Friday, January 29, 2016

तूर्त विश्रांती

वाचकहो,
जून २००७ पासून मी या ब्लॉगवर लिहित आलो आहे. आपण माझ्या लिखाणाला दिलेल्या प्रतिसादामुळे माझा लिहित राहण्याचा उत्साह कायम राहिला. त्यांतून आपले मनोरंजन झाले असेल, काही नवे शिकायला मिळाले असेल, कदाचित काही गोष्टींकडे बघण्याचा द्रुष्टीकोनही बदलला असेल. लिहिण्यासारखे अजून खूप आहे, आणि नवनव्या गोष्टी घडतही राहणार आहेत. परंतू हे लिखाण मी तूर्त थांबवीत आहे. याला आपण निरोप असे न म्हणता एक विश्रांती असे म्हणूया. पुढेमागे मी परत लिहिण्यास सुरुवात करेन की नाही हे आज सांगता येत नाही. आजपर्यंत लिहिलेले लेख या संकेतस्थळावर गूगल राहू देईल तोपर्यंत तरी उपलब्ध राहतील. आपल्या संपर्कात माझ्या लिखाणामधून होतो ते थांबवताना मन भरून आले आहे. आपला लोभ होता तसाच राहू द्या ही विनंती.

आपला,
शशांक परुळेकर

माझी दुसरी कादंबरी ः डॉक्टर चाणक्य

Wednesday, January 27, 2016

झपाटलेले

आटपाट नगरच्या राजवैद्यांना एक वेगळीच रुग्ण बघायला मिळाली. सामान्यपणे असे रुग्ण मानसोपचारतज्ज्ञांकडे जात असत. पण ही रुग्ण नऊ महिन्यांची गर्भवती होती. म्हणून ती त्यांच्याकडे प्रथम पाठविली होती.
"राजवैद्य, या बाईंचा पती म्हणतो की त्यांना कोणत्यातरी पिशाच्चाने झपाटलेले आहे. त्यामुळे त्या मधून मधून बेशुद्ध पडतात" राजवैद्यांच्या पदव्युत्तर विद्यार्थी वैद्याने सांगितले. "आम्ही मग त्यांना मानसोपचारतज्ज्ञांना दाखविले."
"कोणाला? बाईंना की त्यांच्या पतीदेवांना?" राजवैद्यांनी विचारले.
"बाईंना" विद्यार्थी वैद्य हंसून म्हणाले. "परत असे झाले तर बाईंना जीवनसत्वे सलाईनमध्ये घालून द्या असे ते म्हणाले."
"जीवनसत्वांमुळे बाई बर्‍या होतील असे वाटत नाही" राजवैद्य म्हणाले. "त्यांना मानसोपचारांची गरज आहे."
"बाईंच्या गर्भाची वाढ नीट होत नाही म्हणून आम्ही पूर्वी त्यांना रुग्णालयांत दाखल करून घेतले होते. त्यामुळे त्यांच्या पतीदेवांनी पिशाच्च उतरविण्याची सुरू केलेली प्रक्रिया खंडित झाली आणि बाई घरी गेल्यावर सलग पाच दिवस बेशुद्ध झाल्या म्हणे."
"हं...." राजवैद्य म्हणाले. 
"आता काय करावयाचे?" विद्यार्थी वैद्याने विचारले.
"त्यांची प्रसूती करून घ्या, म्हणजे बाळाचा जीव वाचेल. मग बाईंना मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारासाठी पाठवा" राजवैद्य म्हणाले.
"आपण अशा प्रकारचे रुग्ण पूर्वी पाहिले आहेत का?" विद्यार्थी वैद्याने राजवैद्यांना विचारले.
"हो. रुग्णच का? त्या दिवशी एका  विद्यार्थी वैद्याने रजा घेतली, पण रजेचा अर्ज न देता उलट हजेरीपटावर सही केली अशी तक्रार त्याचे वरिष्ठ माझ्याकडे करत होते. त्याला सही करायची नव्हती, पण कोणीतरी त्याला तसे करण्यास भाग पाडले म्हणे. ते भाग पाडणारे कोण होते कोण जाणे."
"असे?"
"ते तर काहीच नाही. तक्रार करणार्‍या त्या वरिष्ठांनी स्वतःच्या रजेच्या दिवशी उशीरा येऊन रजा रद्द केली, हजेरीपटावर सही केली आणि लवकरची वेळ टाकली, आणि त्या गोष्टीचे छायाचित्र आग्यावेताळ वैद्यांनी घेतले म्हणे. हा पण झपाटण्याचाच प्रकार नाही का? म्हणजे छायाचित्र घेणे नव्हे, सही करणे."
विद्यार्थी वैद्यांना या दोनही गोष्टी माहित होत्या असे दिसले. उत्तरादाखल ते मंदसे हंसले.

