Wednesday, September 30, 2015

उंदराच्या प्रेमात लेडी बग




मागे आपण माउसला लाजणारी लेडी बग बघितली होती. तिच्या जवळ माउसला नेले की ती लांब पळून जायची. तिच्याच सारख्या दुस~या एका लेडी बगला माउस येवढा आवडला की ती त्याच्या अगदी पाठीच लागली. माउस कोठेही गेला तरी ती त्याचा पिछ्छा काही सोडेना.

बिचारा माऊस. इंग्रजीत 'ऑल ऑर नन फिनोमेनॉन' असतो त्याचाच हा प्रकार म्हणायचा. एकीचे अजिबात नाही तर दुसरीचे येवढे की ती त्याला क्षणभरही एकटे सोडेना. आता त्यांना हे कोणी समजावून सांगायचे?

Monday, September 28, 2015

आपल्या पिल्लाच्या शोधात

ती एक छानशी मांजर होती. कालपरत्वे ती वयात आली आणि पुढे तिला पिल्लंही झाली. ती पिल्ले कोणी कोणी नेली. एक पिल्लू तिच्यापाशी उरलं. त्याच्यावर तिचं जिवापाड प्रेम होतं. एक दिवस ते पिल्लू दिसेनासं झालं. कोणी म्हणालं त्याला बोक्याने खाल्लं. कोणी म्हणालं त्याला कोणीतरी पकडून पोत्यांत घालून कोठेतरी नेलं आणि त्याचं काहीतरी केलं. नक्की काय झालं ते कोणालाच समजलं नाही. मांजरीलाही समजलं नाही. बिचारी आपल्या पिल्लाला शोधत सर्वत्र फिरली. दिवसांमागून दिवस गेले, पिल्लू काही सापडलं नाही, पण तिचा शोध काही थांबला नाही. तिच्यावर बेतलेला हा छोटासा चलतचित्रपट.




Thursday, September 24, 2015

फेरफटका

आटपाट नगरीच्या राजवैद्यांना त्यांच्या एका जुन्या विद्यार्थ्याने खाली असलेले 'फेरफटका' असे नाव दिलेले चलतचित्र भेट म्हणून विदेशातून पाठविले. ते पाहण्यासाठी आवश्यक ते संयंत्रही बरोबर पाठविले. त्यातील गोम राजवैद्यांना काही उमगली नाही. पण त्यांनी ते राजाच्या प्रमुख चित्रकाराला दाखविले.
"विदेशातील एका प्रसिद्ध चित्रकाराने हे बनविले आहे म्हणे" राजवैद्य म्हणाले. "ते काय आहे?"


चित्रकाराने स्मितहास्य केले आणि म्हणाला, "हे अतिशय प्रगत तंत्रज्ञान आहे. आपल्याकडे ते येण्यास बराच काळ लागेल. विदेशात फेसबूक असते.त्याच्या पानावर टाकले तर ते व्हायरल होईल."
राजवैद्यांना हे काही समजले नाही. पण त्यांनी आपल्या त्या विद्यार्थ्याला हा निरोप दिला. त्याने ते आपल्या फेसबूकच्या पानावर टाकले. ते व्हायरल झाले की नाही माहित नाही. त्याची एक प्रत येथे दाखविली आहे.

