Sunday, June 7, 2015

भुंग्याचे घर

आटपाट नगरांत एका भुंग्याने गुरुजींच्या घरातच घर बांधायचे असे ठरवले. खिडकीची कडी अडकविण्याचे छिद्र होते ते त्याला पसंत होते. त्या छिद्रातून त्या अल्युमिनियमच्या खिडकीच्या पोकळ चौकटीत प्रवेश करता येत असे. आतमध्ये जागा प्रशस्त होती. घर मोक्याच्या जागी होते. भरपूर झाडे होती, ज्यांची पाने आणि फुले तो खात असे. कावळ्याला घातलेले पाणी कावळा जवळपास नसताना तो पीत असे. तसे पाहिले तर बॅंक, पोस्टऑफिस, शाळा, महाविद्यालय, बस थांबा, टॅक्सीचा थांबा, रेल्वे स्टेशन, एटीएम, उपहारग्रुह, केशकर्तनालय, भांड्यांची दुकाने, तयार कपड्यांची दुकाने, विद्युत उपकरणांचे दुकान, वैद्य, औषधांचे दुकान वगैरे महत्वाची स्थळेही अगदी जवळ होती, पण भुंग्याला त्या गोष्टींमध्ये रस नव्हता. नाट्यग्रुह आणि चित्रपटग्रुह जरा लांब होते, पण भुंग्याला त्या गोष्टींमध्येही रस नव्हता. एक जैन देरासर, सहा मंदिरे, दोन मशि्दी आणि एक चर्च हाकेच्या अंतरावर होते. पण भुंग्याचे धर्माबद्दलचे मत फारसे स्पष्ट नव्हते, म्हणून तसा काही फरक पडत नव्हता. भुंग्याने घर बांधायला घेतले. फे~यांमागून फे~या मारून तो घरांत पावसाळ्याची बेगमी करायला लागला. पायांत पकडून तो फुलांच्या पाकळ्या आणि पानांचे तुकडे आणायचा, ते घेऊन त्या घरांत जायचा, ते साठवून ठेवायचा आणि  मग पुढच्या फेरीला रवाना व्हायचा.
"अहो, त्या भुंग्याने आपल्या घरात घर बांधायला घेतलेय हो" गुरुजींची पत्नी म्हणाली.
"असू दे ग" गुरुजी म्हणाले.
"असू दे काय? आपल्याला चावला म्हणजे? तुम्ही दिवसभर घराबाहेर असता. मी घरी असते. मलाच चावायचा."
"हं..." गुरुजी म्हणाले.
"तो बघा आला" गुरुजींची पत्नी म्हणाली.
गुरुजींनी त्या दिशेने पाहिले. भुंगा पांढ~या रंगाची एक फुलाची पाकळी घेऊन आला, जराही न अडखळता आपल्या घरात घुसला, थोड्या वेळाने रिकाम्या पायाने बाहेर आला आणि निघून गेला.
"खरंच ग! किती छान दिसतेय त्याची हालचाल. पाकळीसकट त्या येव्हढ्याश्या छिद्रातून आंत जाणे म्हणजे काही खायची गोष्ट नाही." गुरुजींनी पटकन भुंग्याचे छायाचित्र काढले होते.
"पुरे झाले त्याचे कौतूक. मी सांगतेय काय आणि तुम्ही म्हणताय काय? तो बघा परत आला."
एव्हाना खूप उकडते म्हणून गुरुजींनी पंखा लावला होता. भुंगा पायात फुलाची पाकळी धरून आत आला, पण त्याला त्याच्या घरात घुसता येईना. दारापर्यंत आला की तो वहावत गेल्यासारखा एका दिशेला जाई. मग प्रयत्न करून तो परत दाराशी गेला की परत वहावत जाई.
"अग, पंख्याच्या वा~यामुळे त्याने पायांत धरलेल्या पाकळीत हवा भरतेय, आणि शिडाच्या होडीसारखा तो वहावत जातोय. पंखा बंद कर जरा" गुरुजी म्हणाले.
"अहो, काहीतरीच काय? मी त्याचा बंदोबस्त करा म्हणतेय आणि तुम्ही त्याला त्याच्या घरात जायला मदत व्हावी म्हणून पंखा बंद करायला सांगताय?" असे म्हणून त्यांची पत्नी फणका~याने उठली, एक फडका घेऊन आली आणि तिने त्या भुंग्याला एक फटका मारला. 'अग थांब, लागेल त्याला' असे गुरुजी म्हणायच्या बेतात होते. पण पत्नीचा नेम लागणार नाही याची कल्पना असल्यामुळे आणि सूज्ञपणा असल्यामुळे त्यांनी तोंड बंद ठेवले. त्यांच्या अटकळीप्रमाणे त्यांच्या पत्नीचा नेम चुकला. पण त्या हवेच्या जोरदार झोक्यामुळे म्हणा किंवा घाबरून म्हणा, भुंग्याच्या पायांतून पाकळी आणि पान दोन्ही निसटले. त्या दोन गोष्टी खाली पडल्या आणि भुंगा उडून गेला. पत्नीने त्या गोष्टी तपासून पाहिल्या.
"अहो, ही फुलाची पाकळी नाहीये. हा पांढ~या दो~यांचा गुंता आहे" पत्नी उदगारली.
"आपल्या बाळांना झोपायसाठी त्याने ते दोरे आणले असणार" गुरुजी म्हणाले. त्यांचा जीव भरून आला.
"चला, उठा. ते छिद्र बंद करा" गुरुजींची पत्नी म्हणाली.
गुरुजी उठले. एक कापसाचा बोळा त्यांनी त्या छिद्रांत कोंबला. भुंगा आला, त्या बंद केलेल्या छिद्राभोवती थोडा वेळ उडला, आणि शेवटी निघून गेला.
त्याची आठवण म्हणून गुरुजींनी त्याचे छायाचित्र गूगल फोटोवर टाकले. त्यांच्या परवानगीने ते येथे ठेवले आहे.


भुंगा पिवळ्या बाणाने दाखविला आहे. त्याने पायांत धरलेली फुलाची पाकळी काळ्या बाणाने दाखविली आहे. छायाचित्र फारसे स्पष्ट नाही कारण एकतर गुरुजींना छायचित्र घेण्याची कला फारशी अवगत नव्हती आणि भुंगा जलद गतीने उडत होता.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क