Monday, January 25, 2016

Free eBooks

 English

 

 
 
 
 
 
 
 
 
 
  
 



 

 

 

 

Syndromes in Gynecology & Obstetrics

 


 

 

 

Gynecological & Obstetric Pathophysiology

 Marathi


डॉक्टरबाबू!



डॉक्टर चाणक्य


डॉक्टर मितवा


चाणक्यचित्रे





संभाषणाचे खेळ

परमेश्वराला त्रास

गणेशोत्सवात श्री गणपतीबापाची मिरवणूक वाजतगाजत काढणे हे अतिशय आवश्यक कार्य आहे असे अनेक जणांना वाटते. त्या वाजण्याचा आवाज बापापर्यंत पोचला पाहिजे आणि त्यासाठी तो धनीवर्धकाला शक्य असेल तेव्हढा मोठा असला पाहिजे अशी धारणा अस्णेही क्रमप्राप्त असते. अशाच एका मिरवणूकीत तो आवाज एव्हढा मोठा होता की काही विचारू नका. सर्व मिरवणूकांतला संयुक्त आवाज सहन करून बापा अगदी कंटाळले असावेत. या मिरवणूकीने तर कहर केला. शेवटी बापांनी एव्हढा मोठा पाऊस आणला, की आपली वाद्ये मागे ठेवून वाजंत्री रस्त्यापलीकडे आडोशाला गेले. आवाज थांबला. बापांच्या मागचा त्रास थांबला.

पावसात भिजणारी वाद्ये.

आडोशाला थांबलेले वाजंत्री.



Sunday, January 24, 2016

सुपरमूनः खरा की आख्यायिका

दिनांक २७-२८ सप्टेंबर २०१५ रोजी आपल्याकडे सुपरमूनचे दर्शन झाले. माझ्याकडे आकाशातल्या ग्रहतार्‍यांचे छायाचित्र घेऊ शकेल अशी दुर्बीण आणि कॅमेरा नाही. मी आयपॅडवर घेतलेले छायाचित्र खाली दाखविले आहे. दुर्बिणीतून घेतलेल्या छायाचित्रायेव्हढा हा चंद्र मोठा दिसत नाहीये. पण टेकडीवर उभे राहून सुपरमून पहाणार्‍या माणसांच्या छायाचित्रात अर्धेअधिक छायाचित्र व्यापेल येव्हढा मोठा चंद्र दिसतो त्यांत काहीतरी गोलमाल असावे असा माझा अंदाज आहे. माझ्या छायाचित्रात दिसणार्‍या दुरवरच्या इमारतींच्या तुलनेत चंद्र किती मोठा दिसतो आहे ते पाहिले की त्याच्या आकाराची कल्पना यावी.


काल पौर्णिमा होती. काल मी त्याच ठिकाणाहून चंद्राचे काढलेले छायाचित्र खाली दाखविले आहे. मागच्या छायाचित्रापेक्षा चंद्र आकाशात जास्त वर आलेला आहे. पण आकारात तो मागच्या सुपरमूनपेक्षा काही लहान दिसत नाहीये. सुपरमून ही खरी गोष्ट आहे की आख्यायिका?



(Keyword: Supermoon True or Myth?)

Saturday, January 23, 2016

पाच पायांचा कीटक

हा कीटक कोणता आहे ते मला सांगता येणार नाही, पण तो जगावेगळा आहे हे मात्र नक्की. कीटकांना सहा पाय असतात, पण याला मात्र पाचच आहेत. एक पाय तुटल्यामुळे तसं कदाचित झालं असावं, पण जर तसं झालं असेल, तर ते बर्‍याच काळापूर्वी झालं असावं, कारण तो आता दिसतोय त्याच ठिकाणी त्याच स्थितीत दिवसभर तरी होता. अगदी शांत होता. जर पाय नुकताच तुटला असता, तर तळमळत असता, असं मला वाटतं.

Friday, January 22, 2016

पॅराशूट फूल

निसर्गात कशा गमती जमती असतात पहा.


गुलाबी बोगनवेलीची फुले खाली दिसत आहेत. त्यांच्या वर गुलाबी-जांभळे छोटेसे पॅराशूट दोर्‍याने लटकताना दिसत आहे. तारा नसलेल्या छत्रीसारखे ते दिसते आहे. खरे तर ते आमच्या वरच्या फ्लॅटमध्ये रहाणार्‍यांच्या गॅलरीत लावलेल्या झाडाचे फूल आहे. ते गडद लाल रंगाचे असते आणि त्याला लांब देठ असतो. ते कोमेजले की देठासकट गळून पडते आणि आमच्या बोगनवेलीत दोर्‍यासारख्या दिसणार्‍या देठाने अडकते. अगदी हुबेहूब आकाशांतून पडलेल्या पॅराशूट सारखे दिसते. त्याचे नाव काय आहे कोण जाणे. मी त्याला पॅराशूट फूल म्हणतो. पुढे मागे त्याचे खरे नाव कळले की येथे टाकतोच.