गणपतीबाप्पांना पत्र

श्री गणपतीबाप्पा, देवाधिदेवा, मी आपला एक भक्त, वर्षभर माझी सुखदुःखे आपल्याला सांगत असतो. हे पत्र लिहिण्यास कारण की सध्या सर्वत्र गणेशोत्सव सुरू आहे. त्या सर्व आवाजात माझा छोटासा आवाज कदचित आपल्यापर्यंत पोहोचायचा नाही. जे सांगायचे आहे ते पुढे ढकलण्यासारखे नाही. बाप्पा, लहानपणी आपला उत्सव म्हटला की आनंदाचे आणि उत्साहाचे भरते येत असे. आता अशी परिस्थिती आली आहे की पोटात भीतीचा गोळा येतो. आपल्या आगमनापासून सुरुवात होते. दिवसाउजेडी आपल्याला प्रतिष्ठापनेसाठी न आणता अर्ध्या रात्री वाद्यांच्या प्रचंड कोलाहलात आणले जाते. छातीत धडधडून मोडलेली झोप पुन्हा लागत नाही. आता अनंतचतुर्दशीपर्यंत कायकाय सहन करावे लागणार आहे त्याची ती नांदी असते. दिवसभर आणि कोर्टाच्या आदेशांचे उल्लंघन करून मध्यरात्रीपर्यंत ध्वनीवर्धकावर लहान मुले आणि स्त्रिया यांच्यासमोर ऐकायलाही लाज वाटावी अशी गाणी ब~याचदा लावलेली असतात. आपल्या दर्शनाच्या वेळी कानांत त्या गाण्यांचे शब्द येव्हढ्या मोठ्याने आदळत असतात की प्रार्थनेचे शब्द उच्चारता येत नाहीत. इतर वेळी आपल्याच आरत्या लागतील असा काही नेम नसतो. अनेक देवांच्या आणि साधूंच्या आरत्या आणि भक्तीगीते तेव्हढ्याच मोठ्या आवाजात ऐकावी लागतात. आपल्याला आपापल्या घरी आणून पूजण्यासाठी इतकी मंडळी गावाला गेलेली असतात की दैनंदीन कामे होत नाहीत. बस मिळत नाहीत. टॅक्सी आणि रिक्षावाले भाडे नाकारतात. आपल्याला आणण्यासाठी आणि नेण्यासाठी काढलेल्या मिरवणुका सारे रस्ते व्यापून असतात. त्यामुळे वाहतूक बंद असते. अशा वेळी डॉक्टर रुग्णालयात पोहोचू शकत नाहीत आणि अत्यवस्थ रुग्ण वाहतुकीत अडकलेल्या रुग्णवाहिकेतच राम म्हणण्याची शक्यता असते. आपले गल्लोगल्लीचे वेगवेगळे राजे म्हणून आगमन होते. एकच देव इतक्या राजांच्या रूपात कसा येऊ शकतो हे वर्तमानकाळाचे कोडे आहे. काही काही ठिकाणी तर आपल्या नावाचे फलक राजाधिराज म्हणून लागलेले मी पाहिले आहेत. त्यांतले काही राजेच नवसाला पावतात, जेथे भक्तांची तुंबळ गर्दी होते. काही दिवसांनी वेगवेगळ्या राजांच्या प्रजांमध्ये युद्ध होईल अशी मला खूप भिती वाटते आहे. आपल्या नावावर सक्तीने वर्गणी वसूल करण्यात येते असे हायकोर्टाचे निरीक्षण त्या दिवशी वर्तमानपत्रात वाचले. जमवलेला पैसा नक्की कसा खर्च होतो त्याचा पत्ता नसतो असेही हायकोर्ट म्हणाले. मदिरा पिऊन लोकांनी आपल्या विसर्जनास जाऊ नये असे पोलिसांचे आवाहन वाचण्यात आले. त्या अर्थी काहीजण तसेही करत असणार असे वाटते. मिरवणुकांच्या वेळी ध्वनीप्रदूषणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून ढोल, ताशे, इलेक्ट्रिक बॅंजो, डीजे वगैरेंचा इतका प्रचंड कानठळ्या बसविणारा आवाज असतो, की त्या स्पंदनांच्या ठेक्यात त्यांच्याच बरोबरीने छातीचे हाड आणि आंतले ह्रुदय थरथरते. ते बंद पडत नाही ही केवळ आपली क्रुपा. मिरवुणीकीच्या पुढे तरुण मुले आणि मुली अंगाला आळोखेपिळोखे देऊन आणि अंगविक्षेप करून न्रुत्य करत असतात, ते खूपदा पाहवत नाही. हे विघ्नहर्त्या, या सर्व त्रासांना आपण आवरावे, त्या त्रास देणा~यांना सुबुद्धी द्यावी अशी आपल्या चरणी नम्र प्रार्थना आहे.

आपला नम्र भक्त.


Tuesday, September 22, 2015

बाळाची तीट

आटपाटनगरचे राजवैद्य प्रसूत्योत्तर कक्षाची फेरी मारत होते. एका नवजात अर्भकाला पाहून ते थबकले.
बाळाच्या गालावर त्याच्या आईने स्वतःच्या कपाळावर लावायची काळी टिकली चिकटवली होती. बाळ गाढ झोपेत होते. पण झोपेतही त्याचा हात त्याच्या गालाजवळ होता.
"अहो, तुम्ही बाळाच्या गालावर त्याला द्रुष्ट लागू नये म्हणून तीट लावतात त्या जागी तुमची कपाळावर लावायची काळी टिकली लावली आहे. कल्पना चांगली आहे. पण बाळ जागे झाले आणि त्याने गालावर काहीतरी चिकट लागते आहे ते मुठीत पकडून तोंडात घातले तर काय?"
बाळाची माता हंसली पण काही बोलली नाही.
"ती टिकली घशात गेली आणि त्याच्या श्वासनलिकेच्या तोंडावर अडक्ली तर ते गुदमरेल ना?" राजवैद्यांनी विचारले.
त्या मातेने घाईघाईने ती टिकली आपल्या बाळाच्या गालावरून काढली आणि पिशवीत टाकली.

