Wednesday, June 3, 2015

अगम्य थरथर

आटपाट नगरातले गुरुजी ज्या मुलांना शिकवत असत ती महाविद्यालयातली मुले होती. खरे तर त्यांना मुले न म्हणता बापेच म्हणायला हवे होते, कारण ती सर्व मुले मुली विशीच्या वरची असत. पण त्यांचे शिक्षण चालू होते म्हणून त्यांना मुले म्हणायचे येव्हढेच. आणि तसे पाहिले तर गुरुजींचे वय पहाता ती सर्व त्यांची मुले शोभण्याच्या वयाची होती. पण मुले म्हटले तरी त्यांचे सर्व व्यवहार मोठ्या माणसांसारखेच असायचे. दुर्दैवाने ते सरळ मनाच्या गुरुजींच्या लक्षात येत नसे.
गुरुजी मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबरीने प्रात्यक्षिकेही शिकवायचे. शिकवून झाल्यानंतर त्यांच्या निरीक्षणाखाली मुले ती प्रात्यक्षिके स्वतः करत असत. चुका झाल्यावर गुरुजी ओरडतील हे माहीत असल्यामुळे घाबरतही असत. गुरुजी फक्त मुलांमध्ये सुधारणा व्हावी म्हणून ओरडायचे. मुलांना घाबरवणे हा त्यांचा हेतू नसायचा. त्यामुळे ती घाबरत असतील असे त्यांच्या मनात येत नसे. पण प्रात्यक्षिके करताना आपण जवळ उभे राहिलो की विद्यार्थांचे, विशेषतः मुलींचे हात थरथरतात, आणि आपण जवळ आहोत हे माहीत नसले तर थरथरत नाहीत हे जेव्हा त्यांच्या लक्षांत आले, तेव्हा त्यांना या थरथरण्याचे कारण समजले. गुरुजींनी विद्यार्थ्यांची थरथर थांबविण्यासाठी काय करता येईल याचा खूप विचार केला, पण उपाय काही मिळाला नाही.
"अहो, ती मुले तुम्हाला येव्हढी घाबरतात, याला उपाय एकच. तुमचा रागीट स्वभाव सोडून द्या" असा त्यांच्या पत्नीने त्यांना सल्ला दिला. पण स्वभाव काही सोडायचा म्हणून सुटतो का? पण विध्यार्थ्यांमध्ये सुधारणा झाली की गुरुजी त्यांचे कौतुक करायचे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढायचा. मग अशी थरथर होत नसे.
गुरुजींना मुलांच्या थरथरण्याचे कारण समजले. आता न समजण्यासारखे काही राहिले नाही असे त्यांना वाटले. पण जीवनात असे थोडेच होत असते? काही काही बाप्या विद्यार्थ्यांचे हात प्रात्यक्षिके करत नसतांनाही थरथरत असत. गुरुजींनी गूगल वर शोध घेतला तेव्हा ही थरथर आवश्यक (आंग्लभाषेत त्याला इसेन्शिअल असे म्हणत) अशा प्रकारची असेल असे त्यांना आढळले. ही अनावश्यक असणारी थरथर आवश्यक कशी असू शकते हे काही त्यांना समजेना. अशी थरथर असणा~या वि्द्यार्थांचे डोळे लाल का असतात हेही त्यांना समजेना. शेवटी त्यांनी हा प्रश्न राजाच्या रुग्णालयातील वैद्यमहाराजांना विचारला.
"गुरुजी, सुरापान करणा~या माणसांना अशी थरथर होते बरे" असे वैद्यराज थोडेसे हसून म्हणाले.
"विद्यार्थीदशेत सुरापान? शांतं पापं!" गुरुजी म्हणाले.
"गुरुजी, आपला काळ गेला. आजच्या काळात हे असेच चालायचे" वैद्यराज म्हणाले.
"मला थोडे्से कनिष्ठ एक शिक्षक आहेत. त्यांचे हातही असेच थरथरतात. ते सुद्धा ...." गुरुजी चाचरले.
"मी ओळखतो त्यांना" वैद्यराज म्हणाले. "ते सुद्धा."
"आणि माझ्या आधी आमच्या मुख्य होत्या त्या शिक्षिका? त्यांचे हात थरथरायचे. त्यांना आवश्यक थरथर असावी नाही?" गुरुजींनी विचारले.
"त्यांच्या बद्दल मी काही बोलणे योग्य होणर नाही, काही आजार झाला तर उपचारांसाठी त्या माझ्याकडेच येत असत" वैद्यराज म्हणाले. "पण या कारणामुळे थरथर होणा~या स्त्रिया मी पाहिल्या आहेत."
"स्त्री आणि सुरा?"
"गुरुजी, कोठच्या काळांत आहात तुम्ही? आजकाल वरच्या सामाजिक स्तरातल्या काही स्त्रिया पार्ट्यांमध्ये आणि घरीसुद्धा सुरापान करतात हो."
गुरुजी थोडा वेळ गप्प राहिले. मग त्यांनी घाबरत घाबरत विचारले.
"या दोन कारणांपेक्षा वेगळी अशी थरथर होण्याची इतर कारणे मी आणि माझे विद्यार्थी यांच्याशी संबंधित आहेत का? असली तर मला सांगून ठेवा."
"म्हातारपणामुळे होते असे. इतर आजारांतही थरथर होऊ शकते. पण तसे काही वाटले तर माझ्याकडे संबंधितांना पाठवून द्या. तुम्ही डोक्याला त्रास करून घेऊन नका."
"आणखी एक विचारू?"
"अवश्य विचारा."
"तुमच्या वैद्यक व्यवसायात अशी उदाहरणे आढळतात का हो?"
"हो तर! दोन्ही प्रकारची आढळतात. अगदी शल्यविशारदांतही आढळतात. अहो, सगळी माणसे इथून तिथून सारखीच असतात हो."
गुरुजींनी मनातल्या मनात कपाळाला हात लावला.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क