Wednesday, January 20, 2016

बाळंतिणीच्या कानांत कापूस

आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयात प्रसूत झालेल्या स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिन, मुलांसाठी झबली वगैरे विकण्यासाठी राजाने एक गरजू अपंगाला प्रसूतीकक्षाबाहेर बसण्यासाठी जागा दिली होती. तो त्यातून पोटापाण्यापुरते मिळवत असे. स्त्रियांचीही सोय होत असे.
"हा विक्रेता मोठा हुशार आहे. ग्राहकांना काय पाहिजे ते तो बरोबर जोखून आहे" राजवैद्य गुरुजींना म्हणाले.
"अरे वा!" गुरुजी म्हणाले. "नक्की काय करतो तो?"
"त्याच्याकडे मुलांना गुंडाळण्यासाठी निळी दुपटी आणि अंगात घालण्यासाठी निळी झबली मिळतात. मुलींसाठी याच गोष्टी तो गुलाबी रंगाच्या ठेवतो. स्त्रिया खूष असतात."
"अगदी पाश्चात्य लोकांसारखे करतोय तो" गुरुजी म्हणाले.
"आपल्या आणि पाश्चात्य संस्कृतीचा मिलाफ घडवून आणतो तो" राजवैद्य म्हणाले. "बाळंतिणीला कानांत घालण्यासाठी कापसाचे बोळे सुद्धा विकतो तो."
"ते कशाला? गुरुजींनी विचारले.
"बाळंतिणीच्या कानांत वारा जाऊ नये म्हणून कानांत कापूस घालण्याची आपल्याकडे प्रथा आहे" राजवैद्य म्हणाले.
गुरुजींनी त्यांच्याकडे अचंभ्याने पाहिले. राजवैद्यांनी उत्तरादाखल स्मित केले.
"यात पाश्चात्य संस्कृती कोठे आली?" गुरुजींनी विचारले.
"मुलगा झाला तर तो निळे कापसाचे बोळे विकतो, आणि मुलगी झाली तर गुलाबी बोळे विकतो" राजवैद्य म्हणाले.
"आणि जुळे मुलगा-मुलगी झाले तर?" गुरुजींनी विचारले.
"तर एक निळा आणि एक गुलाबी अशा दोन बोळ्यांची पाकिटे मिळतात त्याच्याकडे" राजवैद्य म्हणाले.
"आणि लोक ते विकत घेतात?" गुरुजींनी विचारले.
"हो तर" राजवैद्य म्हणाले.

Monday, January 18, 2016

बागकामाने बुडविला धर्म?

गुरुजी कामावरून घरी आले. त्यांच्या पत्नीने त्यांच्या पुढ्यात चहाचा पेला ठेवला. गुरुजींनी वाफाळणार्‍या चहाचे दोन घोट घेतले आणि सुखात ऐसपैस बसले.
"अहो, आज काय गंमत झाली म्हणून सांगू" त्यांची पत्नी म्हणाली. "आपल्या पलीकडच्यांच्या सुनेने अगदी कमालच केली."
"पलीकडचे म्हणजे ..."
"तेच ते. त्यांच्या मुलाचे नवे लग्न झाले आहे ना? त्यांची सून झाडांची रोपे विकणार्‍या व्यवसायिकाकडे कामाला आहे. आपल्या घरी तिने हौसेने तुळस आणून लावली. ती छान वाढावी म्हणून तिला खत वगैरे घातले."
"मग तुळशीने जोर धरला असेल" गुरुजी म्हणाले.
"ते तर झालेच. पण घरगुती खत म्हणून तिने साध्या पाण्याऐवजी मासे धुतलेले पाणी तुळशीला घातले."
"बरं मग?" गुरुजींनी विचारले.
"अहो असे काय करता? तुळस, त्यातून ब्राम्हणी तुळस. तिला माशांचे पाणी घातले. तिची सासू कर्मठ. सुनेने धर्म बुडविला म्हणून ओरडते आहे."
"मग काय केले तिने?"
"काय करणार? तुळस धु्वून घेतली. तिची माती बदल अशी सुनेला आज्ञा केली."
"माती बदलताना मुळे धुवून घेणार का?"  गुरुजींनी विचारले. त्यांच्या बोलण्यातला उपरोध त्यांच्या पत्नीच्या लक्षांत आला नाही.
"बहुतेक" ती म्हणाली.
"तसे करतांना तुळस मेली म्हणजे?" गुरुजींनी विचारले.
"तुळस शुद्ध झाली पाहि्जे. मग ती मेली तरी बेहत्तर असे ती म्हणत होती" त्यांची पत्नी म्हणाली.
"देवा, वाचव रे त्या तुळशीला" असे मनातल्या मनात कपाळाला हात लावून गुरुजी म्हणाले.