Sunday, September 20, 2015

इच्छाश्रवण

इच्छाश्रवण
देवाने श्रवणशक्ती असलेला प्राणी बनविला, तेव्हा जो ध्वनी कानांवर पडेल तो ऐकण्याची शक्ती त्याला दिली. या यंत्रणेत जर दोष निर्माण झाला तर बहिरेपणा येणे, चित्रविचित्र आवाज ऐकू येणे (उदाहरणार्थ टिनिटस) असे श्रवणाचे विकार होऊ लागले. सिझोफ्रेनिया या मानसिक विकारात ध्वनी नसताना ऐकू येणे हे लक्षण दिसते (हॅलुसिनेशन). इतपत माहिटि सर्व वैद्यांना आणि ब~याच सामान्य माणसांनाही असते, जशी ती गुरुजींनाही होती. पण एक घटना अशी घडली की गुरुजी चक्रावले. शेवटी त्यांनी ते राजवैद्यांना विचारले.
"राजवैद्य, आज मोठी विचित्र घटना घडली. आमच्या एका शिक्षिकेच्या वर्गांत एक विद्यार्थिनी आहे. त्या मुलीचे शिक्षणांत लक्ष नाही त्याबद्दल तिच्या पालकांना सांगण्यासाठी बोलावले होते. मुलीची आई आली. तिच्याबरोबर बोलताना त्या शिक्षिकेने म्हटले, की जर मुलीने मन लावून अभ्यास केला नाही तर तिचे नुकसान होईल. तर शाळेत आम्ही प्रयत्न करत आहोतच, पण मुलीच्या आईवडिलांनी घरी तिच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे. त्यावर ती आई उसळून म्हणाली, की मुलीला शाळेतून काढून टाकू असे आपण कसे म्हणता? असे काय केले आहे यिने की तुम्ही तिला शाळेतून का्ढून टाकायला निघालात? आम्ही परोपरीने सांगितले की असे कोणीही म्हटले नाही, पण ती काही ऐकूनच घेईना. आपण आपल्या कानांनी तसे ऐकले असे तिचे पालुपद सुरूच. शेवटी कशीबशी समजूत काढून तिला घरी पाठविले. हे असे का झाले हे काही समजत नाही. तिला मानसिक विकार असावा असे काही वाटत नाही."
"गुरुजी, चूक ना तुम्हा शिक्षकांची, ना त्या विद्यार्थिनीच्या आईची. या प्रकाराला मी इच्छाश्रवण असे म्हणतो. माणुस जेव्हा प्रचंड मानसिक तणावाखाली असतो, तेव्हा कधीकधी त्याला इतर लोक काय म्हणतात ते ऐकू येत नाही, आलेच तर समजत नाही, आणि कधीकधी इच्छाश्रवण होत. म्हणजे जे आपल्याला ऐकावे लागेल ते त्याला ऐकू येते. कधीकधी जे ऐकण्याची त्याची आत्यंतिक इच्छा असते ते त्याला ऐकू येते. या स्त्रीला ज्या गोष्टीची भिती वातत होती ते तिला ऐकू गेले. आमच्याकडे सु्द्धा अलिकडेच अशीच एक रुग्ण आली होती. तिला बराच जंतूसंसर्ग झाला होता. मी तिला म्हटले की आपण औषधोपचारांनीच तुम्हाला बरे करू, शल्यक्रियेची आवश्यकता भासेल असे वातत नाही, आठवड्याभरात तुम्ही ब~या व्हाल. तासाभराने तिचा भाऊ मला भेटायला धावत पळत आला. म्हणाला, आपल्या बहिणीने हाय खाल्ली आहे. ति म्हणतेय की आपण तिला म्हणालात की तू आठवडाभरच जगशील. खरेच का हो ती आठवडाभरच जगेल? मी हतबुद्ध झालो. मी काय म्हटले होते ते मी त्याला समजावून सांगितले. मग तो शांत झाला आणि निघून गेला."
"अशा परिस्थितीत काय करावयाचे?" गुरुजींनी विचारले.
"ही गोष्ट घडून गेल्यावर काहीही करता येत नाही. असा प्रसंग येईल असे आधीच वाटले, तर एखादा त्रयस्थ साक्षीदार उपस्थित ठेवणे उपयुक्त ठरेल. जर सोय असेल तर संभाषण ध्वनीमुद्रित करणे सर्वात चांगले."
"माणसांना असे होऊ नये म्हणून काही करता येणार नाही का?" गुरुजींनी विचारले.
"गुरुजी, जे काही करायचे ते असे होणा~या माणसांनीच करायचे असते. मानसिक संतुलन राखणे आणि वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे या द्वारे असे श्रवण टाळता येईल. पण ते समजून घेतले तर ना!"

Friday, September 18, 2015

मुलगी? आमची नाही.

