Saturday, June 27, 2015

पायांना मदत हातांची

गुरुजी दिवसाभराचे काम उरकून घरी चालले होते. पेशाने शिक्षक असल्यामुळे गुरुजींच्या नीती-अनीतीच्या कल्पना इतरांपेक्षा बेगळ्या होत्या. राजाने पाचवा वेतन आयोग लागू केल्यापासून बरोबरच्या इतर गुरुजनांनी स्वतःसाठी रथ विकत घेतले होते. रथ चालविण्यासाठी इंधन वापरणे म्हणजे राष्ट्राच्या संपत्तीची उधळमाधळ करणे आहे असे गुरुजींच्या मनाने घेतले. स्वकष्टार्जित रथ त्यांनी तडकाफडकी कवडीमोलाने विकून टाकला. स्पष्ट सांगायचे तर फुकून टाकला. नवा रथ घ्यायचा तर प्रचंड किंमत मोजावी लागे. पण जुन्या रथाचे मूल्य भंगारासारखे असे. असो. गुरुजींच्या नीतीमूल्यांपुढे पैशांचे ते काय येव्हढे?
तर रथ नसल्यामुळे गुरुजी सार्वजनिक वाहतुकीच्या बसने घरी जात असत. त्या दिवशी गुरुजींची बस आली तेव्हा त्यांच्यापुढे राजाच्या रुग्णालयातली एक आयाबाई होती. मलईमुळे रुग्णांचे कोलेस्टेरॉल वाढेल म्हणून त्यांच्या दुधावरची सगळी मलई ही आयाबाई मट्ट करीत असे अशी वदंता होती. खरे खोटे परमेश्वराला माहीत. पण आयाबाईचे वजन सुमारे १३५ किलो होते. बस अपंगांसाठी असते तशी कमी उंचीच्या पाय~यावाली होती. दारातला दांडा धरून आयाबाईने पहिल्या पायरीवर उजवा पाय ठेवला आणि त्याने जोर लावून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. पण त्या पायाच्या स्नायूंची ताकद कमी पडली. अंग काही वर उचलले जाईना. आयाबाईने पुनःपुन्हा प्रयत्न केला, पण व्यर्थ. मग तिने दोन्ही हातांनी बसचा दांडा पकडला आणि अंग वर खेचण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्नही पुनःपुन्हा असफल ठरला. बसचे वाहक आणि चालक खोळंबून होते. गुरुजी आपल्याला न घेता बस सुटेल म्हणून कासावीस व्हायला लागले होते. लोकांनी प्रोत्साहन देऊनही आयाबाईचे सगळे प्रयत्न फोल ठरले. शेवटी तिने माघार घेतली आणि परत येऊन बसच्या थांब्यावर स्थानापन्न झाली. वाहकाने दुहेरी घंटा मारून बस सुरू करवण्यापूर्वी गुरुजी चपळाईने बसमध्ये चढले. दुस~या दिवशी त्यांना राजवैद्य भेटले तेव्हा त्यांनी ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली.
"पायांच्या ताकदीपलिकडे वजन वाढले की हे असे होते" राजवैद्य म्हणाले. "माझ्याकडे एक तरुण स्त्री उपचारांसाठी येत असे. तिच्या पतीचे अकस्मात निधन झाल्यावर ती मनाने खचली. नैराश्याच्या भरात मनाला विरंगुळा म्हणून ती खा खा खायला लागली. तिचे वजन येव्हढे वाढले की ती आली की जमिनीवर बसायची, आसनावर नाही. तिथून तिला कोणीतरी पडून उचलेपर्यंत तिला उठता येत नसे. नाहीतर ती जवळपासच्या मेज किंवा खुर्चीला पकडून हाताने अंग वर उचलून घेत असे."
"अरे बापरे" गुरुजी म्हणाले.
"लहान मुलांना होणारा डुशेन स्नायूंची डिस्ट्रॉफी नावाचा एक गुणसूत्रांशी संबंधित आजार असतो" राजवैद्य म्हणाले. "त्याच्यात त्या मुलांचे पायाचे स्नायू येव्हढे कमकुवत असतात, की जमिनीवर बसलेल्या स्थितीतून उभे रहाण्यासाठी ती मुले आपल्या पायांवर हाताने पावलापासून सुरुवात करून वरच्या दिशेला ढकलत जात जात चढतात आणि शेवटी उभी रहातात. हातांनी पायांवर चढतात म्हणा ना."
"याला काही उपाय?" गुरुजींनी विचारले. उद्या कोणावर अशी पाळी आली तर माहिती असलेली बरी असे त्यांच्या मनांत आले.
"डुशेनच्या आजाराला काही उपाय नाही. त्या दुस~या प्रकारात वजन आटोक्यात ठेवणे आणि नियमितपणे व्यायाम करणे या दोन गोष्टींमुळे सर्व ठीक होते."
रोज व्यायामशाळेत जाण्याचे आपले वय नाही. पण सायंकाळी दूरदर्शनवर काहीबाही बघत बसण्यापेक्षा पत्नीबरोबर अर्धा एक तास फिरायला जायचे असे गुरुजींनी ठरवले.
"अहो, या वयांत हे काय रोज फिरायला जायचे खूळ काढलेत?" त्यांच्या पत्नीने पतीची इच्छा समजल्यावर म्हटले.
"अग, तरूणपणी प्रेमासाठी फिरायचे असते, आणि या वयात तब्येत राखण्यासाठी" गुरुजींनी समजावले.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क