Thursday, January 14, 2016

मराठी पाट्या

आटपाट नगरच्या जनतेने निवडून दिलेल्या पक्षाने ठराव केला की सर्व दुकानांवरच्या पाट्या मराठीत असल्या पाहिजेत. ज्या दुकानदारांनी मराठी पाट्या बनविल्या नाहीत त्यांच्यातल्या काही जणांच्या पाट्यांना डांबर फासण्यात आले. ताबडतोब उरलेल्या सर्वांनी मराठी पाट्या बनवून आपापल्या दुकानांवर लावल्या. पाट्या शुद्ध मराठीत असल्या पाहिजेत असे काही ठरावात नव्हते. त्यामुळे अमराठी दुकानदारांनी आणि जे मराठी असून त्यांना मराठी लिहिता वाचता येत नव्हते अशा जणांनी गंमतीदार पाट्या बनविल्या. त्यांची काही उदाहरणे खाली दाखविली आहेत.
साई समर्थ टूर्स आणि ट्रॅवर्ल्स
साई, समर्थ, टूर्स या तीनही शब्दांच्या शेवटच्या अक्षरावर रफार होता, त्यामूले तो ट्रॅवल्सच्या शेवटच्या अक्षरावरही असला पाहिजे असे बिचार्‍याला वाटले असावे.
मेन,स वेअर
आंग्लभाषेत Men's Wear अशी असलेली पाटी मराठीत बनविताना Men's मधला अपॉस्ट्रोफी मराठीत आणला आणि इंग्रजी व्याकरणही कच्चे असल्यामुळे अपॉस्ट्रोफी आणि स्वल्पविराम यांतला फरक न समजल्यामुळे बिचार्‍याने मेन,स असे लिहिले असावे.
कोस्ट टू कोस्ट
आंग्लभाषेतील Cost to Cost अशी असलेली पाटी मराठीत आणली खरी, पण Cost च उच्चार नीट माहीत नसल्यामुळे त्याने तो कोस्ट असा लिहिला. देशाच्या दोन किनार्‍यांमधल्या भागाबद्दल हे दुकान असावे असे ग्राहकांना वाटेल आणि आपला धंदा बुडेल याची त्याला कल्पना नसावी.

Tuesday, January 12, 2016

दांडीची भविष्यवाणी

आटपाट नगरच्या राजवैद्यांना एक जुनी आठवण आली आणि ते स्वतःशीच हंसले.
"काय राजवैद्य, कोणाची आटवण आली?" गुरुजींनी मिश्किलपणे विचारले.
"तुम्हाला वाटतेय तसे काहीही नाही" राजवैद्य म्हणाले. "म्हातारपणी थट्टा करता काय माझी?"
"छे छे! मी पण म्हाताराच. मी काय थट्टा करणार तुमची? असे स्वतःशीच हंसलात म्हणून विचारले" गुरुजी म्हणाले.
"मी पदव्युत्तर शिक्षण घेत होतो तेव्हाची गोष्ट आहे. मी हात वाचून भविष्य कसे सांगायचे ते शिकत होतो. ते आमच्या बरोवरच्यांना समजले. सगळ्यांनी आपापले हात भविष्य वाचा म्हणून माझ्यापुढे केले."
"मुलींचे हात हातांत घेण्यासाठी ही एक नामी युक्ती आहे असे म्हणतात" गुरुजी म्हणाले.
"गुरुजी, आज आपण आमच्यावर कसले संशय घेता आहात?" राजवैद्य म्हणाले.
"छे छे! मी तुमच्याबद्दल बोलत नव्हतो. मी आपले एक सर्वसाधारण विधान केले."
"मी एक एक करून तिघा जणांचे हात पाहिले. त्यांना दीर्घायुष्य, संपत्ती, यश, संततीसुख वगैरे गोष्टी मिळतील असे दडपून दिले. ते खूष झाले. मग एका मुलीने हात पुढे केला."
गुरुजी्नी मंदसे स्मित केले. राजवैद्यांनी तिकडे दुर्लक्ष केले.
"ती अभ्यास करत नसे. या संधीचा फायदा घेऊन तिला अभ्यास करण्यास प्रवृत्त करता येईल असे मला वाटले. मी तिचा हात पाहिला. हातात घेऊन नाही हो" गुरुजींकडे नजर टाकून राजवैद्य म्हणाले. "माझे दोन्ही हात पाठीमागे धरून मी दुरूनच तिचा हात पाहिला. इतक्या वर्षांनी तुम्ही माझ्या नीतीमत्तेबद्दल संशय घ्याल हे मला माहित होते."
गुरुजीनी परत स्मित केले.
"तू अभ्यास केला नाहीस तर परीक्षेत तुझी दांडी जाईल" असे मी तिला सांगितले." राजवैद्य म्हणाले.
"बास? येव्हढेच?"
"हो. येव्हढेच" राजवैद्य म्हणाले.
"मग काय झाले?" गुरुजींनी विचारले.
"कालांतराने तिची परीक्षा झाली. ती नापास झाली. मी असे भविष्य सांगितले म्हणून ती नापास झाली असे ती चार जणांना म्हणाली. मला वाटते मी 'अभ्यास नाही केला तर' असे म्हटले होते ते तिला ऐकू गेले नसावे, समजले नसावे, किंवा त्याचे तिला विस्मरण झाले असावे. किंवा नापास होण्याचे कारण ती स्वतः नसून इतर काहीतरी किंवा कोणीतरी असावे असे तिला सिद्ध करावयाचे असावे."
"मग आपण यातून काय शिकलात?" गुरुजींनी विचारले.
"कोणाचे भले करण्यासाटी सुद्धा कधीही भविष्य सांगायचे नाही" राजवैद्य म्हणाले.