आटपाट नगरातल एका संध्याकाळी राजवैद्य आणि गुरुजी फिरायला म्हणून निघाले होते.
"राजवैद्य, हे लडकी बचाओ अभियान कसे चालले आहे?" गुरुजींनी विचारले.
"चांगले चालले आहे. पण लोकांची मानसिकता बदलायला हवी तशी बदलत नाहीये."
"ते कसे?"
"थोडीशी उदाहरणे पाहिली तर ते तुमच्या लगेच लक्षात येईल बघा. मध्यंतरी आमच्याकडे एका स्त्रीची प्रसूती झाली. तिला आधीच्या सहा मुली होत्या. तिच्या पतीने कक्षांतील दुस~या एका स्त्रीला झालेला मुलगा आणि त्याची मुलगी यांची गुपचूप अदलाबदल केली. अर्थात तो पकडला गेलाच. परत मुलगी झाली म्हणून चाळीतले सगळे जण आपल्याला हंसतील म्हणून आपण असे केले असे तो म्हणाला."
"अरे बापरे" गुरुजी म्हणाले.
"दुस~या एका स्त्रीला दोन मुलींवर तिसरी मुलगी झाली. आपल्या्ला झालेले मूल पण पाहिले आणि ती मुलगी आहे असे लिहून आई आणि बाप अशा दोघांनी सह्यासुद्धा केल्या. बाळाच्या पायाचे ठसेसुद्धा घेण्यात आले. दुर्दैवाने तिच्या शल्याक्रियेच्या नोंदी करताना शिकाऊ वैद्यांनी मुलगा अशी नोंद केली. त्यावरून त्या पित्याने रामायण घडविले. आपल्याला मुलगाच झाला आणि रुग्णालय आपल्या गळ्यांत मुलगी मारते आहे असा त्याने कांगावा केला. शेवटी डी.एन्.ए. चाचणी करून ती मुलगी त्याच जोडप्याची आहे हे सिद्ध केले तेव्हा कोठे ते आपल्या मुलीला घेऊन घरी गेले."
"काय माणसे असतात!" गुरुजी म्हणाले.
"मागे एक ग्रुहस्थ बाह्यरुग्णविभागांत आला होता. त्याला आधीच्या बारा मु्ली होत्या. आता त्याच्या पत्नीचा नववा महिना चालू होता. तो गर्भ मुलगा आहे की मुलगी ते सांगा असे तो म्हणत होता. अशा गोष्टीला कायद्याने बंदी आता आली आहे, पण तेव्हा नव्हती. आता लवकरच तिची प्रसूती होईल, तेव्हा मुल्गा की मुलगी ते कळेलच असे सांगून आम्ही त्याला परत पाठवले. मुलगा की मुलगी हे समजल्यावर येव्हढ्या मोठ्या गर्भाचे तो काय करण्याच्या विचारात होता देव जाणे."
"लग्न होऊन बरीच वर्षे मूल न होणा~या एका स्त्रीला हल्लीच तिळे झाले. मुले अपु~या दिवसांची अहेत आणि प्रसूती झाली तर ती कदाचित दगावतील असे आम्ही तिला समजा्वून सांगितले तरीही आपल्याला खूप त्रास होतो म्हणून आपल्याला मोकळी करा असा हेका तिने धरला होता. आम्ही तसे करत नव्हतो. शेवटी तिची प्रसूती झाली. तिला दोन मुलगे आणि एक मुलगी झाली. तशी ती व्यवस्थित दिसत होती. पण तिच्या प्रसूतीपूर्व वागण्यावरून ती आपल्या मुलांना प्रथम पाजेल आणि दूध उरले तरच मुलीला पाजेल अशी आम्हा सर्वांना भिती वाटत होती. शेवटी आम्ही तिने तसे करू नये असे तिचे समुपदेशन केले. आपण तसे करणार नाही असे आश्वासन तिने दिले तेव्हाच आम्ही तिला घरी पाठविले. पुढे तिने काय केले आणि आज तिची मुलगी कशी आहे ते परमेश्वरच जाणे.

