचे असे ठरविले की मग फारसा मोठा प्रश्न उरत नसे.
एके दिवशी गुरुजी सार्वजनिक बसमधून प्रवास करत होते. त्यांना खिडकीजवळची बसायची जागा मिळाली होती. उरलेले आसन रिकामे होते. गुरुजी खिडकीबाहेर बघत प्रवास करत होते. बाहेर काही फार मोठी गंमत होती अशातला भाग नव्हता. पण प्रवास करताना खिडकीबाहेर बघायचे अशी सवय प्रत्येक लहान मुलाला त्याचे पालक लावत असतात आणि ती सवय मोठेपणीही रहाते, या नियमाला गुरुजी अपवाद नव्हते.
"जरा सरकून बसा" असे शब्द गुरुजींच्या कानावर पडले. त्यांनी वळून पाहिले. एक सुमारे १२० किलो वजनाची स्त्री बसण्यासाठी जागा हवी म्हणून त्यांना सरकून बसायला सांगत होती.
गुरुजी खिडकीच्या दिशेला शक्य होईल तेव्हढे सरकले. तसे पाहिले तर ऐसपैस बसून सगळे आसन अडवणे हे गुरुजींच्या स्वभावातच नव्हते. गुरुजींनी अर्ध्यापेक्षा थोडे कमीच आसन व्यापले होते. पण कोणी विनंती केली तर तिला मान द्यायचा म्हणून त्यांनी सरकण्याचा होईल तेव्हढा प्रयत्न केला.
त्या स्त्रीने उपलब्ध झालेली जागा नजरेने मोजली. "आणखी थोडे सरका ना" ती म्हणाली.
"अहो, मी येव्हढा बारीक माणूस आहे. अर्ध्यापेक्षा कमी आसन मी व्यापून बसलो आहे. माझ्या या बाजूला बसची बाजू मला चिकटली आहे. आणखी सरकायचे तर मला बसची बाजू फोडून बसबाहेर पडावे लागेल."
गुरुजींचे बोलणे ऐकून स्त्री निरुत्तर झाली. पण निरुत्तर झाली म्हणून गप्प होणे तिच्या स्वभावात नसावे.
"मग आता काय करायचे?" तिने विचारले. बहुतेक गुरुजींनी स्त्रीदाक्षिण्य म्हणून उठून संपूर्ण आसन तिला बसण्यासाठी द्यावे अशी तिची अपेक्षा असावी. साध्या स्वभावाच्या गुरुजींना ते काही समजले नाही. स्त्री या प्रश्नाला उपाय काय असे विचारते आहे असे त्यांना वाटले. त्यांना जो उपाय योग्य वाटला तो त्यांनी सुचवला.
"आपण आपले वजन कमी करावे, म्हणजे अशी अडचण येणार नाही" गुरुजी म्हणाले.
'ते जमले असते तर बघायलाच नको होते' अशा अर्थाची मुद्रा करून  महिला बसायला प्रशस्त अशी जागा दुसरीकडे कोठे मिळते का हे बघायला निघून गेली. रोज विद्यार्थ्यांना करायचे तसा उपदेश त्या स्त्रीला केल्यामुळे आपण आपले कर्तव्य पार पाडल्याच्या आनंदात गुरुजी परत खिडकीबाहेर बघू लागले.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क