Sunday, January 10, 2016

प्रतीकृती

आटपाट नगरच्या राजवैद्यांच्या दोन जुन्या विद्यार्थिनी त्यांना भेटायला वर्षांतून एकदा तरी येत असत. आपापल्या वैद्यक व्यवसायांत काय चालले आहे त्याची माहिती देत असत. थोड्या जुन्या आठवणी काढत असत. घटकाभर बोलून निघून जात असत. अशाच एकदा त्या आल्या होत्या. थोडे बोलणे झाल्यावर त्यांतली एक म्हणाली, "राजवैद्य, दूरदर्शनवर आंग्लभाषेत वैद्यांच्या रुग्णालयातील घडामोडींवर एक मालिका सुरू आहे. तिचे नाव आहे 'हाऊस एम्. डी.' आपण तो अवश्य बघावी."
"डोळ्यांना त्रास होतो म्हणून मी दूरदर्शन बघत नाही" राजवैद्य म्हणाले. "तरी पण आपण म्हणता तर बघेन."
सहा महिने गेले. दोघी राजवैद्यांना भेटायला परत एकदा आल्या. थोडा वेळ बोलणे झाले.
""राजवैद्य, दूरदर्शनवर ''हाऊस एम्. डी.' ही मालिका सुरू आहे ती बघा. छान आहे" ती मागच्या वेळी शिफारस करणारी वैद्य म्हणाली.
"मी त्या मालिकेचे तीन भाग पाहिले. तो डॉक्टर हाउस आहे ना, तो अगदी माझ्यासारखाच आहे."
त्यावर ती वैद्य खूश होऊन हंसली. आपल्याला समजले ते राजवैद्यांनाही समजले याचा तिला आनंद झाला.
"म्हणजे त्याची रुग्णांबरोबर आणि प्रशासनाबरोबर वागण्याची पद्धत माझ्यासारखीच आहे. मला त्याच्यासारखा पायाचा त्रास नाही आणि मी दुखीच्या गोळ्या सेवनही करत नाही. आता स्वतःसारखीच व्यक्ती दूरदर्शनवर काय पाहायची, म्हणून मी ती मालिका बघायचे बंद केले."
राजवैद्यांना त्यांच्या स्वभावाची व्यक्ती त्या विद्यार्थिनीने का दाखविली कोण जाणे. पण जाईपर्यंत ती स्वतःशीच स्मितहास्य करत होती.