Wednesday, September 16, 2015

भिंतीला चार कान

आटपाट नगरच्या गुरुजींचे शेजारी चौकस स्वभावाचे होते. गुरुजींच्या घरी कोणीही आले की शेजारी हजर होत. पाहुणे कोण, कशाला आले आहेत वगैरे चौकशी सहज केल्यासारखी करत आणि मगच आपल्या घरी अात. सुरुवातीला राग आला तरी नंतर गुरुजींना या गोष्टीची सवय झाली.
एक दिवस गुरुजींकडे रात्री साडेअकरा वाजता एक ग्रुहस्थ आले. ते गुरुजींच्या एका पुस्तकाचे प्रकाशक होते. काही जरूरीच्या कामासाठी ते येव्हढ्या  रात्री गुरुजींची परवानगी घेऊन आले होते. गुरुजींनी त्यांना घरात घेतले आणि आवाजामुळे शेजारपाजारच्यांना त्रास नको म्हणून दार बंद केले. पाच दहा मिनिटांत त्यांचे संभाषण आटोपले. गुरुजींनी त्यांना घरी जाण्यासाठी दार उघडून दिले आणि पहातात तर काय, शेजारचे ग्रुहस्थ आणि त्यांची आई गुरुजींच्या दाराजवळ भिंतीला कान लावून उभे होते. आपल्या घरांत काय संभाषण चालले आहे ते माय-लेक चोरून ऐकत आहेत हे गुरुजींच्या लक्षांत आले. आपल्याला गुरुजींनी रंगेहात पकडले हे दोघांच्या लक्षांत आले. तोंडातून अवाक्षर न काढता दोघे वळले आणि आपल्या घरांत जाऊन त्यांनी दार लावून घेतले.
"त्यांना चोरून ऐकायचे होते तर ते दाराबाहेर कशाला आले?" गुरुजी पत्नीला उद्देशून म्हणाले. "आपल्या दोघांच्या घरांमधल्या भिंतीला स्वतःच्या घरांतून कान लावता आले असते."
"अहो, दाराजवळची भिंत एका विटेची आहे. दोघांच्या घरांमधली भिंत दोन विटांची आहे. या लोकांनी प्रयोग करून कोठच्या भिंतीतून आपल्या घरांतले संभाषण ऐकू येते ते पाहून ठेवले असणार. म्हणून पकडले जाण्याचा धोका पत्करून दोघे दाराबाहेरच्या भिंतीला कान लावून उभे राहिले असणार" गुरुजींची पत्नी म्हणाली.
कालांतराने शेजारच्या माणसाची आई व्रुद्धत्वाने वारली. काही वर्षे गेली. एके दिवशी गुरुजींच्या घरी एक परिचीत आले. काही जटील समस्येवर संभाषण सुरू होते. बोलता बोलता आवाज वाढला.
"अहो, शेजारी बाहेर उभे राहून आपल्या घरांतील संंभाषण ऐकत आहेत असे वाटते" गुरुजींची पत्नी म्हणाली.
गुरुजींनी दार उघडून पाहिले. शेजा~याची पत्नी गुरुजींच्या दाराकडे कान करून उभी होती. गुरुजींनी आपल्याला चोरून ऐकताना पकडले हे लक्षांत येताच ती वरमली, जोराने खोटेच हंसली. गुरुजींनी उद्विग्न वाटले. काहीही न बोलता त्यांनी दार लावून घेतले.
"नवरा आणि सासू यांची गादी शेजारीण पुढे चालवतेय असे दिसते" गुरुजी पत्नीला म्हणाले. "अडीअडचणीला कासावीस झाले की आपल्याला रात्री बेरात्री हक्काने बोलावतात आणि स्वतःचे सर्व सुरळीत आहे असे वाटते तेव्हा आमच्या घरांत छिद्रे शोधायला येतात त्यांना लाज कशी वाटत नाही?"
"काय सांगावे?" गुरुजींची पत्नी म्हणाली. "परमेश्वारानेच त्यांनाही घडविले आहे. त्यांच्या अशा वागण्याचे काहीतरी प्रयोजन असेलही."

Monday, September 14, 2015

गूगलची पकड ढिली पडतेय का?

गूगल म्हणजे एक महाकाय कंपनी आहे. आता तर गूगलने इतर अनेक क्षेत्रांत प्रवेश केला आहे. इंटरनेट सर्च इंजीन, इ-मेल आणि संबंधित सेवा या गोष्टी जुन्या झाल्या तरीही त्यांत नवे नवे आणि प्रगत काहीतरी देत रहायचे ही गूगलची कार्यपद्धत राहिली आहे, अशा गूगलने प्रगती करतांना गोंधळ होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली असणार असे मला नेहमीच वाटत असे. पण गूगल क्रोम या वेब ब्राउजरचा हल्ली जरा त्रास जाणवायला लागला आहे. त्याला नावे ठेवण्यासाठी नव्हे, तर आपुलकी म्हणून हे स्फुट लिहित आहे.

हल्ली माझ्या हार्ड डिस्कवर मी बनविलेले फारसे कोडिंग नसलेले माझे होम पेज उघडताना क्रोम खूपच वेळ लावू लागला आहे. तसे झाले की खाली दाखविलेला संदेश येतो.


या छोट्याशा पानात अनरिस्पॉन्सिव होण्यासारखे काय आहे ते मला समजत नाही. इतर ब्राउजर्समध्ये असा त्रास होत नाही.

दुसरा एक त्रास असा की अधून मधून पानावर छापलेली अक्षरे कापली जातात. ते फक्त स्टॅटकाउंटर या वेबसाईटवर होते हे खरे, पण त्याच वेळी ते इंटरनेट एक्ष्प्लोररमध्ये होत नाही. ही गोष्ट खालील इमेजेस पाहून लक्षांत येईल.



गूगलला पत्र लिहून काही फायदा होणार नाही याची मला स्वानुभवावरून कल्पना आहे. पण गूगलबॉट वरचेवर माझ्या ब्लॉगला भेट देऊन इंडेक्षिंग करत असते, ते गूगल ट्रान्स्लेट वापरून मी त्याच्याबद्दल काय लिहिले आहे ते वाचून सुधारणा करेल अशी आशा आहे.

