Tuesday, June 23, 2015

राक्षस

आटपाट नगरांतली गोष्ट आहे. गुरुजी फिरायला म्हणून बाहेर पडले होते. समोरून राजवैद्य येतांना दिसले. त्यांची भ्रुकुटी जरा वक्र दिसली म्हणून गुरुजींनी त्यांना थांबवले आणि विचारले,
"वैद्यराज, आपण जरा त्रासलेले दिसता. सर्व काही क्षेम आहे ना?"
"अहो गुरुजी काय सांगू? मला स्वतःला काही त्रास नाही. पण तो राक्षस आहे ना, त्याचे वर्तन पाहून मन विषण्ण होते हो."
"राक्षस? मी समजलो नाही" गुरुजी म्हणाले. प्रभू रामचंद्रांनी राक्षसांचा नायनाट करून तपे उलटली होती. आता नव्याने राक्षस कोठून आला हे त्यांच्या ध्यानांत आले नाही.
"अहो, आमचे एक सहवैद्य. त्यांनी एका प्रशिक्षणार्थी वैद्य मुलीला नको जीव करून टाकले आहे."
"काय करतात तरी ते काय असे?"
"अहो, मुलांची जात. शिकतांना चुका करायचीच. चुकले तर समजावून सांगायचे. तरी समजले नाहीत तर ओरडायचे. अती झाले तर शिक्षा म्हणून त्यांची शल्यक्रिया करण्याची पाळी येईल तेव्हा त्यांना त्या संधीपासून वंचित ठेवायचे. पण त्यांचा छळ नसतो हो करायचा या राक्षसासारखा."
"काय केले तरी काय त्यांनी?" गुरुजींनी भीत भीत विचारले. मुलीला त्याने काय केले असेल अशा विचाराने त्यांच्या मनाला कापरे भरले.
"अहो, त्या दिवशी मी रुग्णांना तपासण्याच्या फेरीवर होतो तेव्हा पाहिले. ही मुलगी रुग्णकक्षाबाहेर रुग्णांसाठी प्रसाधनग्रुह आहे त्याच्या दारांत उभी होती. चेहेरा रडकुंडीला आलेला होता. कक्षांत गेलो तर राक्षस इतर प्रशिक्षणार्थी वैद्य आणि कनिष्ठ वैद्य यांच्याबरोबर रुग्ण तपासत होता. मग समजले की तिला शिक्षा म्हणून बाहेर उभे केले होते."
"प्रसाधनग्रुहाबाहेर उभे?" गुरुजींना शरमल्यासारखे वाटले. येव्हढ्या शिकलेल्या मुलीला सर्वांसमोर असे लज्जित केल्यामुळे तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल या कल्पनेने त्यांना कसनुसे झाले.
"मी कक्षाबाहेर आलो आणि तिला म्हटले, बाळ, अशी उभी राहू नकोस. या आसनावर बस. ती म्हणाली, नको वैद्यराज, मी उभीच रहाते" राजवैद्य म्हणाले.
"हं ..." गुरुजींना बोलण्यासारखे काही सुचले नाही.
"आज तर कहरच झाला. राक्षस स्वतःच्या सर्व प्रशिक्षणार्थींना घेऊन मेजवानीला गेला. कार्यकाळात जाण्याची गरज नव्हती, तरी पण गेला. पण या मुलीला नेले नाही."
"तिचा उपास वगैरे असेल" गुरुजी पुटपुटले. पण त्यांना मनांतून खात्री वाटत होती की तिचा उपास नसणार.
"छे हो! हल्लीची मुले उपास करतात काय? ती सामान्य सभेला आली तेव्हा मी तिला विचारले, की तू मेजवानीला गेली नाहीस काय?. आपण काहीतरी खाऊन घेतले आहे, असे ती म्हणाली."
"प्रशिक्षणार्थी हे आपल्या मुलांसारखे असतात. त्यांच्यात असा दुजाभाव दाखवणे बरे नाही" गुरुजी म्हणाले.
"माझेही तेच मत आहे. अहो, काय सांगू? ती मुलगी एरवी कष्टी असते. आज राक्षस नव्हता तर ती चक्क स्मितहास्य करत होती" राजवैद्य म्हणाले.
"आता मला समजले आपण त्या वैद्यांना राक्षस का म्हणता ते" गुरुजी म्हणाले. "पण राजाकडे कोणी तक्रार घेऊन का जात नाही?"
"सर्व जण भितात हो. परिक्षेत अनु्त्तीर्ण केले तर, असे त्यांना वाटते. मांजराच्या गळ्यांत घंटा बांधणार कोण?"
"पण एक दिवस एखा्दी हळव्या मनाची मुलगी जीव देईल हो" गुरुजी म्हणाले.
"त्या चिंतेनेच तर मी पोखरला जातोय" राजवैद्य म्हणाले.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क