Friday, January 8, 2016

दुट्टीची गोष्ट

आटपाट नगरच्या राजाच्या सर्व कर्मचार्‍यांना मराठी भाषेची १०वीची परीक्षा उत्तीर्ण होणे प्रशासनाने सक्तीचे केले होते. राज्यातल्या जनतेच्या भाषेत सर्व व्यवहार झाले तर जनतेचा फायदा होईल असा त्यामागचा विचार होता. विचार व नियम स्तुत्य होते याबद्दल काहीच शंका असण्याचे कारण नव्हते. नियम राजाच्या रुग्णालयांत नेमणूक होण्याची इच्छा बाळगणार्‍या वैद्यांनाही लागू होता. जर १०वीच्या परीक्षेत मराठी विषय घेतलेला नसला, तर स्वतंत्रपणे तेव्हढ्या विषयाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय नोकरी मिळत नसे. अर्थात परीक्षा उत्तीर्ण झाली म्हणून मराठी समजत असे अशातली गोष्ट नव्हती.
उत्तर भारतवर्षातील अशाच एका अमराठी भाषिक वैद्याने राजाच्या रुग्णालयात नोकरी मिळवली. पण या वैद्यांना मरठीचा ओ की ठो समजत नसे. रुग्णांबरोबर संवाद साधण्यासाठी त्यांना नेहमी दुभाषा लागत असे. राजवैद्यांनी या वैद्यांना एकदा स्पष्ट विचारले की त्यांनी मराठीची परीक्षा खरोखरच उत्तीर्ण केली होती का, तर त्यांनी उत्तरादाखल आपली त्या परीक्षेची गुणपत्रिकाच दाखविली.
"मग आपल्याला आम्ही बोलतो ते समजत का नाही?" राजवैद्यांनी विचारले.
"मी गेल्या पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहून या वर्षी कोणते प्रस्न विचारले जाणार ते ठरवले, आणि त्यांची उत्तरे पाठ केली. त्यामुळे मी पास झाले" वैद्यबाई आंग्लभाषेत म्हणाल्या.
राजवैद्यांनी मनांतल्या मनांत कपाळाला हात लावला.
वैद्यबाईंची कालक्रमणा दुभाषाच्या मदतीने सुरूच राहिली. कालांतराने त्यांनी नियमाप्रमाणे मराठी भाषेत रजेसाठी अर्ज केला. तो अर्ज वाचून राजवैद्यांना हसावे की रडावे तेच कळेना.
"मला दिनांक ९६-९२-२०९५ ला रजा द्यावी. त्या काळात माझी दुट्टी वैद्य अमुक-तमुक करतील."
बाईंना १ आणि ९ मधला फरक समजत नसावा, त्यामुळे त्यांनी १६-१२-२०१५ ऐवजी ९६-९२-२०९५ असे लिहिले असावे हे राजवैद्यांच्या लक्षांत आले. पण दुट्टी म्हणजे काय ते मात्र त्यांना समजले नाही. त्यांनी वैद्यबाईंना बोलावून घेतले आणि दुट्टी या शब्दावर बोट ठेवून ते काय आहे असे विचारले.
"ड्यूटी (Duty)" असे वैद्यबाईंनी सांगितले. येव्हढे साधे मराठी राजवैद्यांना स्वतः मराठी भाषिक असून समजू नये याचे आश्चर्य त्यांच्या चेहेर्‍यावर स्पष्ट दिसते होते.
"आपण लिहिलेल्या शब्दाचा उच्चार ड्युटी असा न होता दुट्टी असा होतो" राजवैद्य संयमाने म्हणाले. "दुट्टी असा शब्द मराठी भाषेत नाही. आपण रजेचा अर्ज नीट शु्द्ध मराठी भाषेत लिहून देता की आहे त्याच स्थितीत महाराजांकडे पाठवू?"
अर्ज दुरुस्त करून आणते असे सांगून वैद्यबाई गेल्या. दुसर्‍या दिवशी अर्ज परत आला.
"अरे वा, इतक्या सुवाच्य अक्षरांत आणि अतिशय शुद्ध भाषेत अर्ज आलाय. त्यांनी नक्कीच कोणाकडून तरी तो भरून घेतला असणार" राजवैद्य म्हणाले.
"मीच भरून दिला" अर्ज घेऊन आलेल्या रुग्णालयाच्या लिपिक-टंकलेखिका म्हणाल्या. "त्यांनी खूपदा सांगूनही इतक्या चुका केल्या की शेवटी स्वतःच अर्ज भरून देणे जास्त बरे हे माझ्या लक्षांत आले."
राजवैद्य हंसले.