Saturday, September 12, 2015

सातवा वेतन आयोग

आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयात मानसिक हल्लकल्लोळ झाला. कोणा एका वरिष्ठ वैद्याच्या व्हॉ्ट्सॅपवर नवा संदेश आला. तो सातव्या वेतन आयोगाबद्दल होता. सरकारी कर्मचा~यांचे वेतन ठरविण्यासाठी सरकार वेतन आयोग नेमत असे. आतापर्यंत असे सहा वेतन आयोग होऊन गेले होते. आता सातव्या वेतन आयोगाचे काम चालू होते. वरिष्ठ  वैद्यांनी त्याचे स्वतः वाचन करून झाल्यावर परत इतरांसाठी सामूहीक वाचनही केले.
"आपला पगार वाढवून मिळण्यासाठी आता सातवा वेतन आयोग येणार आहे. आता आहे त्यापेक्षा वेतन तर जास्त मिळेल. त्यामध्ये वैद्यांच्या सेवानिव्रुत्तीच्या वयाची अट समाविष्ट आहे. ज्या दिवशी आयोगाच्या अटी लागू होतील त्या दिवशी ज्यांचे वय ५० असेल ते सर्व वैद्य सेवानिव्रुत्त होतील."
फक्त तरुण वैद्य सोडले तर सर्वच वैद्यांचे वय ५० च्या वर होते.
"असे झाले तर सर्व वरिष्ठ आणि मधल्या फळीतले वैद्य सेवानिव्रुत्त होतील" एक वैद्य म्हणाले. "मग राजाचे रुग्णालय चालविणार कोण?"
"जर वरिष्ठ वैद्य नसतील तर रुग्णालयाची आणि त्याला जोडलेल्या महाविद्यालयाची मान्यता रद्द होईल" दुसरे एक वैद्य म्हणाले. "मग तरुण वैद्यांची नोकरीही जाईल."
"आजकाल माणसाचे आयुर्मान ८० पर्यंत वाढले आहे. जर मी सेवानिव्रुत्त झालो तर उरलेली ३० वर्षे मी काय करायचे?" तिसरे एक वैद्य म्हणाले.
"बायकोचे डोके खायचे" एक कनिष्ठ वैद्य पुटपुटले. "आमच्या मागची कटकट त्या बिचारीच्या मागे लागेल."
हा सर्व हल्लागुल्ला चालू होता तेव्हढ्यात दुस~या विभागाचे एक वैद्य आले. त्यांच्या व्हॉ्ट्सॅपवर एक वेगळाच संदेश आला होता. तो त्यांनी वाचून दाखविला.
"सातव्या वेतन आयोगानुसार जेव्हा तो लागू होईल तेव्हा ज्यांचे वय ६० असेल किंवा ज्यांची सेवा ३३ वर्षे झाली असेल ते सर्व सेवानिव्रुत्त होतील."
दहा वर्षे वाढवून मिळतील असे दिसले तरीही वैद्यांचे समाधान होईना.
"आयुर्विज्ञान परिषद म्हणते की वैद्यांचे सेवानिव्रुत्तीचे वय ७५ करा. महाराजांच्या नियमाप्रमाणे आपले सेवानिव्रित्तीचे वय ६२ आहे. ते वाढवायचे की कमी करावयाचे?" ६२ वे वर्ष पूर्ण व्हावयास थोडेसे महिने उरलेले एक वैद्य म्हणाले.
"अजून ४ वर्षांचा सेवाकाळ शिल्लक आहे म्हणूना मी मोठे ग्रुहकर्ज घेतले आहे. आता मी सेवानिव्रुत्त झालो तर मी ते कर्ज फेडणर कसे?" दुस~या एका वैद्यांनी विचारले.
राजवैद्यांकडून पूर्वनियोजीत सभेसाठी बोलावणे येईपर्यंत हे सर्व संभाषण उलट सुलट चालूच राहिले. इतका वेळ गप्प असण~या एक वैद्यांना दुस~या वैद्यांनी विचारले, "आपले मत आपण मांडले नाही?".
"आयोगाचा कार्यकाळ अजून चार महिने आहे. तो संपेल तेव्हा काय ठरले ते समजेल. तोपर्यंत कासावीस होण्याचा काहीही फायदा नाही. म्हणून मी गप्प आहे."

