Thursday, June 25, 2015

उलटतपासणी

आटपाट नगरीच्या राजाने गुरुजींवर एक महत्वाचे काम सोपवले होते. राजाच्या एका रुग्णालयामध्ये शिक्षण घेणा~या काही विद्यार्थिनींनी तेथील काही पुरुषांविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केल्या होती. त्या गोष्टीची प्राथमिक चौकशी करण्याचे काम राजाने त्या रुग्णालयामधील व्यक्तींवर सोपविले होते. पण आपला विश्वासू माणूस त्या वेळी हजर असावा असे राजाला वाटत होते. म्हणून त्याने ही जबाबदारी गुरुजींवर सोपविली होती. गुरुजींना तेथे निरीक्षक म्हणून उपस्थित रहायचे होते.
आरोपींमध्ये काही विद्यार्थी होते, तसेच काही वैद्यही होते. चौकशीचे काम तेथील दोन वरिष्ठ वैद्य आणि एक प्रशासक स्त्री मिळून करत होते. प्रशासक बाई न्यायशास्त्रांतही निपूण होत्या. चौकशी पद्धतशीरपणे चालू होती. होता होता एका विध्यार्थ्याची चौकशी सुरू झाली. त्याच्यावरचे आरोप तर फारच गंभीर होते.
"तो कामावर येतो तेव्हा त्याच्या तोंडाला सिगारेट आणि दारूचा वास येतो" पीडीत विद्यार्थिनीने चौकशी समितीला सांगितले. "त्यामुळे त्याच्याबरोबर काम करायची भिती वाटते. त्याने मला एकदा सनी लिओनीचा फोटो पाठवला."
"तुझ्या चलत दूरध्वनी यंत्रावर तो फोटो असेल ना?" बाईंनी विचारले.
"ते यंत्र मोडले" असे ती मुलगी म्हणाली.
"हरकत नाही. तुला दूरध्वनी सेवा पुरवणा~या सेवादात्याच्या सर्वरवर त्याची नोंद असेल" वरिष्ठ वैद्य म्हणाले.
गुरुजींना सिगारेट आणि दारू या शब्दांचा अर्थ समजला, पण ते सनी लिओनी काय ते समजले नाही. निरीक्षक असल्यामुळे आणि अज्ञान प्रकट करायची लाज वाटल्यामुळे ते गप्प राहिले. जेव्हा हा आरोपी विद्यार्थी चौकशीला सामोरे जाण्यासाठी आला, तेव्हा त्याला प्रशासक बाईंनी विचारले,
"तू सिगारेट ओढून कामावर येतोस असा तुझ्यावर आरोप आहे" प्रशासक बाई म्हणाल्या.
"मी? छे!" तो निष्पाप चेह~याने म्हणाला.
"तू दारू पिऊन कामावर येतोस असाही तुझ्यावर आरोप आहे" प्रशासक बाई म्हणाल्या.
"मी आणि दारू?" तो म्हणाला, "कदापी नाही."
"तुझे हात आत्ताही थरथरतायत" प्रशासक बाई म्हणाल्या.
त्याचे हात थरथरत होते हे गुरुजींनी तो येऊन स्थानापन्न झाला तेव्हाच पाहिले होते. हात थरथरण्याचे एक कारण दारू पिणे असते हे त्यांना राजवैद्यांनी सांगितले होते ते त्यांना आठवले होते. त्याचे डोळे लाल आहेत का हे पण त्यांनी पाहून ठेवले होते.
"पण मी दारू पीत नाही" तो म्हणाला.
"तू त्या विद्यार्थिनीला सनी लिओनीचा फोटो पाठविलास असा आरोप आहे" प्रशासक बाई म्हणाल्या. हे म्हणतांना त्यांचा चेहेरा शरमेने काळवंडलेला आहे असे गुरुजींच्या लक्षांत आले. ते गप्पच राहिले. प्रश्न विचारण्याची ती वेळ नव्हती.
आरोपीने अचंभित चेहरा करून म्हटले, "कोणी, मी? छे छे. मी नाही."
सामान्यपणे निष्पाप माणसाचा असतो त्यापेक्षा खूपच जास्त प्रमाणात याचा चेहरा निष्पाप दिसतोय, असे गुरुजींच्या मनांत आले. तो बहुतेक निष्पाप असण्याचे बेमालूम नाटक करत असावा असे त्यांना वाटले. प्रशासक बाई तर हाडाच्या वकील होत्या. त्यांना तो संशय गुरुजींच्या आधीच आला होता.
"सनी लिओनी कोण?" त्यांनी त्या आरोपीला विचारले.
"सनी लिओनी?" त्याने अतिनिष्पाप चेह~याने विचारले. "माहित नाही."
"ठीक आहे, तू जाऊ शकतोस" असे बाई विचित्र चेहेरा करून म्हणाल्या.
"हे सनी लिओनी प्रकरण काय आहे?" असे तो आरोपी गेल्यावर गुरुजींनी विचारले. बाई गप्पच राहिल्या. पण वरिष्ठ वैद्यांनी उत्तर दिले,
"गुरुजी, कॅनडा नावाच्या विदेशातून या मूळ भारतीय वंशाच्या लिओनी नावाच्या बाई भारतवर्षांत चलतचित्रपटांत काम करण्यासाठी आलेल्या आहेत. पूर्वी त्या मोठ्या माणसांसाठी असणा~या चित्रपटांत (ज्याला आजकाल सेक्स मुव्ही असे म्हणतात) काम करत असत. गेल्या वर्षी त्यांना भारतवर्षांतील चित्रपटांत काम करणारी सर्वात मादक नटी म्हणून जनतेने मला वाटते एसेमेस आणि इंटरनेटवरील कौलातून निवडून दिले होते. तुम्ही इंटरनेट वापरत नसाल, पण वर्तमानपत्रपण वाचत नाही असे दिसते."
"अं.." गुरुजी पुटपुटले. हा विषय त्यांना तितकासा योग्य वाटला नव्हता, आणि एक स्त्रीच्या समोर त्यावर बोलणे तर त्यांना फारच अवघड वाटत होते. तो आरोपी धादांत खोटे बोलत होता याचा सर्वांत मोठा पुरावा म्हणजे सनी लिओनी कोण हे त्याला माहित नव्हते असे तो म्हणाला, आणि ते प्रशासक बाईंनी उलटतपासणीत अचूक पकडले हे मात्र त्यांच्या ध्यानांत आले.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क