Wednesday, January 6, 2016

सरकारी खर्चात स्वीय गुलाम

आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयात आरोग्य विद्यापीठाकडून आलेले एक परिपत्रक राजवैद्यांकडे पोहोचले. ते वाचून झाल्यावर त्यांनी ते इतर वैद्यांना वाचण्यासाठी दिले.
"शेवटी विद्यापीठाने या विषयाला हात घातला तर" एक वरिष्ठ वैद्य म्हणाले.
"कोणीतरी दट्ट्या लावला असेल" दुसरे एक वैद्य म्हणाले. "उच्चपदस्थांना रुग्णालयांत काय चालते ते इतके दिवस माहीत नव्हते काय? आपल्यासारखेच तेही वैद्य. एक दिवस रोजचे काम सोडून विद्यापीठांत पोहोचले म्हणून पूर्वीच्या गोष्टी विसरायला कशा होतील?"
"मी राजवैद्य झालो तेव्हा सर्व वैद्यांना बोलावून स्पष्ट सांगितले होते, की पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या निवासी वैद्यांना स्वतःची खाजगी कामे करायला लावू नका. तरीही त्यांनी तसे करणे सोडले नाही" राजवैद्य म्हणाले. "मी सद्वर्तनाचे उदाहरण घालून दिले त्याचाही काही उपयोग झाला नाही. आता विद्यापीठाकडून तसे परिपत्रक आले म्हणून ही मंडळी आपले वर्तन सुधारतील असे मला तरी वाटत नाही."
"हो. विद्यार्थ्यांनी तक्रार केली तरच विद्यापीठ कारवाई करेल. तक्रार करायला विद्यार्थी भितात" एक वैद्य म्हणाल्या. "ते खवीस वैद्य आहेत ते आपल्या खोलीतली शीतपेटी विद्यार्थ्यांना साफ करायला लावतात. आपल्या व्याख्यानाच्या स्लाईड्स त्यांच्याकडून करून घेतात, आणि व्याख्यानाच्या वेळी त्यांनाच स्लाईड्स दाखवायचे काम करायला घेऊन जातात. त्यांची बॅग त्यांच्या रथांत नेऊन ठेवायला विद्यार्थ्यांना लावलेलेही मी पाहिले आहे."
राजवैद्यांनीही ते पाहिले होते. ते काही बोलले नाहीत. विद्यार्थी तक्रार करत नाहीत तोपर्यंत ते काही करू शकत नव्हते.
"त्या दुसर्‍या वैद्य आहेत त्या आपल्या मुलीचा जेवणाचा डबा गरम करून आपल्या खोलीत नेऊन ठेवायचे काम विद्यार्थ्यांना करायला  लावतात. स्वतःच्या खाजगी रुग्णांना घेऊन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी तपासण्यांसाठी पाठवितात. दुसर्‍या रुग्णालयांत जाऊन स्वतःची खाजगी कामे करून यायला सांगतात."
राजवैद्यांना हेही माहीत होते. त्यांनी मान हलविली.
"शेजारच्या घाटावरच्या एका राज्यात तर वरिष्ट वैद्य विद्यार्थ्यांना बाजारात जाऊन भाजी आणायला सांगतात आणि आपल्या मुलांना शाळेत नेऊन सोडणे आणि परत आणणे ही कामेही देतात" तिसरे एक वैद्य म्हणाले. "इथले विद्यार्थी ही कामे करत नाहीत म्हणून पालिकेच्या दुसर्‍या रुग्णालयाचे राजवैद्य माझ्याकडे खंत व्यक्त करीत होते."
म्हणजे पोलीस किंवा सैन्यदलात अधिकारी हाताखालच्या शिपायांना स्वतःची असली कामे सरकरी पगरांत करायला लावतात असे वर्तमानपत्रांत वाचायला मिळते त्यांतलाच हा प्रकार झाला म्हणायचा" दुसरे वरिष्ठ वैद्य म्हणाले.
"आता विद्यापीठ अशक्य ते शक्य करून दाखविते का ते बघूया" राजवैद्य म्हणाले.

Monday, January 4, 2016

वैद्यकनीतीची ऐशीतैशी

आटपाट नगरचे राजवैद्य भृकुटी वक्र करून अनंतात पहात होते.
" राजवैद्य, आपण कोणत्या विचारांत व्यग्र आहात" गुरुजींनी विचारले.
"अं..." राजवैद्य भानावर आले. "काही नाही. मनाला त्रास देणारी जुनी आठवण आली. अशा आठवणी विस्मरणात जात नाहीत हा एक शापच आहे."
"राजवैद्य, तो शाप नसतो. तो आपल्याला आपली मुल्ये जपायला शिकवितो. त्याला परमेश्वराची कृपा समजायला हवे. कोणती आठवण आपल्याला आज व्यथित करते आहे?"
"वैद्यकी हा धंदा नाही, तो एक उदात्त व्यवसाय आहे असे हल्ली सर्वजण म्हणतात. मी तो वसा आयुष्यभर जपला. पण इतर सर्वांबद्दल मला तसे म्हणता येत नाही आमच्या रुग्णालयात एक वैद्य आहेत. त्या इतरांना ही गोष्ट कशी समजत नाही याबद्दल वेळोवेळी, जागोजागी बोलत असतात. त्यांच्याबद्दलची ही आठवण आहे. त्या आमच्या रुग्णालयात बदली होऊन आल्या, तेव्हा आमच्या बरोबरच्या, आम्हाला कनिष्ठ असणार्‍या त्यांच्या एका वरिष्ट वैद्यांनी काही महत्वाच्या कामासाठी दोन दिवसांची रजा मंजूर करून घेतली होती. ते दोन दिवस आमचे शल्यक्रिया करण्याचे होते. आम्ही आणि या नव्या वैद्य मिळून दोन शल्यक्रियागृहांत एकाच वेळी काम करून सगळ्या शल्यक्रिया पार पाडू असा मला विश्वास होता. ऐन वेळी या वैद्य मला म्हणाल्या, की त्यांना तेच दोन दिवस रजा घ्यायची होती. त्यासाठी आपल्या वरिष्टांची रजा रद्द करा असे त्या म्हणाल्या. आपल्याला रजा का हवी याचे त्यांनी काही स्पष्टीकरण दिले नाही. त्यांच्या वरिष्ठांची रजा ऐन वेळी रद्द करणे शक्य नव्हते असे मी त्यांना सांगितले. रुग्ण शल्यक्रियांसाठी कक्षांत सर्व तयारीनिशी दाखल झाले होते, त्यामुळे त्या शल्यक्रिया पुढे ढकलणे शक्य नव्हते हेही मी त्यांना सांगितले. त्यांनी त्या दोन दिवसांनंतर रजा घ्यावी असेही सुचविले. काही न बोलता त्या निघून गेल्या. त्या दोन दिवशी काहीही संपर्क न साधता त्यांनी दांडी मारली. शल्यक्रियेच्या दोन टेबलांकडे आलटून पालटून धावपळ करत मी सर्व शल्यक्रिया पार पाडल्या. कोठे काही अडथळा आला नाही ही परमेश्वरा्ची कृपा. तिसर्‍या दिवशी त्या कामावर आल्या तेव्हा त्यांनी एक शब्दानेही दिलगिरी व्यक्त केली नाही. ही तेव्हाचीच गोष्ट आहे असे नाही. घरी, परिचितांकडे काही छोटे मोठे काम निघाले की या वैद्य मधली इतकी सर्व वर्षे बिनदिक्कत गैरहजर रहात आल्या आहेत. ज्या रुग्णांच्या सेवेचा वसा घेतला आहे त्यांना आयुष्यात कायम दुय्यम स्थान देणार्‍या या वैद्य कायम इतरांना वैद्यक व्यवसाय एक धंदा बनविला आहे अशी दूषणे कशी देतात ते मला समजत नाही."
"राजवैद्य, माणसे अशीही असतात. आपण व्यथित होऊ नका. त्यामुळे अशी माणसे कधीही सुधारणार नाहीत. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले आहे त्याप्रमाणे आपण आपले कर्तव्य करत रहा, आणि बाकी सर्व परमेश्वरावर सोडा" गुरुजी म्हणाले.
"होय गुरुजी" राजवैद्य म्हणाले. भगवान श्रीकृष्णांवर विश्वास टाकल्यावर त्यांना शांत वाटले.