Thursday, September 10, 2015

चालेल

राजवैद्यांनी एका रुग्णाला तपासून तिच्या विकाराचे निदान केले. मग तिला ते समजावून सांगितले. तिला ते समजले आहे असे जाणवल्यावर त्यांनी तिला तिच्या औषधोपचारांची माहिती दिली.
"बाई, या गोळ्या तुम्ही तोंडाने पाण्याबरोबर सकाळ-संध्याकाळ घ्यावयाच्या आहेत. या दुस~या गोळ्या तोंडाने पाण्याबरोबर दिवसातून तीनदा रिकाम्या पोटी घ्यावयाच्या आहेत. हे पिण्याचे औषध एकेक चमचा सकाळ-संध्याकाळ घ्यावयाचे आहे."
"चालेल" बाई म्हणाल्या.
राजवैद्य चक्रावले. चालेल म्हणजे काय? औषध जसे घ्यावयाचे असते तसेच ते घ्यावे लागते. त्या बाबतीत चालण्याचा - न चालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा ब~याच स्त्रियांनी राजवैद्यांना 'चालेल' असे आतापर्यंत म्हणून झाले होते. आतापर्यंत त्यांनी काहीच म्हटले नव्हते. आज त्यांचा संयम संपला.
"चालले नाही तरीही ही औषधे मी सांगितली त्याच प्रकारे घ्यावयाची आहेत" राजवैद्य म्हणाले.
बाईंनी राजवैद्यांकडे चमकून पाहिले. क्षणभर विचार केला. मग त्या हसल्या आणि म्हणाल्या "बरे".

Tuesday, September 8, 2015

सामूहिक आजार

आटपाट नगरातली गोष्ट आहे.
"राजवैद्य, आपल्याला साथीचे आजार माहित आहेत. पण आपण सामूहिक आजारांबद्दल ऐकले आहे का?" गुरुजींनी विचारले.
"नाही बुवा" राजवैद्य म्हणाले. "हे आपले एखादे कोडे असावे असे वाटते."
"आमचे विद्याथी म्हणजे तरूण मुलगे आणि मुली असतात. तारुण्याची ताकद आणि उत्साह त्यांच्या अंगात सळसळत असतो. आजारपण म्हणजे काय ते त्यांना माहीतच नसावे असे त्यांच्याकडे बघून वाटते. गेल्या आठवड्यांत एके दिवशी त्यांना सामूहीक आजार झाला."
म्हणजे नक्की काय झाले?" राजवैद्यांनी विचारले
"सकाळच्या सत्रांत सर्व विद्यार्थी अनुपस्थित राहिले. मी ते येतील म्हणून वाट बघत होतो. शिकविण्याची तयारी केली होती. सर्व फुकट गेले. दुस~या दिवशी त्यांतले अर्धे जण आले. ब~याच कालावधीनंतर आणखी थोडे जण आले. काल आपण का आला नव्हता असे मी प्रत्येकाला विचारले. प्रत्येकाने आपली तब्येत ठीक नव्हती असे उत्तर दिले. चेह~यावरून तर त्यांच्यापैकी कोणीही आजारी किंवा नुकताच आजारांतून उठलेला वाटत नव्हता. एका दिवशी सर्वांना होणारा आणि दुस~या दिवशी बरा होणारा कोणता आजार असेल बरे?" गुरुजींनी विचारले.
राजवैद्य हंसले. "असा आजार नसतो गुरुजी" ते म्हणाले. "कोणाचा तरी वाढदिवस असेल किंवा दुस~या विषयाची परीक्षा असेल. आमचे प्रशिक्षणार्थी वैद्यही असे करतात."
"आपण विद्यार्थी होतो तेव्हा असे होत नव्हते" गुरुजी म्हणाले.
"काळ बदललाय गुरुजी. जे झालेय ते बरे की वाईट हा विचार सोडून द्या. झालेय ते बदलता येणार नाही याची खूणगाठ बांधूनच चला."

Saturday, September 5, 2015

शिक्षकदिन

"आज शिक्षकदिन. म्हणजे आपली गुरुपौर्णिमा असते ती नव्हे. हा पाश्चात्यांनी जगाला दिलेला शिक्षकदिन" आटपाटनगरीचे गुरुजी पत्नीला सांगत होते.
"आज तुमचा दिवस आहे तर तुम्ही असे खिन्न का?" पत्नीने विचारले.
"त्या एरवी दीन असणा~या शिक्षकांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी आज शिक्षक काळ्या फिती लावून काम करत होते" गुरुजी म्हणाले. "त्यांच्यावर ही पाळी आली म्हणून मन उदास झाले आहे. राजदरबारी त्यांची कोणीही दखलही घेत नाही आहे."
"तेव्हढेच, की आणखी काही?" पत्नीने विचारले.
"आमच्याकडील एका कडक स्वभावाच्या शिक्षकांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना केक आणला, स्वतः बनविलेले शुभेच्छा पत्र दिले. एरवी कडक असणारे ते शिक्षक तेव्हा तोंड भरून हसत होते. विद्यार्थ्यांना आपण त्रास देऊ नये म्हणून त्यांनी असे केले आहे, आपल्यावरील प्रेमामुळे नाही हेही त्यांना समजले नाही. असे इतरही शिक्षक आणि विद्यार्थी आहेत. त्यामुळेही मन उदास आहे."
पत्नी गप्पच राहिली.
"ज्यांना प्रेमाने आणि कळ्कळीने शिकविले असे काही विद्यार्थी फेसबूक, ट्विटर आणि व्हॉट्सॅपवर आपल्या शिक्षकांविषयी काहीबाही लिहित आहेत असे ऐकले. त्यामुळेही मन उदास आहे."
पत्नीला गुरुजंची व्यथा समजली, पण तिच्याकडे त्यासाठी काही उतारा नव्हता.
"एक दिवस शिक्षकांचा म्हणून गाजवायचा आणि वर्षाचे उरलेले दिवस त्यांची अवहेलना करायची, या गोष्टीला आयुष्यभर पहात आलो. आता या दिवसाचा फोलपणा जाणवतोय म्हणून उदास वाटतेय" गुरुजी  म्हणाले.
"थोडा गरम गरम चहा घ्या. बरे वाटेल. मनाचा उदासपणा जाईल" पत्नी म्हणाली. "एक लक्षांत घ्या. ही सर्व माया आहे. तुम्ही भगवत्गीतेत सांगितल्याप्रमाणे सर्व परमेश्वराच्या चरणी अर्पण करा. सुख त्याचे, दुःखही त्याचे. मग मनाला असा त्रास होणार नाही."
एरवी पत्नीला चार गोष्टी शिकविणारे गुरुजी आज तिच्या मुखातून हे ऐकून क्षणभर संभ्रमित झाले, मग आनंदाने हसले आणि म्हणाले, तू म्हणतेस ते खरे आहे. हे मी विसरलो होतो. आठवण करून दिलीस त्याबद्दल आभारी आहे."