Saturday, January 2, 2016

वैद्यांचा छळ

आटपाटनगरचे राजवैद्य सकाळचे रुग्णपरिचर्येचे काम संपवून आपल्या कार्यालयांत बसले होते. तेव्हढ्यात  दोन कनिष्ठ वैद्य तेथे आल्या. त्यांच्या चेहर्‍यांवरून काहीतरी बिनसले आहे याची कल्पना येत होती.
"काय झाले? सर्व काही क्षेम आहे ना?" राजवैद्यांनी विचारले.
"राजवैद्य, काल आम्ही आपत्कालीन विभागात कार्यरत होतो. नवे वर्ष सुरू झाले म्हणून रात्री बाहेरून जेवण आणि सरबत मागविले होते. पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी वैद्यही जेवायला होते. जेवण झाले. सरबत कोणाला फारसे आवडले नाही म्हणून शिल्लक राहिले. उष्टे खरकटे साफ केले, पण सरबत टाकून द्यायचे जिवावर आले म्हणून त्याची बाटली टेबलावर तशीच ठेवली."
"मग काय झाले? कोणी ते पिऊन गेले काय?" राजवैद्यांनी विचारले. आणखी काही विपरित होईल असे त्यांना वाटले नाही.
"नाही हो. तसे झाले असते तर बरे झाले असते. पैसे फुकट गेले नसते. सकाळी आग्यावेताळ वैद्य आले ते आमच्या खो्लीत गेले. त्यांनी ती बाटली पाहिली. मग त्यांनी त्या बाटलीचे आपल्या मोबाईल फोनवर फोटो काढले. आता ते तुमच्याकडे तक्रार करणार आहेत."
"का? सरबत पिऊ नये असा नियम आहे का?" राजवैद्यांनी विचारले.
"आम्ही मद्य प्राशन केले असे ते सुचवित आहेत. पण ते सरबतच होते. आम्ही पण फोटो काढले आहेत. बाटलीवर सरबत असे लेबल लावलेले स्पष्ट दिसते आहे" वैद्य म्हणाल्या.
"त्या उरलेल्या सरबताचे आपण काय केले? रासायनिक परीक्षेसाठी पाठवायचे आहे का?" राजवैद्यांनी विचारले.
"नाही हो. आम्ही ते ओतून टाकले" वैद्य म्हणाल्या.
"ठीक आहे. तक्रार आली तर मी बघतो काय करावयाचे ते. आपण निश्चिंत रहा" राजवैद्य म्हणाले.
तक्रार काही आली नाही.
"आग्यावेताळ वैद्य असे इतरांना विनाकारण मानसिक त्रास का देतात?" दुसर्‍या एका वैद्यांनी राजवैद्यांना विचारले.
"स्वभाव. त्यांत त्यांना दुष्ट आनंद मिळत असावा. लहानपणी ते झुरळे पकडून त्यांचे ए्क एक पाय तोडत होते असणार, फूलपाखरांना पकडून त्यांचे पंख तोडत होते असणार, किंवा मुंग्यांना जळत्या उदबत्तीने मारत होते असणार. एक प्रकारचा मनोविकार आहे त्याच्यात असे होते. त्याला औषध नाही."
"आग्यावेताळ वैद्य सेवानिव्रुत्त होण्यापूर्वी अशा औषधाचा शोध लागावा" ते वैद्य म्हणाले.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क