Tuesday, September 1, 2015

हस्तप्रक्षालन

राजवैद्य खेदाने डोके हलवित असताना गुरुजी तेथे पोहोचले.
"राजवैद्य, काय झाले म्हणून आपण डोके हलवित आहात?" गुरुजींनी विचारले.
"अहो, काय सांगू? काहीही खाण्यापूर्वी हात धुवावे हे आपण लहान मुलांना शाळेत शिकवितो. उलट्या आणि जुलाब होऊ नयेत म्हणून वैद्य रुग्णांचे तसे प्रबोधन करतात. निदान त्यांनी तरी हात धुवून खावे?" राजवैद्य म्हणाले.
"बरोबर आहे. सर्व वैद्य तसे करत नाहीत का?"
"तेच तर माझ्या खेदाचे कारण आहे. आमच्या विभागांत बरेच जण स्वच्छतेच्या मोठमोठ्या गप्पा मारतात. पण कोणी मिठाई आणली आणि देऊ केली की हात न घुताच मिठाईचा तुकडा बिनदिक्कतपणे उचलतात. काही जण तर अगदी कहरच करतात. ते आपल्या घाण हातांनी एक तुकडा उचलून त्याचा छोटा भाग काढून घेतात आणि उरलेला भाग परत मिठाईच्या खोक्यांत ठेवतात. म्हणजे नंतर जो कोणी तो तुकडा खाईल त्याच्या पोटांत या माणसाच्या हातांची घाण जाईल."
गुरुजींना काय बोलायचे ते सुचेना. ते गप्पच राहिले.
"आमच्या रुग्णालयाच्या प्रमुख एक बाई होत्या. परदेशी वैद्यांच्या स्वागतासाठी महाराजांनी एक मेजवानी ठेवली होती. तेथे तर या काय काम करत होत्या ते अर्धवट सोडून आल्या, आपली खुर्ची हातांनी ओढून हवी तशी ठेवली आणि त्याच हातांनी जेवल्या."
"मग जुलाब झाले असतील?" गुरुजी म्हणाले.
"देव जाणे" राजवैद्य म्हणाले. "झाले असतील किंवा नसतील. पण आपण इतरांना काय आदर्श घालून देतो याचे या मोठ्या पदावरच्या बाईंना भान असायला हवे होते ना? त्या एकट्याच तशा होत्या असे नाही. त्यांच्या नंतर त्या पदावर आलेले प्रमुख वैद्य स्वतः शल्यतज्ज्ञ होते. त्यांना तर जंतूसंसर्गाची सखोल माहिती होती. एकदा मी रुग्णालयाच्या कामानिमित्त त्यांना भेटायला गेलो. ते स्वतःचे काम करता करता पुडींत हात घालून चटपटे खात होते. मला पाहून त्यांनी पुडीतून थोडे चटपटे काढले आणि मला देऊ केले. मी नको म्हटले. ते म्हणाले, घ्या हो, संकोच करू नका. मी म्हटले, संकोच नाही. पण प्रक्रुतीस्वास्थ्यासाठी मी हात धुतल्याशिवाय काही खात नाही. तर या ग्रुहस्थाने थोडासा विचार केला आणि हात मागे घेतला. हातातल्या चटपट्यांचे त्यांनी काय केले असेल?"
"स्वतःच्या तोंडात टाकले असतील" गुरुजी म्हणाले.
"नाही."
"पुडीत परत टाकले असतील" गुरुजी म्हणाले.
"नाही."
"मग काय केले त्यांनी?" गुरुजींनी विचारले.
"टाकून दिले".
गुरुजींना त्यावर काय बोलायचे ते सुचेना.


प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क